
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी काल रात्री आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये राडा केला. निकृष्ट दर्जाच जेवण दिलं म्हणून त्यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली. शिळा भात आणि वास येणारी डाळ दिल्याने संजय गायकवाड संतापले. या सगळ्या वादावर आपली भूमिका मांडताना संजय गायकवाड म्हणाले की, “इथे साडेपाच वर्ष मी मुंबईला येतोय. मी सहसा कधी बाहेर जेवायला जात नाही. मी रात्री 9.30 वाजता डाळ, वरण, भात, चपातीची ऑर्डर दिली. पहिला घास खाल्ल्यावर मला खूप घाणेरडं वाटलं”
“दुसरा घास खाल्ल्यावर उलटी झाली. वरणाला खूप भयंकर वास येत होता. पॉयजन सारखा हा प्रकार होता. भात शिळा होता. याआधी तीन वेळा असं जेवण आल्यानंतर मी मालकाला समज दिली. निकृष्ट जेवण घेऊन पार्सल घेऊन गाडीत बसतो. सकाळी गावी पोहोचल्यावर खूप अस्वस्थ वाटतं” असं आमदार संजय गायकवाड म्हणाले.
‘तर आम्हाला आमच्या स्टाइलमध्ये उत्तर द्यावं लागेल’
“प्रवासामुळे नाही, तर हे जेवणामुळे होतं. हे फक्त आमदाराच्याच जीवाशी खेळत नाहीयत, तर अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी, शेतकरी इथे येत असतात. कोणाच्या जेवणात सुतळी, पाल मिळते. मग्रुरीच काम चालू आहे. 10 दिवसापूर्वीचा शिळा भात आणि वरण दिलं. अशावेळी या लोकांची पूजा करायची का?” असा सवाल संजय गायकवाड यांनी विचारला. “जे वरण दिलं, ते चार-पाच दिवसापूर्वीच आहे. तुम्ही वास घेऊन पाहू शकता. वारंवार सांगून हे ऐकत नसतील, मराठी-हिंदी समजत नसेल, तर आम्हाला आमच्या स्टाइलमध्ये उत्तर द्यावं लागेल. अशा प्रकारे आमदारांच्या, जनतेच्या जिवाशी खेळणारे कॅन्टीनवाले असतील, तर गय करणार नाही” असा इशारा गायकवाड यांनी दिला.
मी नंतर विचारलं कुक, मॅनेजर कोण आहे?
“आमदार या ठिकाणी रहातात, त्यांना असं जेवण दिलं जातं. शेतकरी, अधिकारी इथे येतात. मी नंतर विचारलं कुक, मॅनेजर कोण आहे? त्याने वास घेतला, खूप घाण वास येत होता. मग, त्यांना चांगला, आपल्या स्टाइलमध्ये प्रसाद दिला. साऊथ मधल्या लोकांना हे कॅन्टीन चालवायला दिलं आहे, तेच हे काम चालवतात” असं संजय गायकवाड म्हणाले.
मरीन ड्राईव्ह पोलीस कॅन्टीनमध्ये दाखल
आमदार निवासातील ‘राडा’ प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस कॅन्टीनमध्ये दाखल झाले. चौकशी सुरू आहे. चौकशी अहवाल पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे गेल्यानंतर संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
“संजय गायकवाड यांनी जे कृत्य केल आहे ते चुकीच आहे. आम्ही त्याचं कधीच समर्थन करू शकत नाही, कारण आम्ही संविधान मानतो. यासंदर्भात त्यांनी सभागृहात आवाज उठवला पाहिजे होता. अजून अधिवेशन संपल नाही आहे. त्यामुळे धारावीच्या मुद्द्यावरून मी आवाज उचलणार आहे मी आमदार आहे त्या विभागाची” असं ज्योती गायकवाड म्हणाल्या.
“संजय गायकवाड यांनी जी मारहाण केली आहे, ती चुकीची आहे. पण त्यांनी जे मांडल ते योग्य आहे. पण संजय गायकवाड यांना राज्य सरकारने बॉक्सिंगचा ब्रँड अम्बेसेडर केला पाहिजे” असं सचिन अहिर म्हणाले. “गिरणी कामगारांना मुंबईतून बाहेर फेकण्याचा हा सरकारचा डाव आहे. मुंबईमधील जमीन ही अदानीसाठी देता, तुम्ही मग या मराठी गिरणी कामगारांवर अन्याय का करता?” असा सवाल सचिन अहिर यांनी विचारला.