
राज्यातील अनेक ग्रामीण भागात बिबट्यांकडून नागरिकांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे बिबट्यांच्या या वाढत्या संख्येवर काय करावे याविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागात शेतात फिरण्याचे देखील वांदे झाले आहे. अशात आता बिबट्यांची नसबंदी करण्याचा उपाय सुचवला जात आहे. एकीकडे ग्रामीण भागात बिबट्याची दहशत असताना मुंबईच्या दिंडोशी येथील सोसायटी बिबट्याचा वावर आढळल्याने खळबळ उडाली आहे. या संदर्भात आमदार सुनील प्रभू यांनी वनमंत्री गणेश नाईक यांना पत्र लिहीले आहे.
एकीकडे ग्रामीण भागात बिबट्यांनी उच्छाद मांडला असताना आता मुंबईत देखील बिबट्याच्या दर्शनाने खळबळ उडाली आहे. मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्यांचा अधिवास असला तरी त्यांचा उपद्रव अलिकडे थांबला होता. पंरतू आता पुन्हा एकदा मुंबईच्या पश्चिम उपनगरातील दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील न्यू दिंडोशी रॉयल हिल्स सोसायटीमध्ये बिबट्याचा संचार सुरु असल्याचे उघडकीस आले आहे. या सोसायटीच्या सीसीटीव्हीत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून रात्री अपरात्री बिबट्याचा वावर पाहायला मिळाला आहे.
या संदर्भात बिबट्याचे मुंबईत संभाव्य हल्ले रोखण्यासाठी आमदार सुनील प्रभू यांनी वनमंत्री गणेश नाईक यांना पत्र लिहिले आहे. बिबट्याच्या या मुक्त संचारामुळे या ठिकाणी राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे आणि असुरक्षितेचे वातावरण निर्माण झाले आहे. आधी या भागात संरक्षक जाळ्या बसवण्यात आल्या होत्या. मात्र या जाळ्या ओलांडून हा बिबट्या सोसायटीमध्ये येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बिबट्याचे संभाव्य हल्ले आणि जीवितहानी रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश द्यावेत, असे पत्र आमदार सुनील प्रभू यांनी मंत्री गणेश नाईक यांना लिहिले आहे.
बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्यांचा नैसर्गित अधिवास आहे. यामुळे संजय गांधी उद्यानाला लागून असलेल्या भागात यापूर्वीही बिबट्यांनी कुत्रे, कोंबड्या अशा भक्ष्यासाठी हल्ले केले आहेत. तसेच माणसांवर बिबट्यांनी मुंबईत अनेकदा हल्ले केले असून त्यात काही जणांचा मृत्यूही झाला आहे.यामुळे दिंडोशी भागात बिबट्या पुन्हा दिसल्याने येथील नागरिकात दहशत पसरली आहे. बिबट्यांना रोखण्यासाठी वनविभागाने अनेक उपाययोजना केल्या आहेत. संरक्षक जाळ्या उभारणे, कुंपण आणि इतर उपाय केलेले आहेत. साल २०२३ मध्ये म्हाडाच्या परवानगीने दिडोंशीत सहा फूटाची जाळी लावण्यात आली होती. तरीही ही जाळी ओलांडून बिबट्यांनी शिरकाव केल्याने या परिसरातील नागरिक जीव मुठीत घेऊन वावरत आहे असे आमदार सुनील प्रभू यांनी वनमंत्री गणेश नाईक यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.