तीन दिवसांनंतर चंद्रशेखर ‘आझाद’

तीन दिवसांनंतर चंद्रशेखर 'आझाद'

मुंबई : भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद हे अखेर तीन दिवसांनंतर नजरकैदेतून सुटले आहेत. मालाड येथील मनाली हॉटेलमधून तीन दिवसांनंतर चंद्रशेखर आझाद बाहेर आले. मनाली हॉटेलबाहेर शेकडोंच्या संख्येत पोलिसांनी बंदोबस्त देऊन, एकप्रकारे चंद्रशेखर आझाद यांना बंदिस्त करुन नजरकैदेत ठेवले होते. त्यावरुन राज्यभर संतापाची लाट पसरली होती. अखेर आज तीन दिवसांनंतर चंद्रशेखर आझाद हॉटेलच्या बाहेर आले. […]

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:46 PM

मुंबई : भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद हे अखेर तीन दिवसांनंतर नजरकैदेतून सुटले आहेत. मालाड येथील मनाली हॉटेलमधून तीन दिवसांनंतर चंद्रशेखर आझाद बाहेर आले. मनाली हॉटेलबाहेर शेकडोंच्या संख्येत पोलिसांनी बंदोबस्त देऊन, एकप्रकारे चंद्रशेखर आझाद यांना बंदिस्त करुन नजरकैदेत ठेवले होते. त्यावरुन राज्यभर संतापाची लाट पसरली होती. अखेर आज तीन दिवसांनंतर चंद्रशेखर आझाद हॉटेलच्या बाहेर आले. यावेळी शिक्षक आमदार कपिल पाटील हेही उपस्थित होते.

चंद्रशेखर आझाद आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळी म्हणजेच चैत्यभूमीवर, त्यानंतर ते पुण्याला रवाना होणार आहेत. भीमा कोरेगावलाही जाणार आहे आणि सभाही घेणार आहे, असा निर्धारही चंद्रशेखर आझाद यांनी केला आहे.

भीमा कोरेगावमध्ये दंगली घडवल्याचा ज्यांच्यावर आरोप आहे, ते मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे हे बाहेर आहेत. मात्र, मला नजरकैदेत ठेवलं जात आहे, अशी खंत चंद्रशेखर आझाद यांनी व्यक्त केली. तसेच, महाराष्ट्रात संविधानाची हत्या केली जाते आहे. खुर्चीचा दुरुपयोग केला जातो आहे. हे देशालाही कळले पाहिजे. डॉ. बाबासाहेबांच्या संविधानानुसार लढतोय, तरी मला ताब्यात घेतले जाते. राज्य सरकारविरोधात आम्ही हायकोर्टात जाऊ, असा इशाराही चंद्रशेखर आझाद यांनी यावेळी दिला.

आमदार जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया

“चंद्रशेखर आझाद यांना भीमा कोरेगावला जाऊ देतील का, याबाबत माझ्याही मनात शंका आहे. मात्र, त्यांना चैत्यभूमीला का जाऊ दिले जात नाही? हे कळत नाहीय. राज्य सरकारच राज्यात तणावाचं वातावरण निर्माण करतंय. राज्यात संविधान आहे की नाही, असे वाटू लागलंय.” अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर आझाद हॉटेलबाहेर आल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना दिली.

राज्यभरातील समर्थक मुंबईच्या दिशेने रवाना

चंद्रशेखर आझाद यांना नजरकैदेत ठेवल्याने राज्यभरातील भीम आर्मीचे समर्थक मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. तसेच, मालाडमधील मनाली हॉटेलबाहेर सुद्धा अनेक समर्थक जमा झाले होते. त्यामुळे सुरक्षेचाही मोठा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर चंद्रशेखर यांना ‘आझाद’ करण्यात आले आहे.

सभेला परवानगी नाहीच!

मुंबईतील वरळी येथील जांबोरी मैदानात सभा घेण्यास भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना सभा घेण्यास मनाई करण्यात आली होती. त्यानंतर ते मालाड येथील मनाली हॉटेलमध्येच थांबले. तिथे त्यांना शेकडो पोलिसांच्या गराड्यात एकप्रकारे नजरकैदेत ठेवण्यात आले होते. आता आझाद हे पुण्याला रवाना होणार आहेत. मात्र, तिथेही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सभेला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे चंद्रशेखर आजाद आता कुठे सभा घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, भीम आर्मीच्या पुण्यातील सभेला परवानगी मिळवण्यासाठी अॅड. नितीन सातपुते यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. व्हेकेशन कोर्टाकडे नितीन सातपुते यांनी अर्ज केला आहे. तसेच, चंद्रशेखर आझाद यांना कोणत्या कलमाद्वारे नजरकैदेत ठेवले आहे, अशीही विचारणा केली आहे.

VIDEO : पाहा चंद्रशेखर आझाद काय म्हणाले?


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें