Central Railway : मध्य रेल्वेवर अपघात, प्रवाशांचे हाल, नेमकं काय घडलं?
मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी मोठी बातमी! डोंबिवली आणि ठाकुर्ली स्थानकांदरम्यान रिकाम्या लोकलचा डबा रुळावरून घसरल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या या घटनेमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.

मध्ये रेल्वेवर आज सकाळी ऐन गर्दीच्या वेळी एक मोठा अपघात झाला. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. डोंबिवली स्थानकाजवळ कळवा कारशेडकडून येणाऱ्या एका रिकाम्या लोकलचा डबा रुळावरुन घसरला. यामुळे सीएसएमटीकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली. यामुळे अनेक प्रवासी ट्रॅकवर उतरुन चालत जात असल्याचे पाहायला मिळत आहे.
नेमकं काय घडलं?
आज सकाळी ८ च्या दरम्यान ही घटना घडली. कळवा कारशेडमधून एक रिकामी लोकल गाडी कल्याणच्या दिशेने जात होती. त्याचवेळी डोंबिवली आणि ठाकुर्ली स्थानकांदरम्यान या गाडीचा एक डबा अचानक रुळावरून खाली उतरला. सुदैवाने, ही लोकल रिकामी होती. यात कोणताही प्रवाशी प्रवास करत नव्हता. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघातामुळे मध्य रेल्वेच्या अप मार्गावर म्हणजेच मुंबईकडे जाणाऱ्या लोकल वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.
यामुळे गाड्यांचा खोळंबा पाहायला मिळत आहे. सध्या अप मार्गावरील ३ गाड्या जागीच थांबल्या आहेत. ज्यामुळे प्रवाशांना मोठा विलंब होताना पाहायला मिळत आहे. तसेच सध्या स्थानकांवर गर्दी पाहायला मिळत आहे. कामावर जाण्याची वेळ असल्याने डोंबिवली, कल्याण आणि ठाकुर्ली या स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी जमली आहे. अनेक लोकल गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. यामुळे काही गाड्या रद्द करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
घसरलेला डबा पुन्हा रुळावर आणण्याचे काम सुरु
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि तांत्रिक पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. रेल्वे प्रशासनाकडून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. सध्या घसरलेला डबा पुन्हा रुळावर आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. शक्य तितक्या लवकर वाहतूक पूर्ववत करण्याचे आश्वासन रेल्वेने दिले आहे. मात्र यामुळे प्रवाशी सतंप्त झाले आहेत.
प्रवाशी सतंप्त
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि घसरलेला डबा पुन्हा रुळावर चढवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. मात्र, या तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले असून, दुपारपर्यंत गाड्या उशिरानेच धावण्याची शक्यता आहे. रेल्वेच्या या वारंवार होणाऱ्या तांत्रिक समस्यांमुळे आणि ऐन गर्दीच्या वेळी खोळंबा झाल्यामुळे नोकरदार वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. जोपर्यंत वाहतूक पूर्णपणे पूर्ववत होत नाही, तोपर्यंत प्रवाशांना धीर धरण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.;