महिला, मुलींना त्रास देणाऱ्यांना ‘समारंभपूर्वक’ पोलिसांच्या ताब्यात द्या, पाहुणचार कसा करायचा… राज ठाकरेंचं आवाहन

ठाकरे बंधूंचा नीट परीक्षेतील गैरव्यवहाराविरोधात मुंबईत संयुक्त तिरंगा मोर्चा निघणार आहे. दादरच्या शिवाजी पार्कपासून सिद्धिविनायकापर्यंत हा मोर्चा असेल. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शांततेचे आवाहन करत, महिलांना त्रास देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

महिला, मुलींना त्रास देणाऱ्यांना समारंभपूर्वक पोलिसांच्या ताब्यात द्या, पाहुणचार कसा करायचा... राज ठाकरेंचं आवाहन
raj thackeray
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 25, 2026 | 10:37 AM

ठाकरे बंधुंचा उद्या संयुक्त मोर्चा निघणार आहे. दादरच्या शिवाजी पार्कपासून ते सिद्धीविनायक मंदिरापर्यंत हा मोर्चा निघणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधुंनी जोरदार तयारी सुरू केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या मोर्चाची माहिती देणारी पोस्ट केली आहे. तसेच या मोर्चाच कुणी महिला किंवा मुलींना त्रास देणाऱ्यांना समारंभपूर्वक पोलिसांच्या ताब्यात द्या, असं आवाहनच राज ठाकरे यांनी केलं आहे. तसेच मोर्चा शांततेत करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून हे आवाहन केलं आहे. बाकी मोर्च्याला गालबोट लावण्याची हिंमत कोणी करणार नाही, कारण आपण काय करू शकतो याचा अंदाज सगळ्यांनाच आहे. पण तरीही काही उत्साही असतात. ते आले आणि काही वेडंवाकडं करायचा प्रयत्न केला, काही चुकीच्या घोषणा देऊन वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न जरी केला किंवा तिथे आलेल्या पालकांना ( खासकरून महिलांना आणि मुलींना ) जर त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्यांना, जवळ जे कोण पोलीस असतील त्यांच्या ताब्यात ‘समारंभपूर्वक’ द्या. ते कसं हे मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. पण पोलीस जिथे नसतील, तिथे अशांचा ‘पाहुणचार’ कसा करायचा याचा अनुभव आणि मनगटातील शक्ती दोन्ही आपल्याकडे आहेच, असं राज ठाकरेंनी म्हटलंय.

सूचना मिळाल्या असतीलच

येत्या 26 जुलैला NEET परीक्षेतील गोंधळ, त्याबद्दल विद्यार्थ्यांचं सुरु असलेलं आंदोलन आणि ते आंदोलन चिरडण्याचा सरकारचा सुरु असलेला प्रयत्न याविरोधात आपण ‘तिरंगा मार्च’ काढत आहोत. त्याबद्दल तुम्हाला आपल्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून, मध्यवर्ती कार्यालयांकडून सूचित करण्यात आलं असेलच, असंही राज ठाकरे म्हणाले.

मोर्चाची जय्यत तयारी सुरू

मनसे नेते राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नीट परीक्षा पेपर फुटीविरोधात आणि दिल्लीत सुरू असलेल्या सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रविवारी मोर्चाचं आयोजन केलं आहे. या मोर्चाची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. हा तिरंगा मोर्चा असून या मोर्चातून सरकारला धारेवर धारलं जाणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीही या मोर्चातून करण्यात येणार आहे. या मोर्चाला दोन्ही ठाकरे बंधू संबोधित करण्याची शक्यता असून ठाकरे बंधू काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us