‘सागर’वर पुन्हा मोठ्या घडामोडींना वेग?, जेपी नड्डा आणि फडणवीस यांच्यात चर्चा; काय घडतंय महाराष्ट्रात?

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे मुंबईत आले आहेत. मुंबईत गणपती दर्शनासाठी नड्डा आले असले तरी या निमित्ताने त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी मोजक्याच नेत्यांची बैठक घेतली आहे. या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सागरवर पुन्हा मोठ्या घडामोडींना वेग?, जेपी नड्डा आणि फडणवीस यांच्यात चर्चा; काय घडतंय महाराष्ट्रात?
devendra fadnavis
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 26, 2023 | 1:20 PM

मुंबई | 26 सप्टेंबर 2023 : भाजपचे नेते अमित शाह हे दोन दिवसांपूर्वी मुंबईत आले होते. मुंबईत लालबागचा राजाचं दर्शन घेतल्यानंतर शाह हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी आले होते. यावेळी त्यांनी फडणवीस यांच्या घरातील बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. यावेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीबाबतची चर्चा करण्यात आली. त्यानंतर आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे मुंबईत आले असून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये फडणवीस यांच्या निवासस्थानी बैठक सुरू असून निवडणुकीवर चर्चा सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे मुंबई आणि पुण्याच्या दौऱ्यावर आले आहेत. मुंबईत त्यांनी लालबागचा राजाचं दर्शन घेतलं. आता ते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या बंगल्यावर गेले आहेत. फडणवीस यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर नड्डा यांची बैठक सुरू आहे. यावेळी फडणवीस यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, आशिष शेलार आणि इतर नेते उपस्थित आहेत. या सर्व नेत्यांची लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर चर्चा सुरू आहे.

लोकसभेचा आढावा

जेपी नड्डा यांच्याकडून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जात आहे. महाराष्ट्रातील राजकीय वातावरण काय आहे? इंडिया आघाडीचं राज्यात किती आव्हान आहे? आणि महायुती म्हणून तयारी काय आहे? याची चर्चाही या बैठकीत सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या बैठकीकडे लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे अमित शाह यांच्यानंतर नड्डा यांनी फडणवीस यांच्याशी निवडणुकीबाबत चर्चा सुरू केल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

मुख्यमंत्री नाही, अजितदादा नाही

दरम्यान, फडणवीस यांच्या घरी चर्चा सुरू असून या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित नाहीये. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवारही नाहीयेत. ही फक्त भाजपची अनौपचारिक बैठक असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या बैठकीला शिंदे आणि अजितदादा नव्हतं असंही सांगितलं जात आहे. या बैठकीत फक्त भाजपच्या तयारीचा आढावा घेतला जात असल्याचीही माहिती आहे.

पुण्याला रवाना

ही बैठक आटोपल्यानंतर जेपी नड्डा हे पुण्याला जाणार आहेत. पुण्यात दगडूशेठ हलवाईच्या गणपतीचं ते दर्शन घेतील. त्यानंतर भाजपच्या काही नेत्यांच्या घरी जाऊन तिथेही गणपतीचं दर्शन घेतील. यावेळी ते भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करतील असं सांगितलं जात आहे.