
Delay Civic Poll Results: राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान आणि दुसऱ्या दिवशी 16 जानेवारी रोजी मतमोजणी होत आहे. पण पालिका निवडणुकीत सर्वच वॉर्डची मतमोजणी आता एकाचवेळी होण्याची शक्यता धूसर असल्याचे समोर येत आहे. एकाचवेळी एकाच वॉर्डची मतमोजणी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे निवडणुकीचे निकाल रखडण्याची शक्यता आहे. अगोदर टपाली मतदान मोजणी होईल. तर त्यानंतर वॉर्डनिहाय मत मोजणी होईल. त्यामुळे दुपारी स्पष्ट होणारे निकालाचे चित्र मध्यरात्रीपर्यंत स्पष्ट होईल की नाही याची शाश्वती नाही. याविषयी पालिका अद्याप संभ्रमात असल्याचे समोर आले आहे. कुठल्या पद्धतीने मतमोजणी करायची याच्या मार्गदर्शक सूचना द्याव्यात यासाठी राज्य निवडणूक आयोगाल पत्र देण्यात आले आहे.
निकाल लांबण्याची दाट शक्यता
15 जानेवारी रोजी मतदान होईल. दुसऱ्या दिवशी 16 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. अगोदर टपाल मत मोजणी होईल. त्यानंतर वॉर्डनिहाय मत मोजणी करण्यात येईल. जर एका वेळी एकाच वॉर्डची मतमोजणी गृहित धरली तर या प्रक्रियेसाठी मोठा वेळ लागेल. मतमोजणी केंद्रावर कार्यकर्ते,उमेदवारांना ताटकाळावे लागण्याची शक्यता आहे. एकाच प्रभागाची मतमोजणीसाठी साधारणत: एक ते दीड तासांचा कालावधी लागण्याची शक्यता गृहीत धरली तर जिथे अधिक प्रभाग आहे. तिथले निकाल मध्यरात्रीपर्यंत तरी हाती येतील का? असा सवाल करण्यात येत आहे. ज्या महापालिकांचे कमी प्रभाग आहेत, तिथले चित्र संध्याकाळपर्यंत स्पष्ट होण्याची शक्यता आहे. पण राज्यातील मोठ्या महापालिकांचे निकाल हाती येण्यास उशीर होण्याची शक्यता आहे.
मुंबईत काय स्थिती?
देशाचे लक्ष मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालांकडे लागले आहे. मुंबईत 227 प्रभाग आहेत. त्यासाठी 23 विभाग निवडणूक कार्यालये आहेत. या निवडणूक कार्यालयातंर्गत 8-10 प्रभागांची मतमोजणी प्रक्रिया होईल. EVM मतमोजणी होण्याअगोदर टपाली मतदानाची मोजणी होईल. त्यानंतर एकाच वेळी एकच प्रभाग या पद्धतीने मतमोजणी ग्राह्य धरल्यास 23 विभागात मतमोजणीस उशीर होण्याची शक्यता आहे. मध्यरात्रीपर्यंत ही प्रक्रिया लांबण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
इतकेच नाही तर जर ही प्रक्रिया लांबली तर पोलीस यंत्रणा आणि मतमोजणी केंद्रावर नाहक ताण येण्याची शक्यता आहे. पोलिसांसह यंत्रणेवर कार्यकर्त्यांच्या जल्लोष आणि हुल्लडबाजीचा ताण येण्याची शक्यता आहे. तर मतमोजणीवरील आक्षेप आणि वाद पाहता ही प्रक्रिया वेळ खाऊ आणि जिकरीची ठरणार असल्याचे उमेदवारांचे मत आहे.