धनंजय मुंडेंवरील शुक्लकाष्ट टळलं, ‘चित्रकूट’ पुन्हा फुलला, पुष्पगुच्छांचा खच

धनंजय मुंडे यांच्याविरोधातील तक्रार मागे घेण्यात आल्यानंतर त्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या चित्रकूट बंगल्यावर कार्यकर्त्यांची रीघ लागली आहे.

  • हर्षल भदाणे पाटील, टीव्ही ९ मराठी, नवी मुंबई
  • Published On - 18:24 PM, 22 Jan 2021
धनंजय मुंडेंवरील शुक्लकाष्ट टळलं, 'चित्रकूट' पुन्हा फुलला, पुष्पगुच्छांचा खच

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते धनंजय मुंडे यांच्याविरोधातील बलात्काराची तक्रार रेणू शर्मा यांनी परत घेतली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे याांच्यावर झालेल्या गंभीर आरोपातून त्यांची सुटका झाली आहे. त्यामुळे सध्या तरी मुंडे यांच्यावरील शुक्लकाष्ट टळलं असंच पाहायला मिळत आहे. धनंजय मुंडे यांच्याविरोधातील तक्रार मागे घेण्यात आल्यानंतर त्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या चित्रकूट बंगल्यावर कार्यकर्त्यांची रीघ लागली आहे. तसंच या बंगल्यात सध्या पुष्पगुच्छांचा खच दिसून येत आहे. आपल्या लाडक्या नेत्याची गंभीर आरोपातून सुटका झाल्याचा आनंद कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरही पाहायला मिळत आहे.(Party activists lined up at Dhananjay Munde’s Chitrakuta bungalow)

रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराची तक्रार केली होती. त्यानंतर रेणू शर्मा यांच्याविरोधात भाजप आणि मनसेच्या एका नेत्यानं पोलिसांना पत्र लिहिलं. त्यानंतर रेणू शर्मा यांच्याविरुद्ध वातावरण अधिक पेटलं. त्यामुळे अखेर रेणू शर्मा यांनी आपली तक्रार परत घेतली आहे. त्यामुळे आता चित्रकूट बंगल्यावर आनंदाचं वातावरण आहे. या बंगल्याच्या सभागृहात पुष्पगुच्छांचा खच पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. गंभीर आरोपातून सुटका झाल्यानंतर मुंडे यांच्या बंगल्यावर कार्यकर्त्यांची लगबग वाढली आहे.

धनंजय मुंडेंचा ‘द शो मस्ट गो ऑन’

बलात्कार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसने अभय दिल्याने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे त्यांनी कामालाही सुरुवात केली आहे. नेहमीप्रमाणे त्यांनी गुरुवारीही त्यांनी जनता दरबार घेतला. अनेकांची निवेदने स्वीकारून त्यांचे प्रश्नही मार्गी लावले. पण मुंडे अजूनही तणावात असल्याचं स्पष्ट जाणवत होतं. त्यांच्या चेहऱ्यावरील ताणतणावावरून ते टेन्शनमध्ये असल्याचं दिसून येत आहे.

बलात्कार प्रकरणाचे आरोप झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस धनंजय मुंडे यांच्या पाठिशी खंबीर उभी राहिली. त्यामुळे मुंडे यांना दिलासा मिळाला. त्यानंतर त्यांनी कामालाही सुरुवात केली. गेल्या गुरुवारी राष्ट्रवादी कार्यालयात त्यांनी जनता दरबार घेतला. यावेळी त्यांनी नागरिकांच्या तक्रारी दूर केल्या. त्या दिवशीही त्यांच्या चेहऱ्यावरील तणाव स्पष्ट दिसत होता. आजही मुंडे यांनी जनता दरबार घेतला. यावेळी त्यांनी अनेक लोकांची निवेदने स्वीकारली. त्यावर सह्याही केल्या. तसेच काही लोकांचे प्रश्नही समजून घेतले. सुमारे दोन तास त्यांचा जनता दरबार सुरू होता.

‘किमान माणुसकी ठेवा’, संजय राऊतांचा भाजपला सल्ला

शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही भाजप नेत्यांना एक सल्ला दिला आहे. किमान अशा प्रकारात तरी माणुसकी ठेवा. सत्यता तपासून मत व्यक्त करा, तपास यंत्रणांना वेळ द्या, असा सल्ला राऊत यांनी दिला आहे. आपण पहिल्या दिवसापासून सांगत होतो की सत्य बाहेर येऊ द्याय. राजकारण आणि समाजकारणात उभं राहण्यासाठी अनेक वर्षे लागतात. मात्र, एखाद्या तक्रारीवरुन उद्ध्वस्त करणं हे माणुसकीला धरुन नाही, असं मत राऊत यांनी व्यक्त केलं आहे.

‘महाविकास आघाडीनं सुटकेचा निश्वास सोडला’

धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांच्यासोबत दीर्घकाळ काम केलं आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा मागणाऱ्यांना माझा सल्ला आहे की, अशा प्रकरणामध्ये तरी राजकीय राग, लोभ, द्वेष आणू नका. अशा प्रकरणात किमान माणुसकी ठेवली पाहिजे. वेळ दिला पाहिजे. धनंजय मुंडे यांच्यावरील जो डाग दूर झाला आहे, त्यामुळे महाविकास आघाडीनं सुटकेचा निश्वास सोडला आहे. कारण, कोणत्याही मंत्र्यांवर अशाप्रकारचे आरोप होणं योग्य नाही. पण आता ती जळमटं दूर झाली, असं मत राऊत यांनी व्यक्त केलं आहे.

संबंधित बातम्या :

Dhananjay Munde Case : ‘किमान माणुसकी ठेवा’, धनंजय मुंडे प्रकरणात संजय राऊतांचा भाजपला सल्ला

महिलांसाठीच्या प्रोटेक्शन कायद्याचा दुरुपयोग; रोहिणी खडसेंकडून धनंजय मुंडेंची पाठराखण

Party activists lined up at Dhananjay Munde’s Chitrakuta bungalow