
दरवर्षीच्या पावसाळ्यापेक्षा यंदा जास्त पावसाळा देशात झाला. अजूनही काही भागात पाऊस सुरू आहे. अनेक राज्यांमध्ये विक्रमी पाऊस पडला. उत्तरेकडे कडाक्याची थंडी आहे. उत्तरेकडील थंडीमुळे राज्यातील गारठा वाढलाय. उत्तरेकडून थंडीगार वारे वाहत असल्याने राज्यात पुढील काही दिवसांसाठी थंडीची लाट आहे. पुण्याचा पारा 8.9 अंशावर गेला. गेल्या 24 तासात शहरातील किमान तापमानात लक्षणीय रित्या घट झाली आहे. त्यामुळे पुणेकर गारठले आहेत. पुढील तीन ते चार दिवसात किमान तापमानात आणखी मोठी घट होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस थंडी कायम राहील अशी शक्यता आहे. मुंबईमध्येही तीच परिस्थिती आहे. पारा खाली जात असून थंडीमध्ये वाढ होत आहे.
राज्यातील निचांकी तापमान धुळ्यात नोंदवले गेलंय. 5.3 तापमानाची नोंद धुळ्यात झाली. उत्तरेकडून राज्यात शीत लाट आल्याने थंडीचा कडाका वाढला आहे.भारतीय हवामान विभागाने राज्यात थंडीचा येलो अलर्ट जारी केला. मध्य
महाराष्ट्रासह मराठवाड्यात अलर्ट जारी करण्यात आला असून पुढील काही दिवसात थंडी झपाट्याने वाढेल. उत्तर भारतात सध्या थंडीची तीव्र लाट आहे. पंजाबमधील गुरूदासपूर येथे देशातील निचांकी तापमानाची नोंद झाली.
तिथे 4.5 अंश तापमानाची नोंद झाली. परभणी येथे 5.9 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. पुणे, आहिल्यानगर, गोदिंया, जळगाव, भंडारा येथे 9 अंशांपेश्रा कमी तापमानाची नोंद झाली. अनेक जिल्ह्यांचा पारा 10 अंश सेल्सिअस नोंदवला गेला. त्यामध्येच पुढील काही दिवसांमध्ये थंडी अधिक वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. सतत हवामानात बदल होताना दिसत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्याही निर्माण झाल्या आहेत.
देशभरातील हवामान वेगळ्या पद्धतीने बदलत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) 10, 11, 12 आणि 13 डिसेंबर रोजी अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी केला. केरळ, तामिळनाडू, कर्नाटकातील पुडुचेरी, कराईकल आणि माहे आणि अंदमान आणि निकोबार बेटांसह काही जिल्ह्यांमध्ये अधूनमधून मुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला असून काही ठिकाणी अलर्टही जारी करण्यात आला.