BJP : ठाकरे बंधूंना शह देण्यासाठी आता भाजपचा गुजराती तडका; महानगरपालिका निवडणुकीसाठी भाषिक कार्ड

BJP Gujrati Card : मुंबई महापालिकेवर सर्वच पक्षाचा डोळा आहे. त्यात महापालिका निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र आले आहेत. या बंधूंना शह देण्यासाठी आता भाजपने गुजराती कार्ड खेळले आहे.

BJP : ठाकरे बंधूंना शह देण्यासाठी आता भाजपचा गुजराती तडका; महानगरपालिका निवडणुकीसाठी भाषिक कार्ड
भाजपचे गुजराती कार्ड
| Updated on: Aug 02, 2025 | 9:02 AM

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आतापासूनच वातावरण तापले आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी अनेक राजकीय घडामोडी घडत आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे 18 वर्षांनी एकत्र आले आहेत. अजून दोघांची युती व्हायची आहे. पण ती होण्याची दाट शक्यता लक्षात आल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे. या दोन्ही ठाकरेंना शह देण्यासाठी आता भाजपने गुजराती तडका लावला आहे. पालिका निवडणुकीपूर्वी गुजराती मते आपल्या पारड्यात ओढण्यासाठी भाजपने मोठी खेळी खेळली आहे.

दोन्ही ठाकरेंची युती?

5 जुलै रोजी विजयी मेळाव्याच्या निमित्ताने दोन्ही ठाकरे एकाच मंचावर आले. वरळी डोम येथे मराठी भाषेसाठी आणि मराठी माणसांसाठी आपण एकत्र आल्याचे दोन्ही ठाकरेंनी स्पष्ट केले. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे हे मातोश्रीवर आले. त्यांनी शुभेच्छा दिल्या. या दोन्ही बंधूंच्या या दिलजमाईमुळे अर्थातच शिंदे सेना आणि भाजपला रणनीती बदलावी लागली आहे. अजून दोन्ही बंधूंनी युतीची कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पण एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी या उद्धव ठाकरेंच्या वाक्याची आठवण वारंवार करण्यात येत आहे. त्यामुळे हे दोन्ही बंधू आगामी पालिका निवडणुकीसाठी एकत्र येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याला शह देण्यासाठी भाजपाने गुजराती कार्ड खेळले आहे.

भाजपचे गुजराती कार्ड

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचा गुजराती मतांवर डोळा आहे. मुंबईत उत्तर भारतीय आणि गुजराती मते सर्वाधिक असल्यामुळे ही मते आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपचे नियोजन सुरू झाले आहे. त्यासाठी विविध कार्यक्रम आयोजीत करण्यात येत आहे. त्यात भाजपने खेळलेल्या या खेळीमुळे नव्या वादाची ठिणगी पडली आहे.

महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीच्यावतीने गुजराती नाट्यप्रयोग करण्यात येत आहे. कांदिवली पूर्व येथे आज संध्याकाळी 6.30 वाजता नाट्य प्रयोग होईल. महिला संवेदनाचं चित्रण करणाऱ्या नाट्यप्रयोगाचे उद्या सादरीकरण करण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आयोजित करणाऱ्या या नाट्यप्रयोगानंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

भाजपचे गुजराती कार्ड

‘स्त्री अेटले’ नाट्य प्रयोग

सांस्कृतिक कार्य विभागाकडून ‘स्त्री अेटले’ या गुजराती नाट्य प्रयोग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम पत्रिकेवर मंत्री आशिष शेलार यांचे नाव आहे. मनसे कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी या कार्यक्रमाला विरोध केला आहे. साहित्याला विरोध नाही. पण हे सर्व मुद्दाम करत असल्याने विरोध करत असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. मराठी साहित्य संमेलन इतर राज्यात करून दाखवावं असे आवाहन मनोज चव्हाण यांनी भाजपला आणि सरकारला दिले आहे. या कार्यक्रमावरून वादाची ठिणगी पडल्याचे दिसून येते.