Ganesh Visarjan : बाप्पाला मनोभावे निरोप; गणेश विसर्जनासाठी महापालिका सज्ज, कशी आहे व्यवस्था, एक क्लिकवर जाणून घ्या
Ganesh Visarjan Miravnuk 2025 : गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ जवळ आली आहे. उद्याचाच दिवस आडवा आहे. मुंबई महापालिकेने गणेश विसर्जनासाठी अशी जय्यत तयारी केली आहे. एका क्लिकवर जाणून घ्या सर्व माहिती...

Ganesh Visarjan Bappa Farewell 2025 : गणपत्ती बाप्पा आता त्यांच्या गावाला जाणार आहे. त्यामुळे भाविकांच्या मनाची लाही लाही होत आहे. अवंढा गिळत अनेक जण शनिवारी बाप्पाला निरोप देतील. गणेश विसर्जनासाठी महापालिका सज्ज झाल्या आहेत. राज्यातील अनेक महापालिका आणि प्रशासन सज्ज झाले आहेत. मुंबई महापालिकेने सुद्धा गणेश भक्तांना त्रास होणार नाही यासाठी अनेक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे गणेश भक्तांना आणि मोठ्या मंडळांना यावेळी वेळेत बाप्पाचे विसर्जन करता येईल. मंडळ आणि प्रशासनात तणाव वाढणार नाही अशी आशा आहे.
मुंबई महापालिका गणेश विसर्जनासाठी सज्ज
गणेशोत्सवासाठी महापालिकेने विविध सोयी सुविधा उपलब्ध केल्या असून येत्या ६ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीदिनी होणाऱ्या विसर्जनासाठीही महापालिका सज्ज झाली आहे.विसर्जनस्थळी प्रथमोपचार केंद्रांसह रुग्णवाहिका, क्रेन, नियंत्रण कक्ष, जर्मन तराफे, तात्पुरती शौचालये, फ्लडलाईट, सर्चलाईट आदी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच, समुद्राच्या किनारपट्टीवर सध्या ‘ब्लू बटन जेलीफीश’, ‘स्टिंग रे’ प्रजातीच्या माशांचा वावर अधिक प्रमाणात आहे. त्यामुळे मत्स्यदंश होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. जर्मन तराफे, जीवरक्षक, २४५ नियंत्रण कक्ष आणि कृत्रिम तलावची तयारी केली आहे.
विसर्जन सुलभ व निर्विघ्नपणे पार पडावे, यासाठी महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेचे जवळपास २४५ नियंत्रण कक्ष तयार करण्यात आले आहेत. महानगरपालिकेच्या विविध खात्यातील कर्मचा-यांमध्ये योग्य समन्वय साधण्यासाठी मुख्य नियंत्रण कक्षासह प्रशासकीय विभागांच्या स्तरावर २४५ नियंत्रण कक्ष आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने १२९ निरीक्षण मनोरे उभे करण्यात आले आहेत
- विसर्जनस्थळी ४२ क्रेनचीही व्यवस्था करण्यात आली आहे
- विविध ठिकाणी २८७ स्वागत कक्ष तयार करण्यात आले आहेत
- सुरक्षेच्या दृष्टीने १२९ निरीक्षण मनोरे उभे करण्यात आले
- प्रशासकीय विभागांच्या स्तरावर २४५ नियंत्रण कक्ष
- विसर्जनस्थळी येणाऱ्या भाविकांसाठी आरोग्य विभागाकडून २३६ प्रथमोपचार केंद्र
- तर भाविकांसाठी ११५ रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत
- प्रकाश योजनेसाठी सुमारे ६ हजार १८८ प्रकाश झोत दिवे (फ्लडलाईट)
- शोधकार्यासाठी १३८ दिवे (सर्चलाईट) लावण्यात आले आहेत
- नागरिकांच्या सोयीसाठी पालिकेने १९७ तात्पुरती शौचालयेही उपलब्ध
- त्याचबरोबर आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी महानगरपालिकेतर्फे अग्निशमन दलाच्या सुसज्ज वाहनासहीत प्रशिक्षित मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे.
गिरगाव चौपटीवर व्यापक तयारी
अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जनाचा सोहळा निर्विघ्न आणि सुरक्षित पार पडावा, यासाठी मुंबई महापालिकेकडून गिरगाव चौपाटी इथे व्यापक तयारी केली आहे. तब्बल १० हजार कर्मचारी व अधिकारी या कामात गुंतवण्यात येणार, शहर व उपनगरांतील ७० नैसर्गिक ठिकाणे आणि २९० कृत्रिम तलावांत विसर्जनाची सोय करण्यात आली आहे. शिवाय २४५ नियंत्रण कक्ष सुसज्ज केले आहेत.
