
मुंबईसह अवघ्या महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या गणरायाचा विसर्जन सोहळा शांततेत पार पडला. दहा दिवसांच्या मोठ्या भक्ती-भावाने गणपती बाप्पाची पूजा केल्यानंतर आज अखेर रात्री 9.35 वाजता अत्यंत जड अंतःकरणाने बाप्पाला निरोप देण्यात आला. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! अशा जयघोषात गणेशभक्तांनी बाप्पााला निरोप दिला. नवसाला पावणारा राजा अशी ख्याती असलेल्या लालबागच्या राजाला साश्रूनयनांनी निरोप देण्यात आला. यावेळी गिरगाव चौपाटीवर लाखो भाविकांचा जनसागर लोटला होता. यंदाच्या विसर्जन सोहळ्याची सुरूवात जरी उत्साहात झाली असली, तरी समुद्रातील भरती-ओहोटीमुळे लालबागच्या राजाला तब्बल ८ तास पाण्यातच थांबून राहावे लागले होते.
गेले दहा दिवस मोठ्या भक्तीभावाने पूजा आणि आरतीनंतर शनिवारी सकाळी १० वाजता लालबागच्या राजाच्या विसर्जनाची मिरवणूक सुरू झाली. ही मिरवणूक तब्बल २२ तासांहून अधिक काळ चालल्यानंतर गिरगाव चौपाटीवर पोहोचली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली होती. राजाच्या दर्शनासाठी आलेल्या लाखो भाविक जमले होते. “ही शान कोणाची… लालबागच्या राजाची!” असा जयघोष यावेळी करण्यात येत होता. यावेळी उद्योगपती अनंत अंबानी हेदेखील उपस्थित होते. यंदा लालबागच्या राजासाठी खास अत्याधुनिक तराफा बनवण्यात आला होता. मात्र याच तराफ्यामुळे विसर्जनासाठी विलंब झाला.
यंदा लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी खास स्वयंचलित तराफा बनवण्यात आला होता. हा तराफा गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट मोठा असून तो ३६० अंशांमध्ये कुठेही वळू शकतो. ज्यामुळे विसर्जन अधिक सुलभ होईल अशी अपेक्षा होती. मात्र, सकाळी पावणेआठच्या सुमारास लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल झाला. सध्या समुद्राला आलेल्या भरतीमुळे आणि मूर्तीचा पाट जड झाल्याने लालबागचा राजा समुद्रात अडकला.
गेल्या आठ तासांपासून लालबागचा राजाच्या कंबरेपर्यंतच्या पाण्यात होता. त्यामुळे किनाऱ्यावरील भक्तांच्या चेहऱ्यावर काळजी पाहायला मिळत होती. समुद्राची पातळी कमी झाल्यानंतरच ही मूर्ती थोडी मागे ओढण्यात आली. त्यानंतर लालबाग राजाला तराफ्यावर विराजमान करण्यात यश आले. त्यानंतर, लालबाग राजाची विसर्जनाची आरती करण्यात आली. या विशेष स्वयंचलित तराफ्याच्या मदतीने राजाला खोल समुद्रात नेण्यात आले. त्या ठिकाणी लालबाग राजाचे विसर्जन करण्यात आले. सध्या पावसाची रिपरिप सुरू असतानाही गणेशभक्तांचा उत्साह मात्र कायम होता.