Kirit Somaiya Meets Bhagat Singh Koshyari: फेक एफआयआरप्रकरणी संजय पांडेंना निलंबित करा; किरीट सोमय्या यांची राज्यपालांकडे मागणी

| Updated on: Apr 27, 2022 | 3:15 PM

Kirit Somaiya Meets Bhagat Singh Koshyari: राज्यपालांच्या भेटीनंतर किरीट सोमय्या यांनी मीडियाशी संवाद साधला.

Kirit Somaiya Meets Bhagat Singh Koshyari: फेक एफआयआरप्रकरणी संजय पांडेंना निलंबित करा; किरीट सोमय्या यांची राज्यपालांकडे मागणी
फेक एफआयआरप्रकरणी संजय पांडेंना निलंबित करा; किरीट सोमय्या यांची राज्यपालांकडे मागणी
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: माझ्यावरील हल्ल्यानंतर एफआयआर दाखल करण्यात आला. त्यावर पोलिसांची सही नाही आणि तक्रारदारांचीही सही नाही. त्यामुळे सीआरपीसीच्या 154 नुसार या एफआयआरचं अस्तित्वच उरत नाही. ठाकरे सरकार बनवाबनवी करत आहे. त्यामुळे मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे (sanjay pandey) यांना तात्काळ निलंबित केलं पाहिजे, अशी मागणी करतानाच संजय पांडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींकडे (bhagat singh koshyari) करण्यात आल्याचं भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी सांगितलं. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचं आश्वासन राज्यापालांनी दिल्याचा दावाही सोमय्या यांनी केला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि किरीट सोमय्या यांच्या शिष्टमंडळांनी आज राज्यपालांची भेट घेऊन समोय्यांवरील हल्ल्याची माहिती दिली. तसेच मुंबईत शिवसेनेचं गुंडाराज सुरू झाल्याचंही त्यांनी राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिलं.

राज्यपालांच्या भेटीनंतर किरीट सोमय्या यांनी मीडियाशी संवाद साधला. केवळ उपरवाला आणि कमांडोंमुळेच मी तुमच्यासमोर उभा आहे. पोलीस आयुक्त हे मुख्यमंत्र्यांची चमचागिरी करत आहेत. माझ्या हनुवटीला काच लागली. ती गळ्याला लागली असती तर? खार पोलीस ठाण्यात 70 ते 80 गुंड घुसले कसे? ते दारात होते. त्यांच्यावर कारवाई का केली नाही? मुंबई पोलिसांकडून न्याय मिळाला नाही तर उच्च न्यायालयात जाऊन दाद मागू, असं सोमय्या यांनी सांगितलं.

राज्यपाल चौकशी करणार

त्या दिवशी पोलिसांनी आम्हाला ऑल क्लिअर दिल्यानंतर ते गायब झाले. त्यांनी मला गुंडाच्या हवाली सोपवलं. पोलिसांनी तुम्हाला दिलेला एफआयआर फेक आहे. त्यावर पोलीस आणि तक्रारदारांची सही नाही. त्यामुळे या एफआयआरचं अस्तित्वच नाही. त्याची चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचं राज्यपालांनी आश्वासन दिलं आहे, असं ते म्हणाले.

उल्टा चोर कोतवाल को डांटे

यावेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही ठाकरे सरकारवर टीका केली. राज्यपालांना भेटलो. सरकारच्या माध्यमातून मुंबई पोलिसांच्या मार्फत मुंबईत दहशतवाद केला जात आहे. ते राज्यपालांच्या कानावर घातलं. सोमय्यांनी सर्व सिक्वेन्स सांगितला. एफआयआर खोटा होता. सोमय्यांनी जे सांगितलं त्या व्यतिरिक्त तक्रार नोंदवून एफआयआर ऑनलाईन केला गेला. तो फेक एफआयआर रद्द करून नवा एफआयआर घ्यावा, अशी आमची मागणी आहे. सोमय्यांवर 60 ते 70 जणांच्या जमावांनी हल्ला केला. पण गुन्हा सोमय्यांच्या ड्रायव्हर विरोधात दाखल करण्यात आला. हा प्रकार म्हणजे उल्टा चोर कोतवाल को डांटे असाच आहे. नंतर पोलिसांवर दबाव आला म्हणून नावाला महाडेश्वरांवर गुन्हा दाखल केला. काही तरी कारवाई केल्याचं चित्रं निर्माण केलं आणि त्यांना जामीनही दिला, असं दरेकर म्हणाले.