
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातील संभाषण, त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. महिला अधिकाऱ्यांबाबत ही दादागिरी राज्यात ट्रोल झाली. तर दादांना मित्र पक्षच अडचणीत आणत असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला. अजितदादांनी सुद्धा मुरूम उत्खननावेळी तणाव वाढू नये यासाठी आपण काळजी घेत होतो. महिलांविषयी आपल्याला सर्वोच्च आदर असल्याचा दावा केला. पण या प्रकरणावर अद्याप पडदा पडलेला नाही. उलट हे प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी थेट केंद्रीय लोकसेवा आयोगाचा(UPSC) दरवाजा ठोठावत मोठी मागणी केली आहे.
मिटकरींचे आयोगाला पत्र
अजित पवार राष्ट्रवादीचे विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांनी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या कागदपत्रांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. ही मागणी अर्थातच दादांसोबतच्या विवादीत व्हायरल व्हिडिओनंतर करण्यात आली आहे. मिटकरी यांनी 5 सप्टेंबर 2025 रोजी युपीएससीच्या सचिवांना याविषयीचे पत्र लिहिले आहे.
सेवेत सादर होताना अंजना कृष्णा यांनी जी शैक्षणिक, जात आणि इतर दस्तावेज, प्रमाणपत्र सादर केली. त्याची चौकशी करण्याची मागणी या पत्राद्वारे मिटकरी यांनी केली आहे. या कागदपत्रांची, प्रमाणपत्रांची पडताळा करण्याची मागणी आमदार मिटकरी यांनी केली आहे. या मागणीवर आता युपीएससी काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अंजना कृष्णा यांच्या वर्तवणुकीवरून नाराजी
अमोल मिटकरी यांनी या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता असण्यावर जोर दिला आहे. कृष्णा यांनी सेवेत दाखल होताना काही अनियमितपणा केला का, याची माहिती समोर येणे गरजेचे असल्याचा रोख मिटकरींनी स्पष्ट केला. अजित पवार यांच्याशी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या कथित व्हायरल व्हिडिओनंतर अधिकाऱ्याच्या वर्तवणुकीवर नाराजी दिसून येत आहे. अनेकांनी अजितदादांनी बाजू उचलून धरली. तर काहींनी त्यांच्यावर थेट टिकास्त्र सोडले आहे.
कुडेवाडीतील प्रकरण
सोलापूर जिल्ह्यातील म्हाडा तालुक्यात कुडोवाडी गाव आहे. येथे अवैध उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर ते थांबवण्यासाठी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा घटनास्थळी पोहचल्या होत्या. त्यावेळी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता बाबा जगताप याने अजितदादांना कॉल केला आणि महिला अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याची विनंती केली.
त्यावेळी ही कारवाई ताबडतोब थांबवण्याचे आदेश दादांनी दिले. तसेच आदेश न मानल्यास कारवाईचा इशारा दिला. त्यावेळी अंजना कृष्णा यांनी ओळख देण्यास सांगितले आणि कारवाई सुरू ठेवली. तसेच या सर्व प्रकाराचा व्हिडिओ शूट करुन तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर या सर्वप्रकरणावरून दादांवर विरोधक टीका करत आहेत.