Ajit Pawar : माझी बायको मिनीट टू मिनीट कुठे गेली होती, हे मी विचारत नाही, असे का म्हणाले अजितदादा? वर्ध्यात झाले तरी काय?

Ajit Pawar Statements : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रमुख अजित पवार यांनी वर्धा येथील पत्रकार परिषदेत एका प्रश्नावर असं उत्तर दिलं. काय म्हणाले अजितदादा?

Ajit Pawar : माझी बायको मिनीट टू मिनीट कुठे गेली होती, हे मी विचारत नाही, असे का म्हणाले अजितदादा? वर्ध्यात झाले तरी काय?
अजित पवार
| Updated on: Aug 21, 2025 | 1:13 PM

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रमुख अजित पवार हे सध्या वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. अजितदादा हे त्यांच्या स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखले जातात. ते भीडभाड न ठेवता तिथल्या तिथं उत्तर देतात. मनात एक आणि ओठात एक असं समीकरण दादाकडं सहजासहजी फिरकत नाही असं म्हणतात. त्याचा प्रत्यय वर्धाकरांना सुद्धा आला. अजितदादांनी पत्रकार परिषदेत वर्धा जिल्ह्यातील अनेक प्रश्न, मुद्यावर त्यांची मतं मांडली. त्यावेळी एक वेगळाच प्रश्नच त्यांच्या पुढत्या आला. त्यावेळी दादांनी मग चांगलाच समाचार घेतला. त्याचवेळी आपण इथं वर्धा जिल्ह्यातील विकास कामासंदर्भात आलो आहे, तेव्हा त्यासंदर्भात प्रश्न विचारण्याची अपेक्षा व्यक्त केली. या घटनेची वर्ध्यातील पत्रकार वर्तुळातच नाही तर राजकीय वर्तुळातही चांगली चर्चा रंगली.

चांगल्याला चांगलं म्हणतो

कुठेही दौऱ्यावर गेल्यावर वित्त नियोजन माझ्याकडे असल्याने मी आढावा घेतो. जिथं चांगलं असेल त्याला मी चांगलं म्हणतो. महसूल बुडला तरी चालेल आम्ही वर्धा जिल्ह्यात दारु बंदी ठेवणार. हा महात्मा गांधी यांचा जिल्हा आहे. बैकायदेशी दारु विक्रीवर आळा घालू असे दादांनी ठणकावले. तर भुजबळ यांनी आढावा घेतल्याबाबत त्यांनी मत व्यक्त केलं.पत्रकारांनो तुम्हाला काय त्रास होतोय. भुजबळ यांनी आढावा घेतला तर. उद्या तुम्ही म्हणाल मी वर्ध्याचा आढावा का घेतला. भुजबळ हे आमचे वरिष्ठ मंत्री आहेत. ते आढावा घेऊ शकतात. कुंभमेळ्याबात कमिटी झाली तर त्यात भुजबळ, दादा भुसे हे असतील. त्यांचा फायदा होईल, असे अजितदादांनी स्पष्ट केले. केंद्राच्या योजनांचा आढावा घेण्याचा अधिकार खासदारांना आहे. जिल्हा नियोजनच्या निधीवर खासदार यांचा अधिकार नाही, असे दादांनी स्थानिक नेत्यांना सुनावले.

मग का केला नाही मत चोरीचा आरोप?

तर मतचोरीच्या आरोपांवर सुद्धा त्यांनी मतं मांडलं. मी आठ वेळा बारामतीमधून १ लाखांनी निवडून आलो. पण लोकसभेत आमची जागा ४८ हजारांनी गेली. तेव्हा आम्ही म्हटलं नाही मतांची चोरी झाली. तीन पक्षांनी हॅाटेल बुक केली होती, विमानं बुक केली होती. तिघांनीही मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न बघीतलं होतं. लोकसभेत यश मिळाल्यावर आम्ही विधानसभा जिंकू असं त्यांना वाटत होतं. पण तसं झालं नाही. चोरी चोरी झाली करायचे? कुठे चोरी झाली? कधी चोरी झाली? बकवास आहे हे सगळं. निवडणूक आयोगाला स्वायत्तता दिलीय. त्यात हस्तक्षेप करु शकत नाही. फेक नॅरेटीव्ह तयार केले जात आहेत, असे अजित पवार यांनी विरोधकांना फटकारले.

माझी बायको मिनीट टू मिनीट…

या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने राष्ट्रसेविका समितीच्या बैठकीचा उल्लेख केला. सुनेत्रा पवार यांनी तिथे हजेरी लावली याविषयी दादांना प्रश्न केला. अजितदादा यांनी नागपूर येथील रेशीमबागेत जाणे टाळले असताना त्यांच्या पत्नी आणि खासदार सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रसेविका समितीच्या बैठकीला हजेरी लावल्याने त्याची चर्चा रंगली होती. त्यासंदर्भात प्रश्न विचारल्यावर दादांनी थोडं रागातच उत्तर दिलं.

माझी बायको मिनीट टू मिनीट कुठे गेली होती, हे मी विचारत नाही. मी विचारतो आता अगं कुठे गेली होती, असं विचारतो, असे अजितदादा म्हणाले. प्रश्न विचारणे हा पत्रकारांचा अधिकार आहे. पण कोणते प्रश्न विचारावे याचा विचार करावा असे दादा म्हणाले. आपण वर्धा जिल्ह्याच्या विकासासंदर्भातील प्रश्न विचारावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.