‘गांधी वध’ नव्हे ‘गांधी हत्या’, मराठी विश्वकोशात मोठी सुधारणा; 77 वर्षानंतर का झाली उपरती
Marathi Vishwakosh Chage Term : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या नथुराम गोडसेने केली होती. पण मराठी विश्वकोषात गांधी हत्या हा शब्द वापरण्यात येत नव्हता. तर गांधी वध असा शब्द वापरण्यात आला. आता ही चूक दुरुस्त करण्यात आली आहे.

Gandhi Vadh to Gandhi Hatya Change : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या नथुराम गोडसे याने केली होती. 30 जानेवारी 1948 रोजी नवी दिल्लीतील बिर्ला हाऊसमध्ये सामुहिक प्रार्थना संपल्यानंतर त्याने गांधींजीवर तीन गोळ्या जवळून झाडल्या होत्या. त्यापूर्वी सुद्धा त्यांच्या हत्येचा अयशस्वी प्रयत्न झाला होता. गोडसेला 15 नोव्हेंबर 1949 रोजी फासावर लटकवण्यात आले. पण तेव्हापासून काही पुस्तकात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा खून, हत्या नाही तर वध करण्यात आल्याचा शब्दप्रयोग करण्यात येत होता. अनेकांनी वध या शब्दाला हरकत घेतली होती. पण हा शब्द कायम होता. महायुती सरकारच्या काळात भविष्यातील धोका ओळखत हा शब्द बदलवण्यात आला.
मराठी विश्वकोशात मोठा बदल
महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथातून ‘गांधी वध’ शब्द बदलण्यात आला असून त्याऐवजी ‘गांधीजींचा खून’ असा शब्दप्रयोग करण्यात आला आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष, प्राध्यापक डॉक्टर रवींद्र शोभणे यांनी दिली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विषयीचे हे बदल विश्वकोशाच्या डिजिटल आवृत्तीत नमूद असून येत्या एप्रिल पर्यंत मुद्रित आवृत्तीतही राहणार आहेत
कुठल्याही महापुरुषाबद्दल किंवा घटनेबद्दल ती मग कुठल्याही विचारधारेची असो मात्र वस्तुस्थिती पाहूनच योग्य प्रकारे विश्वकोशात नमूद करण्यात आले आहे. विश्वकोशाच्या चौदाव्या खंडाचे प्रकाशन 1989 साली झाले तेव्हापासून त्यात ‘गांधी वध’ असाच शब्दप्रयोग होता. मराठी विश्वकोशाच्या चौदाव्या खंडात ‘गांधी वध’ ऐवजी ‘गांधीजींचा खून’ हा शब्द बदल करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर कोंडबत्तूवार, बबनराव नाखले, मराठा सेवा संघाचे शिवश्री मधुकरराव मेहकरे आदींनी विधानसभा अध्यक्षांकडे 30 ऑक्टोबर 2020 रोजी याचिकेद्वारे मागणी केली होती. त्यानंतर याविषयीचा बदल करण्यात आला.
याचिकेत करण्यात आल्या चार मागण्या
विश्वकोशाच्या 14 व्या खंडाचे प्रकाशन 1989 मध्ये झाले. तेव्हापासून त्यात गांधीवध असाच शब्दप्रयोग करण्यात येत होता. हा शब्दप्रयोग उजव्या विचारसरणीचे समर्थन करत असल्याची ओरड होती. वध म्हणजे चांगल्या, उद्दात हेतूने कुणाचा तरी शेवट करणे अशा अर्थाने योजला जात होता. तर नथुरामला आदरार्थी संबोधन सुरू होते. त्याविरोधात विधानसभा अध्यक्षांकेड 30 ऑक्टोबर 2020 मध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेत चार मागण्या करण्यात आल्या होत्या.
विश्वकोश खंड -14 मधील गांधीवध हा शब्द गाळा
विश्वकोशात गांधीजींचा खून असा शब्द वापरा
गांधीवध हा शब्द राज्य सरकारच्या कारभारातही वापरु नका
खुनी नथुरामचे उदात्तीकरण टाळा
