मतदानासाठी अंधेरी मतदारसंघात 3 नोव्हेंबरला सुट्टी; निवडणूक आयोगाचे आदेश काय?
ऋतुजा लटके यांच्या रॅलीत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एकवटलेले दिसले. तर भाजपच्या मुरजी पटेल यांनीही आपल्या प्रचाराची जोरदार सुरुवात केली आहे.

मुंबई: अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत (andheri east assembly constituency) सर्व मतदारांना मतदान (voting) करता यावे आणि या पोटनिवडणुकीतील (election commission) मतांचा टक्का वाढावा म्हणून 3 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने ही सुट्टी जाहीर केली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ही सुट्टी फक्त अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात राहणाऱ्यांसाठीच लागू असणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने सुट्टीचे आदेश जारी केले आहेत. आयोगाच्या आदेशनुसार, ही सार्वजनिक सुट्टी ‘166 – अंधेरी पूर्व’ या मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी अंधेरी मतदार संघांच्या बाहेर असतील, त्यांना देखील लागू असणार आहे. तसेच केंद्र शासनाची शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका इत्यादींना ही सार्वजनिक सुट्टी लागू राहणार आहे.
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. आपले राष्ट्रीय कर्तव्य म्हणून अंधेरी पूर्व भागातील जागरूक नागरिकांनी या निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी निधी चौधरी यांनी यानिमित्ताने केले आहे.
दरम्यान, अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गट आणि भाजपचा जोरदार प्रचार सुरु झाला आहे. ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी काल उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आज सकाळीच प्रचाराला सुरुवात केली. सकाळीच त्यांनी मतदारसंघात मशाल रॅली काढली. यावेळी महिलांनी ऋतुजा लटके यांच्यावर फुलांची उधळण करत त्यांचं जल्लोषात स्वागत केलं.
ऋतुजा लटके यांच्या रॅलीत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एकवटलेले दिसले. तर भाजपच्या मुरजी पटेल यांनीही आपल्या प्रचाराची जोरदार सुरुवात केली आहे. दोन्ही उमदेवारांनी मतदारसंघात घरोघरी जाण्यावर भर दिला आहे. पदयात्रा, रॅली आणि सभांच्या माध्यमातून मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा दोन्ही उमेदवारांनी प्रयत्न सुरू केला आहे.
