Ajit Pawar: कधीही वेळ न चुकवणारे दादा, यावेळी मात्र तुम्ही…अजितदादांच्या अकाली ‘एक्झिट’मुळे देवेंद्र फडणवीसांना शोक अनावर

Ajit Pawar Early Exit: राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अकाली एक्झिटमुळे अनेकांना मोठा धक्का बसला. राज्य शोकसागरात बुडालं. उमदा, दिलदार, धडाडीचा मित्र, सहकारी गमावल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. फडणवीस यांना शोक अनावर झाला आहे. त्यांनी शब्दातून त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहे. एका लेखातून त्यांनी भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

Ajit Pawar: कधीही वेळ न चुकवणारे दादा, यावेळी मात्र तुम्ही...अजितदादांच्या अकाली एक्झिटमुळे देवेंद्र फडणवीसांना शोक अनावर
देवेंद्र फडणवीस अजित पवार
Image Credit source: गुगल
| Updated on: Jan 29, 2026 | 10:15 AM

Devendra Fadnavis on Ajit Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं काल विमान अपघातात निधन झालं. बारामती जवळ त्यांचं विमान सकाळी कोसळलं. अजितदादांच्या अकाली एक्झिटमुळे अनेकांना मोठा धक्का बसला. काल वाऱ्यासारखी ही बातमी सगळी पसरली. दादांचे सहकारी, मित्र, नेते, कार्यकर्ते यांना शोक अनावर झाला. अनेकांना रडू कोसळले. भावनांचा आवेग कुणाला थांबवता आला नाही. उमदा, दिलदार, रोखठोक आणि धडाडीचा मित्र गमावल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. फडणवीस हे जवळचा मित्र गेल्याच्या दुःखातून सावरले नाहीत. त्यांनी त्यांच्या शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत. तर एका लेखातून त्यांना भावनांना वाट मोकळी करून दिली.

दादा तुम्ही वेळ चुकवली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल लेखातून भावना व्यक्त केल्या. दादा तुम्ही वेळ चुकवली अशा शब्दात त्यांनी मित्राविषयीच्या भावनांना वाट मोकळी करून दिली. 27 जानेवारी रोजी मंत्रिमंडळ बैठकीनिमित्तानं या दोघांची भेट झाली होती. त्यानंतर दुसर्‍या दिवशी सकाळीच ही धक्कादायक बातमी मुख्यमंत्र्यांना कळाली. तेव्हापासून मनाची झालेली कालवाकालव आणि भावनांचा आवेग त्यांना रोखता आला नाही.

“आम्ही दोघे मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत एकत्र होतो. पाठोपाठ मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीची बैठक माझ्या कक्षात झाली, तेथेही दादा माझ्याबरोबर होते. सदोदित तिजोरीची काळजी करणारा अर्थमंत्री असल्याने मी निश्चित असायचो. महाराष्ट्रात पायाभूत सुविधांवर अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक खर्च होतो, दादांनी प्रश्न उपस्थित केला. प्रकल्प लांबू नयेत, यासाठी आम्ही दोघांनीही आसूड उठविले.

सार्वजनिक बांधकाम खात्याने सरकारचे ७६४ कोटी कसे वाचविले, याची माहितीही देण्यात आली. दादांना आनंद झाला. ‘अशाच गोड बातम्या प्रत्येक बैठकीत देत जा’, अशी कोपरखळीही त्यांनी मारली. पण,अशा बातम्या ऐकण्यासाठी पुढच्याच दिवशीपासून आपण नसू, है मात्र त्यांनी सांगितले नाही. ही बैठक झाल्यानंतर पुन्हा पाऊण तास आम्ही माझ्या दालनात गप्पा मारत बसलो होतो. नियती निष्ठुर असते, आपले काही चालत नाही. कधीही वेळ न चुकवणारे दादा, या वेळी मात्र तुम्ही वेळ चुकवली. दादा ही खंत कायम राहील, तुम्ही अकाली ‘एक्झिट’ घेतली.” अशा शब्दात फडणवीसांच्या मनातील कालवाकालव समोर आली.

मन धजावत नव्हतं

“बारामतीजवळ बुधवारी सकाळी विमान अपघात झाल्याची बातमी कानावर आली, तेव्हाही इतके काही विपरीत घडेल, असे वाटले नव्हते. डॉक्टर जोवर काही सांगत नाहीत, तोवर कोणत्याही बातमीवर विश्वास ठेवायला मन धजावत नव्हते. सुप्रियाताईंशी बोलणे होत होते. पण अखेर ती वाईट बातमी आलीच. माझा जवळचा, दमदार आणि दिलदार मित्र मी गमावला. ही पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. कधीच विस्मरणात जाणार नाही, असा धक्का देणारा हा प्रसंग आहे. काही इनिंग आम्ही नव्याने सुरू केल्या होत्या, ही इनिंग प्रदीर्घ चालेल, असे वाटत असतानाच दादांनी अकाली एक्झिट घेतली.”

“आमच्या दोघांचाही वाढदिवस एकच. पण, वयात अंतर ११ वर्षांचे. त्या अर्थानेही माझ्या लेखी ते ‘दादा’च ! दादांकडून शिकण्यासारखे काय नव्हते? वक्तशीरपणा, शिस्त, कुणी नाराज झाले तरी चालेल पण, रोखठोक बोलायचे आणि रोखठोक वागायचे. एकतर हो म्हणायचे किंवा नाही म्हणायचे. राजकारणात तसा हा गुण जगणे फार कठीण असते. पण, दादा आतून-बाहेरून एक. दोन चेहरे त्यांनी कधी ठेवलेच नाहीत.” अशा भावना फडणवीसांनी व्यक्त केल्या.

“मित्र कसा असतो, हे मी अत्यंत जवळून दादांच्या बाबतीत अनुभवले आहे. दादा हे कायम माझे मित्र होते. तसे खूप जवळून काम आम्ही २०१९ पासून केले असले तरी त्याही पूर्वी विकासाच्या किंवा राज्यहिताच्या विषयांवर आम्ही एकमेकांबरोबर होतो. दूरगामी व्हिजन असलेले नेते फार कमी असतात. दादा हे त्यापैकी एक. शब्दाला जागणारा नेता, कितीही संकट आले तरी शब्दाला किंमत असते.” या उमद्या मित्राविषयी फडणवीसांनी मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली.

राजकारणापलिकडील मैत्री

काही इनिंग आम्ही नव्याने सुरू केल्या होत्या, ही इनिंग प्रदीर्घ चालेल, असे वाटत असतानाच दादांनी अकाली एक्झिट घेतली. २०१४ नंतर त्यांच्या तोंडी कायम माझे नाव ‘सीएम साहेब’ असे असायचे. २०१९ ला ते उपमुख्यमंत्री झाले आणि मी विरोधी पक्षनेता. पण, सभागृहात बोलताना ते हमखास मला ‘सीएम साहेब’ म्हणायचे. मग हळूच जीभ चावून ‘देवेंद्रजी’ म्हणायचे. फार कमी लोक असतात, ज्यांच्याशी आपण मनातले बोलू शकतो. काही संबंध राजकारणापलीकडचे असतात.

आमची मैत्री राजकारणापलीकडची होती. अवांतर विषयांवर बोलण्याची मैफील दादा सोबत असले की घडायची. आम्ही कितीदा रात्री उशिरापर्यंत गप्पा करीत बसायचो. पण, त्यातही कामाच्या विषयांची यादी त्यांची तयार असायची. कोणत्या विषयांवर बोलायचे आहे, याचा कागद हाती असायचा. धीरगंभीर विषयांवर बोलून झाले की दादांचे व्यक्तिमत्त्व खुलायचे. मग त्यांच्यातील ‘दादा’ व्यक्त व्हायचा. कुणाची आणि कशाचीच पर्वा करायची नाही, असे उत्तुंग आणि दिलखुलास दादा व्यक्त व्हायचे. त्यांच्यातील भावनाप्रधान दादा फार कमी लोकांनी पाहिला. पण, मला तेही दादा अनुभवता आले. कारण, आम्ही फार छोट्या कालखंडात पराक्रमच तेवढे केले, अशी आठवणही मुख्यमंत्र्यांनी जागवली.

दादा आणि मला दोघांनाही क्रिकेट सामना बघण्याची आवड. कोणताही सामना असला की मधूनच आम्ही दोघेही ‘स्कोअर’ काय झाला, याची माहिती घेत असायचो. गाणीपण आमचा समान आवडता छंद. त्यातच दादांचा ‘सेन्स ऑफ ह्युमर’ अफलातून. कितीही गंभीर विषय असू द्या, ते थेट गमतीत बोलून समोरच्याची विकेट बेमालूमपणे घ्यायचे. दादांना बांधकामाची गुणवत्ता या विषयात फार रस. प्रत्येक सरकारी बांधकामावर त्यांची कडक नजर असायची. अनेकदा सकाळी ६ वाजता त्यांनी बांधकामाची पाहणी केली आहे. जराही चूक सापडली, तर समोरच्याची ऐशीतैशी करण्यास ते मागेपुढे पाहत नसत.

दादांच्या अकाली एक्झिटने धक्का

एकदा आम्ही विमान प्रवासात होतो. विषय रंगत गेले. मग विषय माझ्या आजवर झालेल्या विमान, हेलिकॉप्टर अपघातांपर्यंत येऊन पोहोचला. मी एकेक प्रसंग रंगवून सांगू लागलो. दादा गमतीने पायलटला म्हणाले, अरे बाबा जवळ कुठली धावपट्टी दिसते का पाहा, मला खाली उतरव आणि मग पुन्हा तू जा. मी दादांना सांगितले की, माझा ट्रॅक रेकॉर्ड आहे, माझे अपघात खूप झाले. पण, काळजी करू नका, मी विमानात असलो की, काही इजा होत नाही. त्याच दादांना विमान अपघाताने आपल्यातून हिरावून न्यावे, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. जमिनीशी घट्ट नाळ असलेला माझा अत्यंत जवळचा सहकारी मी गमावला. हे माझे वैयक्तिक नुकसान तर आहेच. पण, महाराष्ट्राचेही मोठे नुकसान आहे. दमदार आणि दिलदार मित्र मी गमावला आहे. अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी मित्राला आदरांजली वाहिली.