रेल्वे स्थानकावर जाऊन नमाज पठण… छठपूजेच्या वादात एमआयएमची उडी, वारिस पठाण यांची मोठी मागणी
AIMIM Waris Pathan on Chhath Puja: मुंबई रेल्वे स्थानकांवर छटपूजेनिमित्त भोजपुरी गाणे वाजवत असल्याने वाद उफाळला. मुंबईतील ही सांस्कृतिक दादागिरी खपवून घेणार नाही असा सूर उमटत असतानाच आता एआयएमआयएमने सुद्धा या वादात उडी घेतली आहे.

AIMIM Waris Pathan on Chhath Puja: उत्तर भारतात, विशेषतः उत्तर प्रदेश, बिहार या भागात छटपूजेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण मुंबईत रेल्वे स्थानकावर भल्या पहाटेपासून छटपूजेनिमित्त भोजपूरी गाणी वाजवण्यात आल्याने वाद उफळला आहे. महाराष्ट्र दिनी अथवा इतर सणानिमित्त कधी मराठीतून गाणी वाजण्यात आली नाही. पण आता भोजपूरी गाणी वाजवल्या जात असल्याने उद्धव ठाकरे शिवसेना आणि मनसेने आवाज उठवला आहे. ही सांस्कृतिक दादागिरी खपवून घेणार नाही असा सूर आळवण्यात आला आहे. त्याचवेळी या वादात आता ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुस्लिमीन-AIMIM ने उडी घेतली आहे. नेते वारिस पठाण यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
रेल्वे स्थानकावर नमाज पठण केल्यास मोठा गदारोळ
एमआयएम नेते वारिस पठाण यांनी रेल्वे स्थानकांवर नमाजचा मुद्दा समोर आणला आहे. छठपूजेची गाणी रेल्वे स्थानकांवर वाजवली जात असल्याबाबत वारिस पठाण यांनी नाराजी व्यक्त केली आहे. छठपूजा हिंदू बांधवांचा मोठा सण आहे. तो उत्साहात साजरा करावा असे ते म्हणाले. प्रत्येकाला आपले सण साजरे करण्याचा अधिकार असल्याचं मत त्यांनी व्यक्त केले. पण रेल्वे स्थानकावर नमाज पठण केल्यास काय होईल, असा सवाल वारिस पठाण यांनी विचारला. संविधान समानतेचा अधिकार देतं, नियम आणि कायदे सर्वांसाठी समान असावेत, अशी मागणी त्यांनी केली. मी रेल्वे स्थानकावर जाऊन नमाज पढली तर मोठा गदारोळ होईल, असे वक्तव्य वारिस पठाण यांनी केलं.
छठपूजेनिमित्त रेल्वे स्थानकावर भोजपुरी गाणी
छठपूजेनिमित्त मुंबईतील मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे स्थानकांवर भल्या पहाटेपासून ध्वनिक्षेपकावरून भोजपुरी गाणी वाजवण्यात आल्याचे समोर आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स, वडाळा, नेरुळ, सानपाडा, आंबिवली, अंधेरी आणि इतर स्थानकावर ही गाणी वाजवण्यात आल्याने राजकीय वाद निर्माण झाला. रेल्वेच्या या कृतीवर मनसे आणि उद्धव सेनेने तीव्र नाराजी व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गणेशोत्सवावेळी स्थानकांवर कधी मराठी गाणी वाजवली गेली नाहीत, मग छठपूजेसाठीच असा निर्णय का घेतला असे रेल्वे अधिकाऱ्यांना खडसावण्यात आले. ही गाणी तात्काळ बंद करण्याची मागणी करण्यात आली. अत्यावश्यक उद्घोषणेवेळी ही गाणी वाजवली जात नाही. तर फावल्या वेळेतच ही गाणी वाजवण्यात येत असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे. पण एकंदरीतच या सांस्कृतिक दादागिरीविरोधात मुंबईकरांमध्ये नाराजीचा सूर आहे. या वादात आता एमआयएमने उडी घेतली आहे.
