आधी कांद्याने रडवलं, आता बटाटाही ताटातून गायब?

आधी कांद्याने रडवलं, आता बटाटाही ताटातून गायब?

आता घाऊक बाजारात बटाटा 28 ते 29 रुपयांवर गेला असून किरकोळ बाजारात तो 35 ते 40 रुपये प्रतिकिलो विकला जात आहे.

अनिश बेंद्रे

|

Dec 19, 2019 | 1:35 PM

मुंबई : एकीकडे कांद्याने सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलं असतानाच आता बटाट्याचे दरही हळूहळू वाढत (Onion Potato Price Increased) आहेत. घाऊक बाजारात बटाट्याचा भाव 28 ते 29 रुपये प्रतिकिलो झाला आहे, तर किरकोळ दर हा 35 ते 40 रुपयांवर गेला आहे. त्यामुळे कांद्यापाठोपाठ बटाटाही ताटातून गायब होण्याची भीती वर्तवली जात आहे.

रोजच्या जेवणात अनेकांना कांद्याशिवाय पर्याय नसतो. मात्र कांद्याचे दर शंभरीपार गेल्याने बऱ्याच जणांना मन मारुन जेवण बनवावं लागत आहे. कांद्यानंतर नंबर लागतो, तो बटाट्याचा. भाज्या संपल्यावर अडीअडचणीला धावून येतो तो बटाटा. काही जणांना प्रत्येक भाजीत बटाटे घालण्याची आवड असते. तर वडापावपासून बटाटा भजी आणि दाबेलीपासून सँडविचपर्यंत अनेक फास्टफूडच्या पदार्थांतही बटाटा असतो. मात्र बटाट्यालाही महागाईचा फटका बसलेला दिसत आहे.

यंदा परतीच्या पावसाने शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांचे आर्थिक समीकरण बिघडवले. त्याचा सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे गेल्या महिन्यात चाळीस रुपये किलो मिळणारा कांदा शंभरच्या पार गेला आहे. आवक कमी आणि मागणी जास्त असल्याने कांद्याचे दर दोन आठवड्यांत 60 रुपयांनी वाढले आहेत. त्याचा फटका सर्वसामन्यांना सहन करावा लागत असून गृहिणींचे बजट बिघडले आहे.

रस्त्यावर मोकाट जनावर दिसल्यास मालकाला 10 हजारांचा दंड

दुसरीकडे आता बटाट्याचे दरही वाढले आहे. गेल्या आठवड्यात ठोक बाजारात बटाटे 10 ते 12 रुपये प्रतिकिलो होते, तर किरकोळ बाजारात बटाटे 18 रुपये किलो दराने विकले जात होते. मात्र आता घाऊक बाजारात बटाटा 28 ते 29 रुपयांवर गेला असून किरकोळ बाजारात तो 35 ते 40 रुपये प्रतिकिलो विकला जात आहे. मागणीच्या तुलनेत बटाटा कमी येत असल्याने ही दरवाढ झाली आहे.

बटाटे प्रकार (प्रतिकिलो किंमत)

आग्रा – 24 ते 26 रुपये घाऊक

तळेगाव, पुणे – 28 ते 30 रुपये

मंचर – 28 ते 30 रुपये

इंदोर – 28 रुपये

इतर – 28 ते 30 रुपये

हे सर्व प्रकारची बटाटे किरकोळ बाजारात 35 ते 40 रुपये किलोने विकले जात आहेत. त्यामुळे आता पन्नाशीच्या दिशेने धावणारे बटाटे (Onion Potato Price Increased ) कांद्याचा कित्ता गिरवणार नाहीत ना, याची भीती सर्वांनाच सतावत आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें