
Schools Open or Closed Today: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजितदादा पवार यांचे काल सकाळी बारामती इथं विमान अपघातात निधन झालं. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला. त्यामुळे राज्यात सरकारी, खासगी आणि इतर शाळांमध्ये तीन दिवसांची सुट्टी असेल का याची चर्चा सुरू झाली आहे. राज्य सरकारने याविषयीची स्पष्टीकरण दिले आहे. सरकारच्या माहितीनुसार, शाळांना सुट्टी केवळ 28 जानेवारी रोजीच जाहीर करण्यात आली होती. तर 29 आणि 30 जानेवारी शाळा नेहमीप्रमाणे सुरू असतील. शाळांना सुट्टी नसेल.
एक दिवसाची सुट्टी
राज्य सरकारने याविषयीचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर काल 28 जानेवारी रोजी शासकीय कार्यालयं आणि शाळांना सुट्टी देण्यात आली. त्यानंतर 29 आणि 30 जानेवारी रोजी शाळा बंद ठेवण्याविषयी कोणताही प्रतिबंध नाही. सुट्टीचे कोणतेही आदेश देण्यात आलेले नाहीत. तर पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी शाळा प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्थानिक पातळीवर शाळा प्रशासनाचा निर्णय पण महत्त्वाचा असेल. तेव्हा पालकांनी शाळेशी, शिक्षकांशी संपर्क करून याविषयीची माहिती घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
3 दिवसांचा राजकीय दुखवटा
अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्र सरकारने राज्यात तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला. यादरम्यान 30 जानेवारी रोजी राज्यातील सर्व सरकारी कार्यालयं बंद असतील. पण शाळा आणि इतर शैक्षणिक संस्था सुरळीत सुरू असतील. नेहमीप्रमाणे शाळा, संस्था सुरू असतील. त्यांना सुट्टी देण्याचे कोणतेही शासकीय आदेश देण्यात आलेले नाहीत.
राज्य सरकारने एक अधिकृत माहिती दिली आहे. त्यानुसार, “अजित आशाताई अनंतराव पवार, राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री, यांचं 28 जानेवारी 2026 रोजी निधन झाले. दिवंगत नेत्याला आदरांजली म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात येत आहे.” या नोटीसनुसार, “महाराष्ट्र सरकारच्या निर्देशानुसार, राज्यात जिथे जिथे नियमीतपणे राष्ट्रध्वज फडकवण्यात येतो. तिथे तो अर्ध्यावर फडकवला जाईल. या काळात कोणत्याही प्रकारचे अधिकृत कार्यक्रम घेण्यात येणार नाही.”
राज्यातील सर्वच जिल्ह्यांसाठी हा नियम लागू आहे. काल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे मुंबईहून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचारासाठी आणि चार सभांसाठी बारामतीला येत होते. बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर उतरण्यापूर्वीच त्यांच्या विमानाला मोठा अपघात झाला. विमान शेजारील शेतात कोसळले. यामध्ये त्यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाला. यामुळे राज्यात शोककळा पसरली आहे.