प्रशासनाने भाविक व मंडळांना कृत्रिम तलावांत विसर्जनाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले आहे. चौपाट्यांवरील वाळूमध्ये वाहने अडकू नयेत यासाठी १,१७५ स्टील प्लेट्स बसवण्यात आल्या आहेत. लहान गणेशमूर्ती विसर्जनासाठी ६६ जर्मन तराफ्यांचीही व्यवस्था आहे. सुरक्षेकरिता २,१७८ जीवरक्षक, ५६ मोटरबोटी, १२९ निरीक्षण मनोरे तसेच अग्निशमन दलाची तैनाती असणार आहे.
आरोग्याच्या दृष्टीने २३६ प्रथमोपचार केंद्रे, ११५ रुग्णवाहिका, १०८ आपत्कालीन सेवा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. चौपाट्यांवर मत्स्यदंश किंवा अपघात झाल्यास तातडीने उपचार मिळावेत यासाठी विशेष वैद्यकीय कक्ष उभारण्यात आले आहेत. याशिवाय ५९४ निर्माल्य कलश, ३०७ वाहने, १९७ तात्पुरती शौचालये, ६,१८८ प्रकाशझोत दिवे व १३८ शोधदिवे बसवले आहेत… मुंबई पोलिसांकडून ड्रोन्सच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.
शाडू मातीच्या बाप्पाच्या विसर्जनासाठी हायकोर्टात धाव
शाडू मातीच्या गणेश मुर्तींचं विसर्जन नैसर्गिक स्त्रोतात करण्यास मनाई करु नये, अशी मागणी करत मुंबईतील एका रहिवाश्यानं हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेची गंभीर दखल घेत न्यायालयाने बुधवारी हायकोर्टानं राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला आदेश दिले आहे. सदर याचिकेवर आज मुंबई हायकोर्टात तातडीची सुनावणी होणार आहे.
बाणगंगा तलावात शाडूच्या गणेश मूर्तींचं विसर्जन करू द्या. गेली अनेक वर्षे शाडूच्या गणेश मुर्तींचं बाणगंगा तलावात विधीवत विसर्जन केलं जात आहे. मात्र यावर्षी पालिकेनं त्यास मनाई केली आहे. हा आपल्या मूलभूत अधिकारांवर गदा आणण्याचा प्रकार आहे. संविधानानं आपल्याला धार्मिक विधी करण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे ही मनाई रद्द करुन बाणगंगेत शाडूच्या गणेश मुर्तींचं विसर्जन करण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती या याचिकेतून करण्यात आली आहे. दक्षिण मुंबईतील मलबार हिल या उच्चभ्रू वस्तीतील रहिवासी संजय शिर्के यांनी वकील डॉ. उदय वारुंजिकर यांच्यामार्फत ही याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे.
कोकणवासीयांसाठी विशेष रेल्वे
गौरी-गणपतीचे विसर्जन करून, कोकणातून परतीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी चिपळूण ते पनवेल अनारक्षित विशेष रेल्वेगाडी आज चालवण्यात येणार आहेत. आज गुरुवारी ही रेल्वेगाडी चालविण्यात येणार असून २० रेल्वे स्थानकांना थांबा देण्यात आला आहे.
गणरायाची मनोभावे पूजा करून, गणेशभक्तांनी परतीचा वाट धरली आहे. एकाचवेळी प्रवाशांची गर्दी होऊन कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विशेष अनारक्षित रेल्वेगाडी सुरू केली आहे. गाडी क्रमांक ०११६० अनारक्षित विशेष रेल्वेगाडी ४ सप्टेंबर रोजी चिपळूण येथून सकाळी ११.०५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी पनवेल येथे दुपारी ४.१० वाजता पोहोचेल. तर, गाडी क्रमांक ०११५९ अनारक्षित विशेष रेल्वेगाडी ४ सप्टेंबर रोजी पनवेल येथून दुपारी ४.४० वाजता सुटून त्याच दिवशी चिपळूण येथे रात्री ९.५५ वाजता पोहोचेल.
सोमटने, आपटा, जिते, पेण, कासु, नागोठणे, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड आणि आंजणी या रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या रेल्वेगाडीला ८ मेमू डबे असतील. या रेल्वेगाडीचे तिकिटे यूटीएस प्रणालीद्वारे आरक्षित करता येतील. या तिकिटांसाठी अतिजलद एक्स्प्रेसला लागू असणारे सामान्य भाडे आकारले जाईल, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाद्वारे देण्यात आली.
गाडी क्रमांक ०११३१ द्वैसाप्ताहिक विशेष रेल्वेगाडी ४ सप्टेंबर आणि ७ सप्टेंबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी ८.४५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री १०.२० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल. तर, गाडी क्रमांक ०११३२ द्वैसाप्ताहिक विशेष रेल्वेगाडी ४ सप्टेंबर आणि ७ सप्टेंबर रोजी सावंतवाडी रोड येथून रात्री ११.२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १२.३० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
या रेल्वेगाडीला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप येथे थांबा देण्यात आला आहे. या रेल्वेगाडीची २ वातानुकूलित तृतीय श्रेणी डबे, १२ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी डबे आणि २ द्वितीय आसन व्यवस्था असलेले गार्ड ब्रेक व्हॅन अशी संरचना असेल.
