सर्वात मोठी बातमी! मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल ट्रेनच्या लांबच्या लांब रांगा
मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. विशेष म्हणजे ऐन गर्दीच्या वेळी ही सेवा विस्कळीत झाल्यामुळे चाकरमान्यांचे आणि विद्यार्थ्यांचे मोठे हाल होण्याची शक्यता आहे. ठाकुर्ली रेल्वे स्थानकानजीक ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे वाहतुकीवर त्याचा मोठा परिणाम पडला आहे. रेल्वे गाड्यांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत. परिणामी प्रवाशांनी लोकल ट्रेन खाली उतरुन रेल्वे ट्रॅकवरुन पायी जाणं पसंत केलं आहे.

मुंबई, ठाणे जिल्ह्यात सध्या पावसाचा अलर्ट आहे. असं असताना अचानक मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. विशेष म्हणजे संध्याकाळची चार वाजेची वेळ ही चाकरमान्यांची घरी जायची वेळ असते. लाखो चाकरमानी आपल्या घराच्या दिशेला निघतात. पण अशावेळी अचानक मध्य रेल्वेची वाहतूक सेवा विस्कळीत झाली तर चाकरमान्यांचा मोठा हिरमोड होतो. विशेष म्हणजे आज आठवड्याचा पहिलाच दिवस आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेची सेवा अशाप्रकारे विस्कळीत झाल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे. विशेष म्हणजे सध्या मध्य रेल्वे विस्कळीत झाल्यामुळे रेल्वे रुळावर लोकल ट्रेनच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत. लोकल ट्रेन एकाच जागेवर उभ्या राहिल्यामुळे प्रवासी वैतागले आहेत.
मध्य रेल्वे मार्गावर ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हर हेड वायर तुटल्याने मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडून कल्याणकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या लोकल ट्रेन गेल्या अर्ध्या तासापासून रखडल्या आहेत. एका मागे एक अशा लोकल ट्रेनच्या रांगा लागल्या आहेत.
विशेष म्हणजे लांब पल्ल्यांच्या गाड्या देखील यामुळे रखडल्या आहेत. तर ओव्हरहेडचा स्फोट ऐकून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते बदलापूर जाणाऱ्या लोकल ट्रेन मधील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लोकल ट्रेनमध्ये असलेल्या प्रवाशांना मदत करत थांबलेल्या लोकल ट्रेन मधून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. अनेक प्रवासी खाली उतरून रेल्वे रुळावरुन चालत पुढे जात आहेत.
लोकलचे वेळापत्रक कोलमडले
कल्याण – डोंबिवली रेल्वे स्थानका जवळ जलद मार्गावर ओव्हर हेड व्हायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे. अप आणि डाऊन दोन्ही दिशेने जाणाऱ्या जलद लोकल २५ ते ३० मिनिटं उशिराने धावत आहेत. तर अप आणि डाऊन जाणाऱ्या स्लो लोकल १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहेत. काही लोकल ट्रेन रद्दही करण्यात आल्या आहेत. या तांत्रिक बिघाडामुळे ठाणे, ठाकुर्ली आणि कल्याण रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी बघायला मिळत आहे.
रेल्वे प्रशासनाकडून तातडीने दुरुस्तीचं काम सुरु करण्यात आलं आहे. जिथे ओव्हर हेड वायर तुटली आहे तिथे संबंधित कर्मचारी तांत्रिक अडचणी दूर करण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर घटनास्थळी पोलीसही तैनात आहेत. पोलिसांकडून सर्व काळजी घेतली जात आहे.
