राज ठाकरेंच्या मदतीला काँग्रेस धावली, भोजपुरी सुपरस्टार ‘निरहुआ’ला भरला दम

Congress came to defend Raj Thackeray : भोजपुरी सुपरस्टार निरहुआच्या वक्तव्याने सध्या नवीन वादाला तोंड फुटले आहे. हिंदी-मराठी वाद समजून न घेताच त्याने वायफळ बडबड केली आहे. तर या वादापासून अलिप्त असणार्‍या काँग्रेसने त्यात उडी घेतली आहे.

राज ठाकरेंच्या मदतीला काँग्रेस धावली, भोजपुरी सुपरस्टार निरहुआला भरला दम
राज ठाकरेंसाठी काँग्रेस मैदानात
Image Credit source: गुगल
| Updated on: Jul 06, 2025 | 3:39 PM

‘मी मराठी बोलत नाही, दम असेल तर महाराष्ट्रातून काढून दाखवा’, अशी मुक्ताफळं भोजपुरी सुपरस्टार निरहुआ, दिनेश लाल यादव या अभिनेत्याने उधळली. हिंदी-मराठी वादाची त्याच्या या वायफळ बडबडीला किनार आहे. काल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे मराठीच्या मुद्यावरून एकत्र आल्यापासून अनेक जण असंबद्ध बडबड करून स्वतःचे हसे करून घेत आहेत. त्यात निरहुआ पण सहभागी झाला. कालच्या विजयी मेळाव्याला काँग्रेसने दांडी मारली होती. पण आज काँग्रेस राज ठाकरेंच्या मदतीला धावली. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने या भोजपूरी अभिनेता आणि नेत्याला चांगलाच सोलपटून काढला.

काय म्हणाला दिनशे लाल यादव?

दोन ठाकरे 18 वर्षांनी एका मंचावर आले. त्यांनी मराठीचा हुंकार भरला. तर मुंबईत येऊन मराठी लोकांवर जो दादागिरी करेल, त्याला त्याच भाषेत उत्तर देण्याचा इशारा दिला. मुंबईत मराठीत बोलण्याचा आग्रह दोन्ही बंधूंनी धरला. त्यावरून आता भाषिक राजकारण पुन्हा तापले आहे. अनेक नेते आणि अभिनेत्यांनी दादागिरीची भाषा वापरल्याने वाद विकोपाला जाण्याची चिन्ह आहेत.

भाजप नेता आणि अभिनेता दिनेश लाल यादव याने मीरा रोडवरील फास्ट फूड विक्रेत्याला मनसे कार्यकर्त्यांनी कानफडवल्याविरोधात प्रतिक्रिया दिली आहे. मी मराठी बोलत नाही, मी भोजपुरी बोलतो. मी सर्वांना आव्हान देतो की जर तुमच्यात हिंमत असेल तर मला महाराष्ट्रातून हाकलून दाखवा, असे तो म्हणाला. त्याच्या या वक्तव्यावर आता काँग्रेसने त्याचे कान टोचले आहेत.

विजय वडेट्टीवार यांनी फटकारले

दिनेश लाल यादव निरहुआ भोजपुरी कलाकार असला तरी महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या भरोशावर मोठा झाला आहे, एखाद्या भाषेचा असा आव्हान करणं म्हणजे त्या खासदाराच्या बुध्दीची दिवाळखोरी आहे, तू महाराष्ट्रात येऊन उभा रहा म्हणजे कळेल तुला तुझी भोजपुरी कुठे आहे? असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी त्याला फटकारले आहे.

तर यावेळी त्यांनी भाजप नेते आशिष शेलार यांच्यावर पण टीका केली आहे. दोन भाऊ एकत्र आल्यामुळे शेलार यांना पहलगाम आठवायला लागलं आहे, तुम्ही पाकिस्तानात जाऊन शंभर अतिरेकी मारल्याचं छाती ठोकून सांगत आहेत. मात्र पहलगामचे चार आतंकवादी अजून सापडलेले नाही, पुलवामा मध्ये अडीचशे किलो आरडीएक्स आलं, तुम्ही लोकांना वारंवार मूर्ख बनवू शकत नाही, त्यामुळे यांची भीती साहजिक आहे, दोन भाऊ एकत्र आल्यामुळे शेलार यांची पंचायत झाली आहे म्हणून ते असं वक्तव्य करत आहे, असा खरमरीत टोला वडेट्टीवार यांनी लगावला आहे.