कबुतरखान्याच्या आंदोलनात ठाकरे बंधूंची एन्ट्री होणार? कुणी दिलं आवतन? आज काय घडणार?
दादरमधील कबुतरखान्यामुळे आरोग्य समस्या निर्माण झाल्याने मुंबई महापालिकेने ते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय हायकोर्टानेही मान्य केला आहे. परंतु, अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. मराठी एकीकरण समिती या निर्णयाला पाठिंबा देत आंदोलन करत आहे.

मुंबईसह आजूबाजूच्या कबुतरखान्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होतात. त्यामुळे मुंबई महापालिकेने कबुतरखाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच आज मुंबईतील कबुतरखान्यासंदर्भात मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडणार आहे. आता दादरमधील कबुतरखान्याच्या मुद्द्यावरून आता मराठी एकीकरण समिती आक्रमक झाली आहे. या समितीने आज आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी कबुतरखान्याच्या विरोधात न्यायालयाचा निर्णय असूनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी याप्रकरणी पोलीस उपायुक्तांना निवेदन देणार असल्याचे सांगितले.
दादरच्या कबुतरखान्याबाबत मराठी एकीकरण समितीने हायकोर्टाच्या निर्णयाच्या समर्थनार्थ आज आंदोलनाची हाक दिली आहे. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. त्यामुळे परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी दादरमधील कबुतरखाना परिसरातील दुकाने दुपारी एक वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी परिसरातील जैन मंदिराचा मुख्य दरवाजाही बंद ठेवण्यात आला आहे.
मराठी एकीकरण समितीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दादरच्या कबुतरखाना परिसरात १५० पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिवाजी पार्क, दादर, शाहू नगर, धारावी, व्हि. बी. नगर, माहीम आणि कुर्ला पोलीस ठाण्यांमधील पोलीस कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत. याशिवाय, राज्य राखीव दलाची अतिरिक्त कुमकही मागवण्यात आली आहे.
गोवर्धन देशमुख काय म्हणाले?
आता याबद्दल मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गोवर्धन देशमुख यांनी जैन समाजाने केलेल्या आंदोलनावर आक्षेप घेतला आहे. “आम्ही कोणतेही आंदोलन करणार नाही. आम्ही फक्त पोलीस उपायुक्त यांना निवेदन देणार आहोत. कबुतर खाण्याच्या विरोधात कोर्टाने निकाल दिला आहे. त्यामुळे कोर्टाचा मान राखणं हे पोलिसांचं काम आहे. जैन समाजाच्या लोकांनी कबुतरखान्याच्या समर्थनार्थ आंदोलन केलं, त्या आंदोलनात त्यांनी पोलिसांना धक्काबुक्की केली. चाकूने ताडपत्री फाडली तरी त्यांच्यावर कोणतेच गुन्हे दाखल केले नाही. हा दुटप्पीपणा आहे. एकीकडे आम्ही मराठी माणसाच्या हक्क करिता आंदोलन करतो तर आमच्यावर गुन्हे दाखल होतात. आपण पारतंत्र्यात राहतो की काय असा वाटत आहे. ७८ वर्ष झाली आहे हा देश स्वतंत्र होऊन तरी देखील अशी दडपशाही केली जाते”, असे गोवर्धन देशमुख म्हणाले.
राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवारांनी उपस्थित राहावे
मराठी एकीकरण समितीने स्थानिक रहिवाशांच्या प्रश्नांसाठी आणि या चळवळीत सहभागी होण्यासाठी राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह इतर राजकीय नेते, सामाजिक संस्था आणि आरोग्यविषयक संस्थांना दादरच्या कबुतरखाना येथे उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी पालिकेच्या घनकचरा विभागाचे कर्मचारीही येथे तैनात आहेत.
स्थानिक नागरिकांचा रोष वाढला
दादर येथील कबुतरखान्याच्या विरोधात स्थानिक नागरिकांचा रोष वाढत आहे. अनेक रहिवाशांनी कबुतरखान्याला विरोध दर्शवला असून, आज मराठी एकीकरण समितीने पुकारलेल्या आंदोलनाला त्यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी न होता, अनेक नागरिकांनी आपल्या इमारतींच्या खाली बसून या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. कबुतरांमुळे होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतरही कबुतरखान्यावर योग्य कारवाई होत नसल्याने त्यांच्यात नाराजी आहे.
