“त्यांना” चावलेला कुत्रा वाघ्या तर नव्हता ना? अमोल मिटकरी यांच्या समाज माध्यमांवरील त्या पोस्टने वादाला फोडले तोंड, म्हणाले खटला फास्ट ट्रॅक…

Amol Mitkari Statements : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी उर्फ मनोहर भिडे यांच्यावर सोमवारी कुत्र्याने हल्ला केला होता. त्यानंतर राज्यात त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. तर आता अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी वादाला तोंड फोडलं आहे.

त्यांना चावलेला कुत्रा वाघ्या तर नव्हता ना? अमोल मिटकरी यांच्या समाज माध्यमांवरील त्या पोस्टने वादाला फोडले तोंड, म्हणाले खटला फास्ट ट्रॅक...
अमोल मिटकरींची ती पोस्ट वादात
Image Credit source: गुगल
| Updated on: Apr 16, 2025 | 10:35 AM

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी उर्फ मनोहर भिडे यांच्यावर सोमवारी कुत्र्याने हल्ला केला होता. सांगली येथील माळी गल्लीतून जात असताना भटक्या कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला केला होता. त्यांच्या पायाला त्याने कडकडून चावा घेतला होता. त्यांच्या पायाला दुखापत झाली होती. घटनेनंतर त्यांनी सरकारी रुग्णालयात जात उपचार घेतले. या घटनेनंतर राज्यात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधक आणि समर्थक या मुद्दावरून भिडलेले दिसत आहेत. त्यातच अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी वादाला तोंड फोडले आहे. त्यांनी समाज माध्यम X वर एक पोस्ट केली आहे. त्या पोस्टवरून सध्या राजकारण तापले आहे.

मिटकरींची ती पोस्ट काय?

संभाजी भिडे यांच्या विधानावर यापूर्वी सुद्धा अमोल मिटकरी यांनी जळजळीत प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यावरून यापूर्वी सुद्धा वादंग उठले होते. आता संभाजी भिडे यांना भटका कुत्रा चावल्याची घटना घडल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा त्यांच्या अनुयायांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या पोस्टमुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे.

“त्यांना” चावलेला कुत्रा वाघ्या तर नव्हता ना? …..जो कुणी असेल त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. खटला फास्ट ट्रॅक मध्ये चालला पाहिजे. चावतो म्हणजे काय? मुगलाई लागलीय का?, अशी पोस्ट मिटकरी यांनी समाज माध्यम एक्सवर केली आहे. त्या पोस्टवर
उलटसुलट प्रतिक्रियांचा महापूर आला आहे. एकूणच या मुद्दावरून शिवप्रतिष्ठान आणि त्यांच्या विरोधकांत नवीन वाद उफाळला आहे हे नक्की.

संभाजी भिडे यांची प्रकृती उत्तम

संभाजी भिडे यांना कुत्र्याने चावा घेतल्यानंतर त्यांना सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एका कार्यक्रमावरून परत असताना रात्री 11 वाजता कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला केला होता. प्राथमिक उपचार घेतल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यांचे निकटवर्तीय हणमंत पवार यांनी त्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती माध्यमांना दिली. सांगली पोलीस अधिक्षक संदीप घुगे यांनी संभाजी भिडे यांची भेट घेत, त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.

दरम्यान संभाजी भिडे यांच्यावर कुत्र्याच्या हल्ल्यानंतर सांगली महापालिकेने भटक्या कुत्र्यांसंदर्भात कारवाईची मोहिम हाती घेतली. डॉग व्हॅन पथकाकडून भटके कुत्रे पकडण्याची मोहिम राबविण्यात आली. अनेक ठिकाणी कुत्र्यांची धरपकड करण्यात येत आहे.