आनंदवार्ता, मुंबईकरांचा प्रवास एकदम स्वस्तात, वाहतूक कोंडी छुमंतर, बाईक टॅक्सीला परिवहन मंत्रालयाचा हिरवा कंदिल

Bike taxi service in Mumbai : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईत बाईक टॅक्सीला परिवहन मंत्रालयाची मंजूरी देण्यात आली आहे. मुंबईतील वाहतूक कोंडीतून प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे.

आनंदवार्ता, मुंबईकरांचा प्रवास एकदम स्वस्तात, वाहतूक कोंडी छुमंतर, बाईक टॅक्सीला परिवहन मंत्रालयाचा हिरवा कंदिल
बाईक टॅक्सीची लवकरच सेवा
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Mar 06, 2025 | 11:30 AM

मुंबईत बाइक टॅक्सीला परिवहन मंत्रालयाची परवानगी मिळाली आहे. ही मुंबईकरांसाठी नक्कीच आनंदाची बातमी आहे. मुंबईतील वाहतूक कोंडीतून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. तरुणांना मोठा रोजगार उपलब्ध होणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या काही वर्षांपासून मुंबईतील वाहतूक कोंडीवर विविध उपाय करण्यात येत आहे. कोस्टल रोड असो वा, जलमार्ग वाहतूक असो, मेट्रो अथवा भुयारी रेल्वेचा टप्पा असो, मुंबई थांबता कामा नये यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे. त्यातच आता बाईक टॅक्सीचा नवीन मार्ग समोर आला आहे.

स्वस्त आणि झटपट प्रवास

या बाईक टॅक्सी प्रवासाकरीता एका किलोमीटरसाठी ३ रुपये भाडे हा दर ठरल्याची माहिती समोर येत आहे. बाईक टॅक्सीमध्ये जीपीएस यंत्रणा आवश्यक असेल. बाईकस्वाराच्या पाठी बसणाऱ्यास सुध्दा हेल्मेट बंधनकारक असणार आहे. बाईक टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपनीकडे कमीतकमी ५० दुचाकी वाहने असणं आवश्यक आहे. या बाईकच्या नोंदणी क्रमाकांची (नंबर प्लेट) पाटी पिवळ्या रंगाची असेल.

बाईक टॅक्सीमधील दुचाकीसाठी विशिष्ट रंग ठरवण्यात येणार आहे. बाईक टॅक्सी चालकाला बॅचची सक्ती असेल. हा बॅच परिवहन विभाग नोंदणी करून देईल. पोलीस पडताळणीत करूनच चालक परवाना बॅच मिळणार असल्याचे समोर येत आहे. महिलांसाठी खास महिला बाईक रायडर असावेत अशी सूचना संबंधित बाईक टॅक्सी सेवा देणार्‍या कंपनीस देण्यात येतील.

पार्टिशन लावणे बंधनकारक

ओला, उबेरच्या धरतीवर बाईक टॅक्सीला परवानगी देण्यात आली आह. त्यामुळे प्रवाशांना तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकून पडावे लागणार नाही. मुंबईकरांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे. मुंबईत यापूर्वी रॅपिडोने सेवा सुरू केली होती. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद ही मिळाला. पण टॅक्सी आणि ऑटो चालकांनी त्याला कडाडून विरोध केला होता. याविषयीचे शासन दरबारी कोणतेही धोरण नव्हते. त्यामुळे ही सेवा बंद झाली होती. आता ही सेवा पुन्हा सुरू होणार आहे. तर बाईक टॅक्सीमध्ये महिला सुरक्षेवर भर देण्यात येत आहे. बाईक चालकाला पाठीमागे प्रवाशी बसवताना बाईकच्या मध्यभागी पार्टिशन लावणे बंधनकारक असणार आहे.