Dhananjay Munde Case : ‘किमान माणुसकी ठेवा’, धनंजय मुंडे प्रकरणात संजय राऊतांचा भाजपला सल्ला

किमान अशा प्रकारात तरी माणुसकी ठेवा. सत्यता तपासून मत व्यक्त करा, तपास यंत्रणांना वेळ द्या, असा सल्ला राऊत यांनी दिला आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:23 PM, 22 Jan 2021
Dhananjay Munde Case : 'किमान माणुसकी ठेवा', धनंजय मुंडे प्रकरणात संजय राऊतांचा भाजपला सल्ला
संजय राऊत

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांनी आपली तक्रार मागे घेतल्यानंतर सत्ताधारी महाविकास आघाडीतील नेत्यांनी भाजप नेत्यांना चांगलंच धारेवर धरलं आहे. आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही भाजप नेत्यांना एक सल्ला दिला आहे. किमान अशा प्रकारात तरी माणुसकी ठेवा. सत्यता तपासून मत व्यक्त करा, तपास यंत्रणांना वेळ द्या, असा सल्ला राऊत यांनी दिला आहे. आपण पहिल्या दिवसापासून सांगत होतो की सत्य बाहेर येऊ द्याय. राजकारण आणि समाजकारणात उभं राहण्यासाठी अनेक वर्षे लागतात. मात्र, एखाद्या तक्रारीवरुन उद्ध्वस्त करणं हे माणुसकीला धरुन नाही, असं मत राऊत यांनी व्यक्त केलं आहे.(Shivsena MP Sanjay Raut criticizes BJP over Dhananjay Munde case)

रेणू शर्माकडून तक्रार मागे

धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांनी आपली तक्रार मागे घेतली आहे. माझ्या बहिणीत आणि धनंजय मुंडे यांच्यात वाद झाला आणि या प्रकरणामुळे मला मानसिक त्रास झाला. विरोधी पक्षनेतेही त्यांच्यासोबत गेल्यानं मी राजकारणाचा शिकार होत असल्याचं मला जाणवलं. काही लोक माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या चालवत आहेत. हे सर्व चुकीचं आहे. मला माझ्या घरातील माणसांचे नाव खराब करायचं नाही, असं म्हणत रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधातील तक्रार मागे घेतली आहे.

‘महाविकास आघाडीनं सुटकेचा निश्वास सोडला’

धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांच्यासोबत दीर्घकाळ काम केलं आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा मागणाऱ्यांना माझा सल्ला आहे की, अशा प्रकरणामध्ये तरी राजकीय राग, लोभ, द्वेष आणू नका. अशा प्रकरणात किमान माणुसकी ठेवली पाहिजे. वेळ दिला पाहिजे. धनंजय मुंडे यांच्यावरील जो डाग दूर झाला आहे, त्यामुळे महाविकास आघाडीनं सुटकेचा निश्वास सोडला आहे. कारण, कोणत्याही मंत्र्यांवर अशाप्रकारचे आरोप होणं योग्य नाही. पण आता ती जळमटं दूर झाली, असं मत राऊत यांनी व्यक्त केलं आहे.

हनी ट्रॅप ही महाराष्ट्राची संस्कृती नाही- राऊत

देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात फार संयमी भूमिका घेतली होती. फडणवीसांची ही भूमिका भाजपच्या अन्य नेत्यांनी समजून घ्यायला हवी. कारण चारित्र्यहनन हे राजकारणात हल्ली एक मोठं शस्त्र बनत आहे. हनीट्रॅप ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, राजकारण नाही. जर ते कुणी करत असेल तर ते महाराष्ट्राला डाग लावत आहेत, असंही राऊत म्हणाले.

सुधीर मुनगंटीवारांना टोला

दरम्यान, राजकीय दबावातून रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेतली असावी, अशी शक्यता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. त्यावर बोलताना
“राजकीय दबाव आणून प्रश्न सोडवणं ही त्यांची संस्कृती असेल. राजकीय दबाव काय करु शकतात हे आम्ही अर्णव गोस्वामी प्रकरणात पाहिलं आहे. राजकीय दबाव काय करु शकतो हे आम्ही त्या नटीच्या प्रकरणात पाहिलं. त्यामुळे त्यांना राजकीय दबावाची ती व्यवस्था माहिती असेल. केंद्र सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रात कुठे राजकीय दबावाचा प्रकार सुरु असेल तर त्याची माहिती आम्ही सुधीरभाऊंकडून घेऊ,” असा टोला राऊत यांनी लगावला आहे.

‘राष्ट्रीय सुरक्षा इतकी स्वस्त आहे का?’

अर्णव गोस्वामी आणि BARCच्या माजी CEO च्या कथीत चॅट प्रकरणावरुनही राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या विषय आहे. देशात आम्ही सत्तेत असतो आणि भाजप विरोधी पक्षात तर देशाच्या सुरक्षेच्या प्रश्नावर त्यांनी आतापर्यंत तांडव केलं असतं. प्रधानमंत्री कार्यालयावर मोर्चे काढले असते. आज भाजप का गप्प आहे ? राष्ट्रीय सुरक्षा इतकी स्वस्त आहे का ?  असा सवाल राऊत यांनी केलाय. त्याचबरोबर अर्णब गोस्वामी कुठे आहेत हे भाजपला माहीत असेल. कारण देश त्यांच्या ताब्यात आहे. मुंबई पोलीस योग्य वेळी तपास करतीलच. ण ते कुठे आहेत, काय करीत आहेत याची माहिती भाजपला असावी, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

संबंधित बातम्या :

राष्ट्रवादाचं सर्टिफिकेट वाटणाऱ्यांचा पर्दाफाश; सोनिया गांधींचा अर्णव गोस्वामींवर हल्ला

राष्ट्रवादीच्या ताब्यातील नगर परिषदेत सेनेच्या नगरसेविकेस सभापतीपद; धनंजय मुंडे शब्दाला जागले

Shivsena MP Sanjay Raut criticizes BJP over Dhananjay Munde case