जिंकलो रे राजे हो आपण तुमच्या ताकदीवर; प्रचंड विजय होताच मनोज जरांगे यांचे पहिले उद्गार
Manoj Jarange Reaction: राज्य सरकारने मनोज जरांगेंच्या मागण्या मान्य केल्या आहेत. सरकारने हैदराबाद संस्थान लागू करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यानंतर मनोज जरांगे यांनी जिंकलो रे राजे हो आपण तुमच्या ताकदीवर असे उद्गार काढले आहेत.

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसलेले आहेत. काहीही झालं तरी मी मागे हटणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले होते. त्यानंतर आज मराठा उपसमितीच्या सदस्यांनी आज मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. त्यानंतर आता राज्य सरकारने जरांगे यांच्या मागण्यांची दखल घेत बडे निर्णय घेतले आहेत. राज्य सरकारने हैदराबाद संस्थानच्या गॅझेट लागू करणार असल्याचे सांगितले आहे. हा मोठा विजय मिळाल्यानंतर मनोज जरांगेचे पहिले उद्गार काय होते? जाणून घ्या…
काय होते पहिले उद्गार?
“एकदा तुम्ही अंमलबजावणी आणि जीआर दिला तर ९ वाजता मुंबई खाली होईल. नाचत नाचत पोरं गावाकडे जातील. तुम्ही थांबा म्हटलं तरी थांबणार नाही. तुम्ही जीआर द्या. आम्ही तुमच्या स्वागताला तयार राहू. तुम्ही इथेच बसून राहा आणि जीआर घेऊन या. सरकारला हा म्हणू का. ओके जिंकलो रे राजे हो आपण, तुमच्या ताकदीवर. आज कळालं गरिबांची ताकद किती मोठी आहे” असे मनोज जरांगे यांचे पहिले उद्गार होते.
वाचा: प्रियाचा अवघ्या 38व्या वर्षी मृत्यू, अगदी कमी वयात कर्करोग का होतो? काय आहेत लक्षणे?
मराठा-कुणबी एकच, या मागणीवर काय निर्णय झाला?
मनोज जरांगे यांच्याकडून मराठा आणि कुणबी एकच असल्याचा दावा केला जात आहे. सरकारने मराठा, कुणबी एक असल्याचे ग्रहित धरून आरक्षण द्यावे असे जरांगे यांच्याकडून सांगितले जात आहे. यावरही सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. याबाबतची प्रक्रिया किचकट आहे. त्यामुळे महिन्याभराचा वेळ द्या अशी विचारणा सरकारने जरांगे यांना केली आहे. तर जरांगे यांनीदेखील सरकारला एक नव्हे तर दोन महिन्यांची वेळ दिली आहे. त्यामुळे आता दोन महिन्यांत सरकार मराठा-कुणबी या मागणीवर निर्णय घेणार आहे.
वंशावळ समिती गठीत करा. शिंदे समितीला ऑफिस द्या. त्यांना ऑफिस नाहीये. तालुका स्तरावर वंशावळ समिती असावी. शिंदे समितीला कायम नोंदी शोधायला सांगा. ते बंद करू नका. मोडी लिपी, फारसी आणि ऊर्दूचे अभ्यासक कमी आहेत. ते घ्या. तुम्हाला हवे तर सांगा. आमच्याकडे ३५० आहेत असे देखील मनोज जरांगे म्हणाले. विखे पाटील यांनी जरांगेना तुम्ही अभ्यासक द्या. आम्ही त्यांना मानधन देऊ असे म्हटले होते. त्यावर मानधन नको. आम्ही असंच काम करू. तुम्ही फक्त नोंदी शोधायचा अधिकार द्या. प्रत्येक राज्यात जाऊ द्या. आम्ही वावर विकून त्यांना मानधन देऊ असे उत्तर जरांगेंनी दिले होते.
