मुख्यमंत्र्यांचं राज्यातील डॉक्टरांना खास पत्र, म्हणाले, ‘तु्मच्यामुळेच कोरोना लढ्याचा गोवर्धन पेलणं शक्य झालं!’

आंतराष्ट्रीय डॉक्टर्स दिनाचं (Doctors Day) औचित्य साधून राज्यातील डॉक्टरांना मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्र लिहिलं आहे. (Cm Uddhav Thackeray Wrote a Letter To Doctors occasion of Doctors Day 2021)

मुख्यमंत्र्यांचं राज्यातील डॉक्टरांना खास पत्र, म्हणाले, 'तु्मच्यामुळेच कोरोना लढ्याचा गोवर्धन पेलणं शक्य झालं!'
उद्धव बाळासाहेब ठाकरे (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य)
Follow us
| Updated on: Jul 01, 2021 | 2:54 PM

मुंबई : आंतराष्ट्रीय डॉक्टर्स दिनाचं (Doctors Day) औचित्य साधून राज्यातील डॉक्टरांना मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्र लिहिलं आहे. कोरोना काळात मागील दीड वर्षापासून डॉक्टर्स करीत असलेल्या कामाबद्दल या पत्रातून मुख्यमंत्र्यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. डॉक्टरांमुळेच कोरोना लढ्याचा गोवर्धन पेलणं शक्य झालं, असं म्हणत तुमची साथ इथून पुढेही हवी असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.  (Cm Uddhav Thackeray Wrote a Letter To Doctors occasion of Doctors Day 2021)

डॉक्टरांना लिहिलेल्या पत्रात मुख्यमंत्री म्हणतात….

मागील वर्ष दीड वर्षांपासून आपण सगळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या उतारावर उभे आहोत. आज काही प्रमाणात संसर्गाचे प्रमाण कमी झालेले दिसत असले तरी संभाव्य तिसऱ्या लाटेला सामोरे जाताना वैद्यकीय क्षेत्राची जबाबदारीही अधिक वाढली आहे. आजपर्यंत कोविडचा लढा आपण लढलो ते तुम्हा डॉक्टर्स आणि वैद्यकीय क्षेत्रातल्या योद्ध्यांमुळे, आणि पुढेदेखील हे आव्हान आपण पेलणार आहोत ते आपल्याच भक्कम साथीने असा विश्वास मला आहे.

अदृश्य शत्रू कधी कोणावर झडप घालेल हे सांगता येत नाही.

कोविडची महामारी ही रोज घडणारी गोष्ट नसते. अशा घटना, अशी महामारी कित्येक वर्षातून एकदा येते आणि तिच्याशी झुंजताना तुमचा माझा सगळ्यांचा कस लागतो. सीमेवरील युद्ध वेगळं असतं. तिथं शत्रू आपल्यासमोर असतो पण कोविडसारख्या रोगराईविरुध्दचे युद्ध ही वेगळी गोष्ट आहे. इथे शत्रू डोळ्यांनी दिसतदेखील नाही आणि तरीही लढाई सुरू आहे. रुग्णांचे सर्वेक्षण, प्रयोगशाळेतील चाचण्या रुग्णांवरील उपचार या साऱ्या बाबी जीवावर बाजी लावून आपण सारे करीत आहोत कारण हा अदृश्य शत्रू कधी कोणावर झडप घालेल हे सांगता येत नाही.

राज्य कोरोनाची लढाई तुमच्याशिवाय लढू शकत नाही, लढू शकणार नाही

कोविडच्या या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत डॉक्टर म्हणून या कोविड विरोधी युद्धातील आघाडीचे योद्धे म्हणून आपण सर्वांनी जे मोलाचे योगदान दिले आहे, ते शब्दातीत आहे. मी मधल्या काळात आपणाशी वेगवेगळ्या निमित्ताने संवाद साधला आहे, आपल्या सूचनादेखील ऐकून घेतल्या आहेत. डॉक्टर, मग ते सरकारी हॉस्पिटलमध्ये काम करणारे असोत की खासगी हॉस्पिटलमध्ये काम करणारे असोत, प्रत्येकाने जीवाची बाजी लावून आलेल्या प्रत्येक रुग्णाला जीवदान देण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले आहे. महाराष्ट्र ही लढाई तुमच्याशिवाय लढू शकत नव्हता आणि लढू शकणार नाही.

