PADU Machines: वोट चोरी होणार? पाडू मशीनचा कशासाठी वापर? विरोधकांच्या सवालावर भूषण गगराणींचे काय उत्तर, जाणून घ्या एका क्लिकवर
Bhushan Gagrani on PADU Machines: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडू मशीनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. अचानक हे मशीन कुठून आलं असा सवाल त्यांनी केला. राज्य निवडणूक आयोगाच्या कारभारावर त्यांनी तोंडसूख घेतले. त्यानंतर मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी पाडू मशीनविषयी महत्त्वाची माहिती दिली.

PADU Machines: बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी विरोधकांनी पुन्हा एकदा राज्य निवडणूक आयोगावर निशाणा साधला. मतदाना अगोदर नवनवीन पायंडे पडत असल्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तोंडसूख घेतले.आज मतदारांना भेटण्यासाठी 5 वाजेपर्यंतचा अवधी वाढवून देण्यात आला आहे. ही नवीनच प्रथा आयोगाने आणल्याबाबत ठाकरे यांनी सडकून टीका केली. तर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिटचा (PADU) वापर करण्यात येत असल्याबाबत राज ठाकरे यांनी टीकेची झोड उठवली. कोणत्याच पक्षाला या नवीन मशीनची माहिती देण्यात आला नसल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. तर या सर्व प्रकारावर त्यांनी साशंकता उपस्थित केली. त्यानंतर महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत या पाडू मशीनविषयीची माहिती दिली.
‘पाडू’ मशीन काय?
EVM ला हे नवीन पाडू मशीन जोडल्या जाणार आहे. पाडू मशीन म्हणजे Deploy Printing Auxiliary Display Unit-PADU. पाडू मशीन एक अतिरिक्त छोटं यंत्र आहे. जे ईव्हीएम सोबत जोडल्या जाणार आहे. कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट या यंत्रणा सोबत जोडण्याचे आदेश आहेत. कंट्रोल युनिटचा डिस्प्ले जर अचानक बंद झाला तर अशावेळी पाडू मशीन उपयोगात येणार असल्याची माहिती मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली.
मुंबईसाठी 140 पाडू मशीन पाठवल्या
मतदाराला मतदान करताना मतदान प्रक्रियेदरम्यान अधिक स्पष्ट आणि मोठ्या डिस्प्लेवर माहिती दाखवण्यासाठी पाडू मशीनचा वापर होणार आहे. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाडू हे VVPAT सारखं पेपर पावती देणारं यंत्र नाही. पाडू हे पण एक कंट्रोल युनिटच असल्याचे गगराणी म्हणाले. मुख्यतः ऑक्सिलरी डिस्प्ले देणारं हे यंत्र आहे. जे मतदान प्रक्रिया अधिक सोपी आणि दृश्यमान बनवण्यासाठी वापरलं जाऊ शकतं.हे बॅकअप देणारं मशीन आहे. BHEL या कंपनीने हे सयंत्र तयार केलेले आहे. कंपनीने 140 पाडू युनिट मुंबई महापालिका निवडणुकीसाठी पाठवलेले आहेत. आरओकडं हे मशीन असेल. जसं ईव्हीएम असेल तसेच हे मशीन असेल.या यंत्राची तशी फारशी गरज भासणार नाही. पण बॅकअपचा एक पर्याय म्हणून पाडू मशीन उपलब्ध करून देण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर पहिल्यांदा त्याचा वापर केल्या जाईल अशी माहिती गगराणी यांनी दिली. त्यासाठी 140 पाडू युनिट दाखल झाले आहेत. त्याचा वापर होण्याची शक्यता आहे.
