MNS : दहीसरमध्ये दोन परप्रांतीय बाऊन्सर्सचा मराठी बोलण्यास नकार, पण मनसेने इंगा दाखवताच….
MNS : ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’, असं म्हटल्यास चुकीच ठरणार नाही. सध्या मुंबई आणि शेजारच्या महानगरात मराठी माणसावर, मराठी भाषेवर अन्याय होत असल्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. मुंब्रा, कल्याणनंतर आता दहीसरमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे.

मागच्या काही दिवसात मुंबई आणि शेजारच्या ठाण्यात मराठी-हिंदी भाषा वादाच्या घटना घडल्या आहेत. आता दहीसरमध्ये सुद्धा मराठी-हिंदी भाषेवरुन वाद झाल्याच असच एक प्रकरण समोर आलं आहे. ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’, असं म्हटलं तर काही चुकीच नाही. दोन परप्रांतीय बाऊन्सर्सनी मराठी बोलण्यास नकार दिला. त्यानंतर मनसेने आपल्या स्टाइलने समाचार घेतला. त्यानंतर दोन्ही परप्रांतीय बाऊन्सर्सनी मनसे कार्यकर्त्यांसमोर मराठीत माफी मागितली. दहिसर येथील एका हॉटेलमध्ये मराठी माणूस गेला होता. तिथे परप्रांतीय बाऊन्सर उभे होते. त्यानंतर बाऊन्सर आणि मराठी माणूस यांच्यात मराठी बोलण्यावरून वाद सुरू झाला. दोन्ही बाऊन्सर्सनी मराठी बोलण्यास आणि समजून घेण्यास नकार दिला. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी दोन्ही बाऊन्सर्सची दखल घेतली. त्यावेळी या दोन्ही परप्रांतीय बाऊन्सरनी मराठीत माफी मागितली.
नव्या वर्षाच्या सुरुवातीला मुंब्र्यात एक घटना घडली होती. मराठी तरुण मुंब्र्यातील फळ विक्रेत्याकडून फळ घेताना भाषित वादाची घटना घडली होती. मराठी तरुणाने फळ विक्रेत्याला मराठीत बोलण्यास सांगितलं. त्यावर मला मराठी येत नाही. मी हिंदीत बोलणार, असं फळ विक्रेता बोलला. त्यावर मराठी तरुणाने “महाराष्ट्रात रहायचे असेल तर मराठी आलेच पाहिजे, मी मुंब्रा बंद करुन टाकेन”, असं बोलला. त्यावेळी इतर फळ विक्रेते आणि स्थानिक रहिवाशांनी एकत्र येवून मराठी तरुणाला घेरलं. जमावाने त्याला कान पकडून माफी मागायला लावली होती. या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झालेले.
कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण
त्याआधी मागच्यावर्षी डिसेंबर महिन्यात कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण झाली होती. कल्याण पश्चिमेला उच्चभ्रू सोसायटीत वाद झाला होता. दोन अमराठी कुटुंबियांमध्ये भांडण सुरु होतं. या दोन्ही अमराठी कुटुंबियांमधील वाद मिटवण्यासाठी शेजारी राहणारे धीरज देशमुख यांनी हस्तक्षेप केला. यावेळी धीरज देशमुख यांनी दोन्ही कुटुंबांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी एका अमराठी महिलेने तुम्ही मराठी लोक भिकारडे आहात. चिकन मटन खावून घाण करणारे आहात, असे संतापजनक शब्द वापरले. यावेळी या अमराठी कुटुंबाने बाहेरुन गुंड बोलावले व मराठी कुटुंबियांच्या घरात घुसून लोखंडी रॉडने मारहाण केली होती.
