
भाजपमध्ये इनकमिंग सुरूच आहे. भाजपकडे येणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षात वाढली आहे. विशेष म्हणजे आता इतर पक्षातील नेते महायुतीत दाखल होत आहे. शिंदे सेना, अजितदादांची राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढली आहे. त्यात महाविकास आघाडी आणि विरोधकांना खिंडार पाडण्याचे काम सुरू आहे. विरोधक पुढे नावाला तरी उरतील की नाही, अशी चर्चा रंगली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन महायुतीकडून खास प्लॅनिंग सुरू आहे. आता भाजपने काँग्रेसच नाही तर वंचितला पण दे धक्का दिला आहे. विदर्भातील हा नेता आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.
धानोरकर कुटुंबात आता राजकीय चुरस
चंद्रपूर लोकसभेच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांचे भासरे आणि दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचे सख्खे मोठे बंधू अनिल धानोरकर आज भाजपात प्रवेश करणार आहेत. मुंबई येथे आज दुपारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते अनिल धानोरकर यांचा पक्षप्रवेश होणार आहे. अनिल धानोरकर यांच्यासोबत शिवसेना उद्धव सेनेचे 10 नगरसेवक देखील भाजपात प्रवेश करणार आहेत.
अनिल धानोरकर भद्रावती नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष असून दोन वर्ष त्यांच्याकडे शिवसेनेच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी होती. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या नेतृत्वात धानोरकर कुटुंबीयांची भद्रावती नगरपरिषदेवर एकहाती सत्ता आहे. विधानसभा निवडणुकीत अनिल धानोरकर यांना वरोरा विधानसभा क्षेत्रातून काँग्रेसने तिकीट नाकारले होते. त्यानंतर अनिल धानोरकर यांनी प्रतिभा धानोरकर यांच्या बद्दल जाहीर नाराजी दाखवली आणि वंचितच्या तिकीटावर विधानसभा निवडणूक लढवली होती.
दिवंगत बाळू धानोरकर यांच्या मृत्यूमुळे चंद्रपूरच्या जागेवर त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना तिकीट देण्यात आले होते. त्या सध्या खासदार आहेत. तर अनिल धानोरकर यांनी वंचितच्या तिकीटावर वरोरा विधानसभा संघातून निवडणूक लढवली होती. धानोरकर कुटुंबात त्यावेळी उभी फुट पडली होती. आता अनिल धानोरकर यांच्या कुटुंबात राजकीय चुरस दिसण्याची शक्यता आहे. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत धानोरकर कुटुंबातील राजकीय वैर वाढण्याची शक्यता पण वर्तवण्यात येत आहे.