मातोश्रीवर ड्रोन नेमका कोणत्या हेतूसाठी? अनिल परब संतापले; पोलिसांचं स्पष्टीकरण काय?
वांद्रे येथील मातोश्री आणि एमएमआरडीए कार्यालयाच्या मधल्या रस्त्यावर ड्रोन (Drone) घिरट्या घालत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी संताप व्यक्त केला आहे.

वांद्रे येथील मातोश्री परिसराता ड्रोन उडवल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच एकच खळबळ माजली आहे. राजकीय वर्तुळात यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी संताप व्यक्त केला आहे. मातोश्रीवर ड्रोन नेमका कोणत्या हेतूसाठी? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
मातोश्री आणि एमएमआरडीए कार्यालयाच्या मधल्या रस्त्यावर ड्रोन (Drone) घिरट्या घालत असल्याचे दिसून आले. या ड्रोनचा घिरट्या घालतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत, “शिवसेना पक्षप्रमुख यांच्या निवासस्थान ‘मातोश्री’च्या बाहेर एक ड्रोन घिरट्या घालताना दिसला. पण प्रश्न असा आहे की हा ड्रोन नेमका कोणाचा आणि कोणत्या हेतूसाठी होता?” असे म्हटले.
काय म्हणाले अनिल परब?
पुढे अनिल परब म्हणाले की, “या ड्रोनद्वारे चित्रीकरण का करण्यात आले? यामागे कोणतेही अतिरेकी पार्श्वभूमी कारण तर नाही ना? मातोश्रीसारख्या Z+ सुरक्षा असलेल्या संवेदनशील क्षेत्रात न कळवता ड्रोनद्वारे शूटिंग करणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. या घटनेमागे कोणते षडयंत्र लपलेले आहे का, याचा शोध घेणे आवश्यक आहे. सुरक्षेच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर असून, प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. प्रशासनाने सखोल चौकशी करून या ड्रोनमागील उद्देश, जबाबदार व्यक्ती आणि त्यामागील पार्श्वभूमी स्पष्ट करावी — जेणेकरून शिवसैनिक आणि नागरिकांच्या मनातील संभ्रम दूर होईल.”
सचिन अहिर संतापले
ठाकरे गटाचे नेते व विधानपरिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. हे दुर्दैव आहे. सर्वसामान्य माणसांना ड्रोन उडवायचे असेल तर परमिशन घ्यावी लागते. संवेदनशील परिसर आहे त्या परिसरातील व्यक्तीना माहिती देणे गरजेचे नाही का? एमएमआरडीला गरज लागली. संशोधन करण्याची गरज का? ड्रोन का उडवले काही माहिती नागरिकांना दिले का? उद्धव ठाकरे यांना पोलीस भेटून गेले बोलण काय झाले माहिती नाही. मुख्यमंत्री यांच्या घराच्या बाहेर ड्रोन फिरवले त्यांना माहिती नाही असे होईल का? त्यांना एक न्याय यांना वेगळा असे का? हजारो लाखो लोक इथे आजूबाजूच्या परिसरात राहतात. सामूहिक जबाबदारी आहे सरकारने स्पष्टीकरण दिले पाहिजे. पोलिसांन आणि शासनावर नाराजगी व्यक्त केली त्याच काम आहे नागरिकांना माहिती देणे. ड्रोन उडवणार असल्याचे अगोदरच एक दिवस सांगायला पाहिजे होते असे ते म्हणाले.
मुंबई पोलिसांनी दिले स्पष्टीकरण
मातोश्री परिसरात ड्रोन फिरताना आढळले होते त्यावर आता मुंबई पोलिसानी स्पष्टीकरण दिलेले आहे. एमएमआरडीएने परवानगी घेऊनच बिकेसी आणि खेरवाडी परिसरात ड्रोन उडवले आहेत.
