Mumbai Rains | भांडुप जलशुुद्धीकरण संकुलातील यंत्रणा पूर्वपदावर येण्‍यास सुरुवात, पाणीपुरवठा टप्‍प्‍याटप्‍प्‍याने सुरु

| Updated on: Jul 18, 2021 | 11:30 PM

उदंचन केंद्रातील यंत्रणा सुरळीत होत असल्यामुळे आता मुंबईमधील ज्‍या भागांना सायंकाळचा पाणीपुरवठा दिला जातो, त्‍या भागांना पाणीपुरवठा टप्‍प्‍याटप्‍प्‍याने सुरु करण्‍यात आला आहे.

Mumbai Rains | भांडुप जलशुुद्धीकरण संकुलातील यंत्रणा पूर्वपदावर येण्‍यास सुरुवात, पाणीपुरवठा टप्‍प्‍याटप्‍प्‍याने सुरु
mumbai water supply
Follow us on

मुंबई : भांडुप जलशुद्धीकरण संकुलातील नवीन आणि जुन्‍या अशा दोन्‍ही उदंचन केंद्रातील यंत्रणा टप्‍प्‍याटप्‍प्‍याने कार्यान्‍व‍ित होत आहेत. उदंचन केंद्रातील यंत्रणा सुरळीत होत असल्यामुळे आता मुंबईमधील ज्‍या भागांना सायंकाळचा पाणीपुरवठा दिला जातो, त्‍या भागांना पाणीपुरवठा टप्‍प्‍याटप्‍प्‍याने सुरु करण्‍यात आला आहे. (Bhandup Water Treatment Plant is started to work water supply has started gradually)

पाणी उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरु

भांडुप जलशुद्धीकरण संकुल परिसरात मुसळधार पावसाचे पाणी शिरल्याने जलशुद्धीकरण केंद्रातील गाळणी आणि उदंचन संयंत्रे तसेच विद्युत पुरवठा यंत्रणा बंद करावी लागली होती. यामुळे मुंबई महानगर क्षेत्रात बहुतांश भागांमध्ये 18 जुलै 2021 रोजी सकाळपासून होणारा पाणीपुरवठा बाधित झाला होता. भांडुप जलशुद्धीकरण संकुलात शिरलेले पावसाचे पाणी अक्षरशः युद्ध पातळीवर उपसून गाळणी (filtration) व उदंचन (pumping) यंत्रणेत स्वच्छता करण्यात आली. संबंधित संयंत्राची पाहणी करून आवश्यक ती दुरुस्तीसुद्धा करण्‍यात आली.

जलसंतुलन (Main Reservoir) कुंभातील पाणीपातळीत वाढ

यानंतर आवश्यक ती सर्व तांत्रिक कार्यवाही करून उदंचन करणारे पंप टप्‍प्‍याटप्‍प्‍याने सुरु करण्‍यात येत आहेत. उदंचन सुरु होताच भांडुप येथील मुख्‍य जलसंतुलन (Main Reservoir) कुंभातील पाणीपातळी उंचावू लागली. त्‍यानंतर सायंकाळपासून पश्चिम उपनगरांसह शहर भागातील अनेक भागांमध्‍ये पाणीपुरवठा देखील करण्‍यात आला आहे.

निरनिराळ्या भागांमध्‍ये टप्‍प्‍या-टप्‍प्‍याने पाणीपुरवठा

यामध्‍ये प्रामुख्‍याने एच/पश्चिम विभागातील चॅपल रोड परिसर, खारदांडा, के/पूर्व भागातील मोगरापाडा, पार्ले पूर्व परिसर, के/पश्चिम विभागातील यारी रोड, पी/उत्‍तर विभागातील मढ, गांधीनगर, पी/दक्षिण विभागातील बिंबीसार परिसर, आर/दक्षिण वि‍भागातील ठाकूर संकूल, लोखंडवाला संकूल, आर/उत्‍तर विभागामध्‍ये दहिसर परिसर यासोबत शहर भागामध्‍ये जी/दक्षि‍ण विभागातील तुळशीपाईप मार्ग, सेनापती बापट मार्ग परिसर, एन. एम. जोशी मार्गावर दादर ते भायखळा दरम्‍यान, तसेच जी/उत्‍तर विभागात दादर, माहिम, धारावी, डी विभागात भुुलाभाई देसाई मार्ग, ताडदेव, महालक्ष्‍मी, ए विभागात कुलाबा, कफ परेड अशा निरनिराळ्या भागांमध्‍ये टप्‍प्‍याटप्‍प्‍याने पाणीपुरवठा देण्‍यात आला आहे. तर यातील काही भागात अजूनही पाण्याचा पुरवठा केला जातोय.

पाणी उकळावे आणि नंतरच प्यावे, मुंबईकरांना आवाहन

भांडुप संकुलातील यंत्रणा टप्‍प्‍याटप्‍प्‍याने कार्यान्‍व‍ित होऊन पाणीपुरवठा पूर्वपदावर येतो आहे. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर मुंबईकर नागरिकांनी पाणी उकळावे आणि नंतरच प्यावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने पुन्‍हा एकदा करण्यात येत आहे.

इतर बातम्या :

मुंबईंच्या महापौरांबद्दलचं ते वृत्त खोटं, पेडणेकरांची प्रकृती आता स्थिर, हॉस्पिटलचेही स्पष्टीकरण

Mumbai rains | “मुंबईमध्ये रेस्क्यू टीम स्पॉटवर ठेवा, धोकादायक इमारतीमधील लोकांचे स्थलांतर करा” मुख्यमंत्र्यांचे आदेश

Mumbai Rains : मुंबईतील डोंगराळ भागातील रहिवाशांचे लवकरात लवकर स्थलांतर करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

(Bhandup Water Treatment Plant is started to work water supply has started gradually)