काहीच पाहिले नाही, शिवसेना भवनासमोरील मुख्यमंत्री शिंदे यांचे भले मोठे कटआऊट्स हटवले; पालिकेची कारवाई

| Updated on: Jan 18, 2023 | 9:34 AM

बीकेसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताची आणि सभेची तयारी शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. स्टेजवर 50 फूट बाय 20 फूट इतकी भव्य एलईडी स्क्रीन उभारण्यात आली आहे.

काहीच पाहिले नाही, शिवसेना भवनासमोरील मुख्यमंत्री शिंदे यांचे भले मोठे कटआऊट्स हटवले; पालिकेची कारवाई
cm eknath shinde
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

विनायक डावरुंग, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याची भाजप आणि शिंदे गटाने जय्यत तयारी सुरू केली आहे. लाख ते दीड लाख लोक या सभेला आणण्यासाठी दोन्ही पक्षाने कंबर कसली आहे. त्यामुळे अख्ख्या मुंबईभर या सभेची वातावरण निर्मिती करण्यात आली आहे. मुंबईत शिंदे गट आणि भाजपने मोठमोठे बॅनर्स आणि कटआऊट्स लावले आहेत. दादरच्या शिवसेना भवनासमोरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोठे कटआऊट्स लावलण्यात आले आहेत. मात्र, मुंबई महापालिकेने आजच हे कटआऊट्स काढून टाकले आहेत. त्यामुळे शिंदे गटाला हा मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याला अवघा एकच दिवस उरला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईभर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याच्या मार्गावर त्यांच्या स्वागताचे कटआऊट्स आणि बॅनर्स लावण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही मुंबईत ठिकठिकाणी कटआऊट्स लावण्यात आले आहेत. दादरच्या शिवसेना भवनासमोरही मोठमोठे कटआऊट्स लावण्यात आले होते. मात्र, हे कटआऊट्स काढण्यात आले आहेत.

हे सुद्धा वाचा

हे कटआऊट्स थेट शिवसेना भवनासमोरच लावण्यात आल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता. त्यामुळे मुंबई महापालिकेने हे कटआऊट्स हटवले आहेत, असं सूत्रांनी सांगितलं. मात्र, राज्यात शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार असतानाच त्यांचेच कटआऊट्स हटवण्यात आल्याने शिंदे गटासाठी हा मोठा दणका असल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान मुंबईत शिंदे आणि ठाकरे गटांमध्ये बॅनरबाजीला सुरुवात झाली आहे. मुंबईच्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर एका बाजूला विकास पुरुष म्हणून नरेंद्र मोदी यांचे सरकारकडून बॅनर्स लावण्यात आले आहे.

तर दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बॅनरबाजी करण्यात आली आहे. दोन्ही गटांमध्ये वर्चस्वाचा वाद सुरू आहे. मूळ शिवसेनेच्या बॅनरवर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांचे फोटो आहेत.

तर बीकेसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताची आणि सभेची तयारी शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. स्टेजवर 50 फूट बाय 20 फूट इतकी भव्य एलईडी स्क्रीन उभारण्यात आली आहे. शिंदे गटाच्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनाही गर्दी नियंत्रित करण्याबाबत मार्गदर्शन सुरू आहे.

मोदींच्या या सभेला एक ते दीड लाख लोक सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सभेच्या ठिकाणी तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये खुर्च्या लावण्यात येत आहेत. बीकेसी मैदानाच्या चोहोबाजूला शिंदे आणि फडणवीस सरकारकडून तुफान बॅनरबाजी करण्यात आल्याने संपूर्ण वातावरण मोदीमय झालं आहे.