इंदूमिलमधील पायाभरणी सोहळा अचानक रद्द, पुण्याहून वाशीपर्यंत पोहोचलेल्या अजितदादांचा यू टर्न

| Updated on: Sep 18, 2020 | 3:18 PM

वाशीपर्यंत पोहोचल्यानंतर अचानक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा पायाभरणी सोहळा रद्द झाल्याचा निरोप मिळाल्याने अजित पवार पुन्हा पुण्याकडे रवाना झाले.

इंदूमिलमधील पायाभरणी सोहळा अचानक रद्द, पुण्याहून वाशीपर्यंत पोहोचलेल्या अजितदादांचा यू टर्न
Follow us on

मुंबई : दादरच्या इंदूमिलमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा अचानक ठरलेला पायाभरणी सोहळा अचानकपणेच पुढे ढकलण्यात आला. या सोहळ्यासाठी पुण्याहून मुंबईला निघालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांना यू टर्न घ्यावा लागला. (Ajit Pawar takes a U Turn to Pune as Dr Babasaheb Ambedkar Statue Lay Foundation Program Postpones)

मुंबईच्या वेशीवर म्हणजेच वाशीपर्यंत आले असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा पायाभरणी सोहळा पुढे ढकलण्यात आल्याचा निरोप अजित पवार यांच्यापर्यंत पोहोचला. त्यामुळे पुन्हा त्यांच्या गाड्यांचा ताफा पुण्याच्या दिशेने वळवण्यात आला.

पुण्यात सकाळी 11 वाजल्यानंतर नियोजित केलेले अजित पवारांचे सर्व कार्यक्रम इंदू मिलमधील कार्यक्रमासाठी रद्द करण्यात आले होते. त्यानुसार सकाळचा दौरा आटपून अजितदादा मुंबईला निघाले. वाशीपर्यंत पोहोचल्यानंतर अचानक कार्यक्रम रद्द झाल्याचा निरोप मिळाल्याने अजित पवार पुन्हा पुण्याकडे रवाना झाले.

आधीच कार्यक्रम निमंत्रणावरुन अजित पवार नाराज असल्याचे बोलले जात होते. त्यात आता कार्यक्रम रद्द झाला. त्यानंतर पूर्वनियोजित कार्यक्रमांसाठी ते पुण्याला परतले.

मेट्रोच्या कामाची पाहणी

अजित पवार पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी करण्यासाठी आज पहाटे-पहाटेच दाखल झाले होते. पिंपरी-चिंचवड ते पुणे मेट्रोचा आढावा घेत अजित पवारांनी ब्रिजेश दीक्षित यांच्यासोबत बैठक घेतली. बैठक झाल्यानंतर अजित पवारांच्या गाड्यांचा ताफा संत तुकाराम नगर मेट्रो स्थानकाकडे निघाला. संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशनची पाहणी अजितदादांनी केली.

यावेळी अजित पवारांनी स्टेशनवर तिकीट विक्री कशी असेल, याची माहिती घेतली. त्यानंतर संत तुकाराम नगरला मेट्रोचे पहिले तिकीट घेऊन त्यांनी मेट्रो प्रवास केला. अजित पवार मेट्रोचालकाच्या केबिनमधून आढावा घेत होते, तर ब्रिजेश दीक्षित त्यांना मेट्रोबद्दल माहिती देत होते.

पायाभरणी सोहळा अचानक ठरला, अचानक रद्द

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज (18 सप्टेंबर) दुपारी तीन वाजता पायाभरणी सोहळा होणार असल्याचं, काल सांगण्यात आलं होतं. मात्र एमएमआरडीएकडून आजचा कार्यक्रम रद्द झाल्याचं सांगण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला केवळ 16 जणच निमंत्रित होते, त्यावरुन नाराजीचा सूर उमटत होता. आता हा कार्यक्रमच पुढे ढकलण्यात आला आहे.

सर्व विभागांशी समन्वय साधून या कार्यक्रमाची पुढील तारीख ठरवण्यात येईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार लवकरच कार्यक्रम घोषित करु. अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. (Ajit Pawar takes a U Turn to Pune as Dr Babasaheb Ambedkar Statue Lay Foundation Program Postpones)

आंबेडकर स्मारकाच्या सुधारित संरचनेनंतर पादपीठ आणि पुतळ्याच्या पायाभरणीचा हा कार्यक्रम नियोजित होता. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह मंत्र्यांची नावं निमंत्रितांच्या यादीत होती.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, मंत्री छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, आदित्य ठाकरे, असलम शेख, महापौर, स्थानिक आमदार, नगरसेवक आणि अधिकारी यांनाच परवानगी देण्यात आली आहे. नंतर रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनाही इंदू मिलमधील पायाभरणी सोहळ्याचं आमंत्रण पाठवण्यात आलं.

संबंधित बातम्या –

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पायाभरणी अचानक स्थगित

अजित पवार पहाटेच पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, तिकीट काढून संत तुकाराम नगरहून मेट्रोने प्रवास

(Ajit Pawar takes a U Turn to Pune as Dr Babasaheb Ambedkar Statue Lay Foundation Program Postpones)