CM Uddhav Thackeray: 25 वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री असावा, कामाला लागा; मुख्यमंत्र्यांचे शिवसेना जिल्हाप्रमुखांना आदेश

| Updated on: May 15, 2022 | 3:56 PM

CM Uddhav Thackeray: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज वर्षा निवासस्थानी जिल्हाप्रमुखांच्या बैठकीचं आयोजन केलं होतं. काल सर्व जिल्हाप्रमुख सभेला आले होते.

CM Uddhav Thackeray: 25 वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री असावा, कामाला लागा; मुख्यमंत्र्यांचे शिवसेना जिल्हाप्रमुखांना आदेश
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई: वांद्र्याच्या बीकेसी मैदानावर दणदणीत सभा पार पडल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज सर्व जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावली. वर्षा निवासस्थानी ही बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी गाव तिथे शिवसेना (shivsena) शाखा स्थापन करण्याचे आदेश सर्वच जिल्हा प्रमुखांना दिले. तसेच शिवसेना गावागावात पोहोचवाच. पण 25 वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री राहील असं काम करा. त्यासाठी आतापासूनच कामाला लागा, असे आदेशच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्हाप्रमुखांना दिले आहे. राज्य सरकारला (maha vikas aghadi) अडिच वर्ष पूर्ण झाले आहेत. विधानसभा निवडणुकीला अजून अडिच वर्ष बाकी आहेत. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आता पासूनच संघटनेच्या बळकटीवर लक्ष दिलं आहे. राज्यात शिवसेना नंबर वन करण्यासाठी शिवसेनेचा प्रयत्न आहे. त्याचाच एक भाग म्हणून आजच्या बैठकीकडे पाहिले जात आहे. शिवाय येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्याही निवडणुका होत असून त्यानुषंगानेही शिवसेनेची बांधणी करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज वर्षा निवासस्थानी जिल्हाप्रमुखांच्या बैठकीचं आयोजन केलं होतं. काल सर्व जिल्हाप्रमुख सभेला आले होते. त्या सर्वांना शहरात थांबण्यास सांगितलं होतं. त्यानुसार आज दुपारीच मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्हा प्रमुखांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना प्रत्येक जिल्ह्यात आणि गावात कशी जाईल याबाबत मार्गदर्शन केलं. पक्षाचं शिवसंपर्क अभियान सुरू आहे. या अभियानांतर्गत शिवसेना गावागावात पोहोचवा, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

गाव तिथे शिवसेना शाखा संकल्पनेवर काम करा

राज्यात आपली सत्ता आहे. लोकांच्या आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत. त्यामुळे शाखेत बसा. येणाऱ्या प्रत्येकांच्या समस्या ऐकून घ्या. त्या समस्या सोडवा. लोकांशी संवाद साधा. त्यांचे प्रॉब्लेम समजून घ्या. त्यांचे प्रश्न सुटले पाहिजे. लोकांचा अपेक्षाभंग होता कामा नये. गाव तिथे शिवसेना शाखा निर्माण करणाऱ्या संकल्पनेवर काम करा. येणाऱ्या काळात शिवसेना वाढली पाहिजे. त्याचबरोबर पुढील 25 वर्ष राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री असला पाहिजे. त्यानुषंगाने कामाला लागा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिल्याचं पुण्यातील शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब रामदास चांदोरे यांनी सांगितलं.

विरोधकांच्या आरोपांना उत्तर द्या

त्याचबरोबर शिवसेनेवर भारतीय जनता पार्टी किंवा विरोधकांकडून सध्या उठसुठ आरोप केले जात आहेत. म्हणून विरोधकांच्या आरोपांना उत्तर कसं द्यायचं याची तयारी करण्याचे निर्देश आज झालेल्या बैठकीमध्ये द्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांना दिले आहेत. लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबादमध्ये विशाल सभा आयोजित केली जाणार आहे. त्या बाबतही जिल्हाप्रमुखाना निर्देश देण्यात आले आहेत, असंही चांदोरे यांनी सांगितलं.