रेल्वेकडून 6 गाड्या रद्द, तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 8:36 AM, 19 May 2019
रेल्वेकडून 6 गाड्या रद्द, तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक

मुंबई : रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज (19 मे) ब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेच्या मार्गावरील पायाभूत सुविधा, सिग्नल यंत्रणा, रेल्वे रुळ आणि इतर कामासाठी हा ब्लॉक असेल. तसेच मध्य रेल्वेवर कल्याण ते कसारा दरम्यानही आज ब्लॉक घेण्यात आला आहे. हा साडेतीन तासांचा विशेष ब्लॉक असल्यामुळे लांब पल्ल्याच्या सहा गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

पश्चिम रेल्वेच्या अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड दरम्यानही ब्लॉक घेण्यात आला असून हार्बर मार्गावर ब्लॉक दरम्यान सीएसएमटी ते पनवेल एकही लोकल धावणार नाही.

मध्य रेल्वे

मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा दरम्यान ब्लॉक घेण्यात आला आहे. ओव्हरहेड वायर आणि सिग्नलसह इतर अन्य इतर कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात आलाय. सकाळी 11.15 ते 3.15 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल. तसेल कल्याण-कसारा दरम्यानही मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. हा ब्लॉक साडे तीन तासांचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक असेल.

पश्चिम रेल्वे

पश्चिम रेल्वे मार्गावर सकाळी 11.30 ते दुपारी 3.30 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. डाऊन जलद मार्गावर दुपारी 12.30 ते संध्याकाळी 4.30 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.

हार्बर रेल्वे

रविवारी सीएसएमटी ते चुनाभट्टी, बांद्रा टर्मिनसवर मेगाब्लॉक असेल. अपच्या दोन्ही मार्गावर सकाळी 11.30 ते 3.40 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे, तर डाऊनच्या दोन्ही मार्गावर सकाळी 11.40 ते 4.10 पर्यंत हा ब्लॉक असेल. सीएसएमटी ते वाशी, बेलापूर आणि पनवेलला जाणाऱ्या सर्व लोकल ब्लॉक दरम्यान रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लॉक दरम्यान कुर्ला ते सीएसएमटी आणि वाशी ते पनवेल विशेष गाड्या चालवल्या जातील.

रद्द करण्यात आलेल्या एक्स्प्रेस गाड्या

आज घेण्यात आलेल्या ब्लॉक दरम्यान अनेक गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत. तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. ज्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत त्यात मनमाड-मुंबई जाणारी व येणारी राज्यराणी एक्स्प्रेस, मनमाड-कुर्ला गोदावरी एक्स्प्रेस, मुंबई-भुसावळ-मुंबई, मुंबई-भुसावळ पॅसेंजर या गाड्यांचा समावेश आहे. पुणे-भुसावळ एक्स्प्रेस या गाडीचा मार्ग बदलण्यात आला असून ती दौंड-मनमाड सोडली जाणार आहे.

उशिराने धावणाऱ्या गाड्या

नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस ही नाशिक पर्यंतच धावणार आहे. एलटीटी-मुझफ्परपूर एक्सप्रेस, मुंबई-हावडा एक्सप्रेस, एलटीटी-गोरखपूर एक्सप्रेस, एलटीटी-गोरखपूर एक्सप्रेस, मुंबई-नागपूर हॉलिडे स्पेशल एक्सप्रेस, एलटीटी- वाराणसी एक्सप्रेस, मुंबई-जबलपूर एक्सप्रेस, मुंबई-अलाहाबाद हॉलिडे स्पेशल एक्सप्रेस, जालना-दादर जनशताब्दी एक्सप्रेस या गाड्या 2 ते 3 तास उशिराने धावणार आहेत