डॉक्टरांचं काम शब्दात सांगण्याजोगं नाही

कोविडविरुद्धच्या या लढाईमध्ये अनेक डॉक्टरांनी आपले प्रण देखील गमावले आहेत, आपले कुटुंबीय गमावले आहेत. घरातील जिवलग व्यक्ती कोविडमध्ये मृत्युमुखी पडल्यानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी पुन्हा आपल्या रणांगणात, आपल्या हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवेसाठी रुजू झालेले डॉक्टर मी पाहिले आहेत. महिना महिना घराकडे पाठ फिरवून निव्वळ रुग्णसेवेला वाहून घेतलेले डॉक्टर्स मी पाहिले आहेत. हे सगळे शब्दांत मांडता येणार नाही. या कठीण काळात राज्यातील सर्वसामान्य जनतेला तुम्ही जो मोलाचा आधार दिला आहे, त्याबद्दल महाराष्ट्र आपला सदैव कृतज्ञ राहील.

तुमच्या हाताला संजीवन स्पर्शाची जादू रोज गवसावी

तुमच्या हाताला संजीवन स्पर्शाची जादू रोज गवसावी आणि तुमच्या हातून असंख्य जीव बरे व्हावेत, हीच माझी अपेक्षा आहे, आणि म्हणूनच आज तुमचे आभार मानताना तुम्हाला एक विनंती मी संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने करणार आहे.

तुमची साथ मला हवी आहे

कोविडविरुद्धचे हे युद्ध अजून संपलेले नाही, हे आपण जाणताच आणि म्हणून येणाऱ्या काळातही तुमची सेवा, तुमचे समर्पण, तुमचे कौशल्य आम्हाला हवे आहे. तुम्ही छोट्याशा खेडेगावात काम करत असा की मोठ्या सुसज्ज हॉस्पिटल मध्ये तुम्ही सगळेच माझ्यासाठी महत्त्वाचे आहात. तुम्ही घरगुती विलगीकरणातील रुग्णाला सल्ला देत असाल की आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर असलेल्या गंभीर रुग्णाला वैद्यकीय कौशल्य पणाला लावून वाचवत असाल, तुमची प्रत्येक कृती या राज्याला आणि या राज्याच्या प्रत्येक नागरिकाला कोविडच्या विळख्यातून वाचविण्यासाठी महत्त्वाची आहे.

कोरोना काळात मंदिरं बंद पण डॉक्टररुपी देव कार्यरत

मला येथे मुद्दाम नमुद करावे वाटते की कोविड उपचार सुरु असतानाही राज्यातील डॉक्टरांनी तितक्याच आत्मीयतेने नॉन कोविड उपचार जसे बाळंतपणे, मेडीकल इमर्जंसी, बालकाचे आजार यावरही उपचार दिले आहेत. ही बाबसुध्दा निश्चितच कौतुकास्पद आहे. कोविड काळात देवळे आणि धार्मिक स्थळे बंद होती मात्र डॉक्टर्सच्या रूपाने देवदूत आपल्यात होते अशी माझी भावना आहे. या डॉक्टर्सचा पूर्ण सन्मान करणे आणि त्यांच्याप्रति आदर बाळगणे, त्यांच्या बाबतीत कुठलीही हिंसात्मक कृती होऊ नये याची सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे असे मला वाटते.

कोविड विरोधी लढाईचा हा गोवर्धन पेलणे तुमच्याशिवाय शक्य नाही

ज्या डॉ. बी. सी. रॉय यांच्या स्मरणार्थ आपण राष्ट्रीय 1 जुलैला हा डॉक्टर दिवस साजरा करतो ते डॉ. रॉय बंगालचे मुख्यमंत्री असताना रोज काही वेळ गरीब, गरजू रुग्णांवर उपचार करण्यासाठी राखीव ठेवत. त्यांची वैद्यकीय सेवेप्रति ही प्रखर निष्ठा आजही अनुकरणीय आहे. आज डॉक्टर दिनाच्या निमित्ताने मी आपल्याला आवाहन करतो की, आपणही आपल्या सेवा शक्य तिथे कोविड आणि नॉन-कोविड रुग्णांसाठी प्रदान कराव्यात. त्यामुळे आपल्या सक्षम कोविड विरोधी लढाईचा हा गोवर्धन पेलणे राज्याला शक्य होणार आहे.

(Cm Uddhav Thackeray Wrote a Letter To Doctors occasion of Doctors Day 2021)

हे ही वाचा :

‘तुम्हाला दीर्घायुष्य लाभो, तुमच्या कार्याला सलाम’, आरोग्यमंत्री टोपेंचं राज्यातल्या डॉक्टरांना भावनिक तितकंच कणखर पत्र

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.