मुक्त संचार केला तर निर्बंध अधिक कडक करणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मुंबईकरांना इशारा

| Updated on: May 31, 2021 | 3:22 PM

मेट्रोच्या कार्यक्रमाला येताना मला मुंबईत मोठी वाहतूक कोंडी दिसली. ही चिंता करणारी गोष्ट आहे. (cm uddhav thackeray warns mumbaikars over coronavirus)

मुक्त संचार केला तर निर्बंध अधिक कडक करणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मुंबईकरांना इशारा
uddhav thackeray
Follow us on

मुंबई: मेट्रोच्या कार्यक्रमाला येताना मला मुंबईत मोठी वाहतूक कोंडी दिसली. ही चिंता करणारी गोष्ट आहे. कोरोना अजूनही संपलेला नाही. त्यामुळे मुक्त संचार केला तर याद राखा, निर्बंध अधिक कडक केले जातील, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईकरांना दिला. (cm uddhav thackeray warns mumbaikars over coronavirus)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मेट्रोच्या 2 ए आणि 7 या मार्गिकेच्या चाचण्यांचा शुभारंभ झाला. यावेळी त्यांनी हा इशारा दिला. मी कार्यक्रमाला येत असताना मुंबईची ट्रॅफिक पाहून अचंबित झालो. त्यामुळे काल जनतेशी संवाद साधताना चुकून निर्बंध उठवण्याची मी घोषणा केली काय असं वाटलं. त्यामुळे मी असं काही बोललो का याची काही जणांकडे चौकशी केली. पण मी तसं काही बोललो नसल्याचं लक्षात आलं. मी कोणतेही निर्बंध उठवलेले नाहीत. कोरोनाचा धोका अजून संपलेला नाही. पण रहदारी अशीच वाढली आणि नागरिकांचा मुक्त संचार असाच सुरू राहिला तर निर्बंध कडक करावे लागतील, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.

‘आठवले’ तर सांगतो

यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना केंद्रातून राज्याला मदत मिळवून देण्याचं आवाहन केलं. रामदास आठवले हे माझे शेजारी आहेत. त्यांनी राज्यासाठी लागणारी मदत मिळवून देण्याकरीता केंद्रात प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. तुम्ही ती मदत कराच, पण अजून काही ‘आठवले’ तर अजून सांगतो, अशी कोटी मुख्यमंत्र्यांनी केली. त्यामुळे एकच खसखस पिकली.

एमएमआरडीएच्या टीमचं कौतुक

बऱ्याच दिवसानंतर मी प्रत्यक्ष कार्यक्रमाला उपस्थित आहे. विकासाला वेग देणारा हा कार्यक्रम आहे. गेली वर्षभरही कार्यक्रम झाले. पण कोविड सेंटर उघडा, चाचणी केंद्राचं उद्घाटन करा, ऑक्सिजन प्लांट उघडा आदी कार्यक्रमच केली जात होती. दीड वर्षानंतर हा वेगळा कार्यक्रम होत आहे, असं सांगतानाच आताही आपण कोरोनाग्रस्त आहोत. कोरोना संपलेला नाही. सर्व जग ठप्प झालेलं असताना, आयुष्य ठप्प झालेलं असताना कामाचा वेग मंदावला असेल पण तुम्ही काम थांबवू दिलं नाही, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएच्या टीमचं कौतुक केलं. निर्बंध उठतील तेव्हा उठतील पण पूर्वीपेक्षा अधिक जोमानं काम करण्यासाठी आणि आयुष्य गतीमान करण्यासाठी ही कामं होत आहे, असंही ते म्हणाले. (cm uddhav thackeray warns mumbaikars over coronavirus)

 

संबंधित बातम्या:

मुंबईत मेट्रोच्या चाचणीला सुरुवात, मानापमान नाट्य आणि भाजपच्या निदर्शनाने गोंधळ

Break the chain : लॉकडाऊनमध्ये काय सुरु काय बंद? तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं

अल्पवयीन तरुणाची आत्महत्या, कुटुंबियांनी मृतदेहासोबत प्रेयसीचं लगीन लावलं

(cm uddhav thackeray warns mumbaikars over coronavirus)