Andheri East Assembly : भाजपमधून शिंदे शिवसेनेत आलेल्या मुरजी पटेल यांना अंधेरी पूर्व येथून उमेदवारी

Maharashtra Assembly Election 2024 : शिंदे शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक असताना दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या दुसऱ्या यादीत अंधेरी पूर्व येथून भाजपचे माजी नेते मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Andheri East Assembly : भाजपमधून शिंदे शिवसेनेत आलेल्या मुरजी पटेल यांना अंधेरी पूर्व येथून उमेदवारी
ekanth shinde and murji patel
Image Credit source: Murji Patel X Account
| Updated on: Oct 27, 2024 | 9:58 PM

आगामी विधानसभा निवडणूक 2024 साठी शिंदेंच्या शिवसेनेकडून दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. शिंदेंच्या शिवसेनेच्या या दुसऱ्या यादीत 20 जणांचा समावेश आहे. भाजपमधून आलेल्या मुरजी पटेल यांना बहुचर्चित अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा यांचा पत्ता कट झाला आहे. साऱ्या राज्याचं लक्ष हे अंधेरी पूर्व येथून मुरजी पटेल की स्वीकृती शर्मा? या दोघांपैकी कुणाला संधी मिळणार? याकडे होतं. मात्र अखेर महायुतीतून शिंदेच्या शिवसेनेने मुरजी पटेल यांच्यावर विश्वास दाखवत उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघातून लढण्यासाठी स्वीकृती शर्मा या इच्छूक होत्या. मात्र ऐनवेळेस मुरजी पटेल यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत उमेदवारी मिळवली आहे. त्यामुळे आता स्वीकृती शर्मा यांच्या भूमिकेकडे लक्ष असणार आहे.

महाविकास आघाडीप्रमाणे महायुतीतही काही जांगाबाबत तिढा होता. त्यामधून अंधेरी पूर्व या मतदारसंघावरही आधीपासूनच मुरजी पटेल आणि स्वीकृती शर्मा यांचा दावा होता. मात्र हे इच्छूक उमेदवार महायुतीतील प्रमुख पक्षातील असल्याने कुणा एकालाच संधी मिळणार असल्याचं निश्चित होतं. आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी या दोन्ही इच्छूकांनी ताकद लावली होती. मुरजी पटेल आणि स्वीकृती शर्मा यांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून स्वत:चा प्रचार-प्रसार करुन आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला होता.मात्र यामध्ये अखेर मुरजी पटेल उर्फ काका यांनीच बाजी मारली आहे.

स्वीकृती शर्मा यांच्या भूमिकेकडे लक्ष

त्यामुळे आता स्वीकृती शर्मा या मुरजी पटेल यांना समर्थन देणार की अपक्ष अर्ज करत बंडखोरी करणार? याकडेही साऱ्यांचं लक्ष असणार आहे. स्वीकृती शर्मा यांनी जुलै 2024 मध्ये शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. तेव्हा एकनाथ शिंदे यांनी स्वीकृती शर्मा यांच्या कामाचं कौतुक केलं होतं. स्वीकृती शर्मा आणि प्रदीप शर्मा यांच्याकडून या मतदारसंघात पीएस फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात आले आहेत.

शिवसेना विरुद्ध शिवसेना ‘सामना’

मुरजी पटेल यांना उमेदवारी मिळाल्याने या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा थेट ‘सामना’ होणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून या मतदारसंघातून विद्यमान आमदार ऋतुजा लटके यांनाच उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे या मतदारसंघातून आता कोण विजयी होणार? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

महायुती आणि शिवसेनेचे आभार

दरम्यान मुरजी पटेल यांनी उमेदवारी मिळाल्यानंतर महायुती आणि एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. मुरजी पटेल यांनी सोशल मीडियावरुन पोस्ट करत महायुती आणि घटक पक्षांचे आभार मानलेत.