
आज मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर यांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. नव्याने निवडून आलेल्या महायुतीच्या नगरसेवकांच्या बैठकीत मुंबईचे नवीन महापौर आणि उपमहापौर यांची नाव जाहीर करण्यात आली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून राहुल शेवाळे आणि भाजपकडून मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी उपमहापौर आणि महापौरांचं नाव जाहीर केलं. भाजप आणि शिवसेनेने मुंबई महापालिकेची निवडणूक युती म्हणून लढवली होती. महायुतीचे एकूण 118 नगरसेवक निवडून आले. यात भाजपचे 89 आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 29 नगरसेवक निवडून आले.
मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडे यांची निवड जाहीर झाली आहे. त्या वॉर्ड क्रमांक 132 च्या नगरसेविका आहेत. तर मुंबईच्या उपमहापौरपदी संजय घाडी यांची निवड झाली आहे. ते दहीसरमधील वॉर्ड क्रमांक 5 चे नगरसेवक आहेत. उपमहापौरपदी झालेली निवड ही सव्वा वर्षासाठी असेल असं राहुल शेवाळे यांनी बैठकीत जाहीर केलं.
त्यावेळी ते मनसेमध्ये होते
मुंबईच नवीन उपमहापौर संजय घाडी हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे एकेकाळचे जवळचे सहकारी, मित्र होते. भारतीय विद्यार्थी सेनेपासून ते राज ठाकरे यांच्यासोबत होते. राज ठाकरेंनी 2007 साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली, त्यावेळी ते मनसेमध्ये होते. त्यांनी मनसेकडून निवडणूकही लढवली होती. पण नंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत गेले. तिथून नगरसेवक बनले. संजय घाडी यांची पत्नी संजना घाडी सुद्धा नगरसेविका होत्या. मागच्यावर्षी एप्रिल महिन्यात संजय आणि संजना घाडी या दोघांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. मागच्या महिन्यात संजय घाडी पुन्हा वॉर्ड क्रमांक 5 मधून नगरसेवक म्हणून निवडून आले. आता त्यांच्यावर मुंबईच्या उपमहापौर पदाची जबाबदारी असेल.
संजय घाडी यांनी कुठली कुठली पद भूषवली आहेत?
संजय शंकर घाडी हे 57 वर्षांचे आहे. त्यांचा मुंबईत जन्म झाला. बी कॉम पर्यंतच त्यांचं शिक्षण झालं आहे. मुंबई महानगरपालिका शाळेत 7 वी पर्यंतच शिक्षण झालं. पुढे 10 वी पर्यंत ते दादरच्या छबिलदास हायस्कूलमध्ये होते. फोर्टच्या सिध्दार्थ महाविद्यालयातून त्यांनी वाणिज्य व अर्थशास्त्राचं शिक्षण घेतलं. 1988-89 पासून शिवसेना प्रणित भारतीय विद्यार्थी सेनेचे ते विभाग प्रमुख होते. सन 1990-91 मध्ये मुंबई विद्यापीठाच्या स्टुडंड कौन्सिलचा अध्यक्ष व सिनेट सदस्य झाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राज्य सरचिटणीस, शिवसेना उपनेता व सध्या शिवसेनेचा रायगड जिल्हा संपर्कप्रमुख आहेत.