कृषी विद्यापीठांतील अध्यापकांना 7 वेतन आयोग, मंत्रिमंडळातील 3 मोठे निर्णय

राज्य सरकारने आज (3 ऑगस्ट) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कृषी विद्यापीठांतील अध्यापकांना 7 वेतन आयोग लागू करण्यासह 3 महत्त्वाचे निर्णय घेतलेत.

कृषी विद्यापीठांतील अध्यापकांना 7 वेतन आयोग, मंत्रिमंडळातील 3 मोठे निर्णय
MANTRALAY


मुंबई :  राज्य सरकारने आज (3 ऑगस्ट) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 3 महत्त्वाचे निर्णय घेतलेत. यात जालना येथे होणार 365 खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालय, कृषी विद्यापीठांतील अध्यापकांना 7 वेतन आयोग आणि जयसिंगपूर नगरपरिषदेस वस्तुसंग्रहालय व ग्रंथालयासाठी जमीन देण्याच्या निर्णयाचा समावेश आहे.

1. जालना येथे होणार 365 खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालय

जालना येथे 365 खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालय उभारण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. यामुळे मराठवाडा व विदर्भातील रुग्णांसाठी उपचारांची सुविधा उपलब्ध होणार आहे.

राज्‍यात पुणे, ठाणे, नागपूर व रत्‍नागिरी या चार ठिकाणी प्रादेशिक मनोरुग्‍णालये आहेत. जालना शहर मराठवाडा व विदर्भासाठी मध्यवर्ती असे आहे. या भागातील रुग्‍णांना उपचारांकरिता पुणे, नागपूर येथे जावे लागते. जालना जिल्‍हयात प्रादेशिक मनोरुग्‍णालय व्हावे, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती. त्यानुसार जालना येथे प्रादेशिक मनोरूग्णालय उभारण्याचा निर्णय आज घेण्यात आला. यामुळे रुग्णांसाठी आंतररुग्ण उपचार तसेच पुनर्वसन सुविधा उपलब्ध होणार आहे. मनोरुग्णालय उभारण्यासाठी इमारत बांधकाम, यंत्रसामुग्री रुग्णवाहिका, औषधी व उपकरणे व मनुष्यबळ यासाठी 104 कोटी 44 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

2. कृषी विद्यापीठांतील अध्यापकांना ७ वेतन आयोग

राज्यातील कृषी विद्यापीठांमधील शिक्षकवर्गीय कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोग लागू करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. राज्यातील कृषी विद्यापीठे संलग्न कृषी महाविद्यालये यामधील शिक्षकवर्गीय कर्मचाऱ्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाची सुधारित वेतन संरचना 1 जानेवारी 2016 पासून लागू करण्यास मान्यता देण्यात आली.

3. जयसिंगपूर नगरपरिषदेस वस्तुसंग्रहालय व ग्रंथालयासाठी जमीन देण्याचा निर्णय

जयसिंगपूर नगरपरिषदेस वस्तुसंग्रहालय व ग्रंथालय उभारणीसाठी जमीन देण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर ( ता. शिरोळ ) नगरपरिषदेस वस्तुसंग्रहालय व ग्रंथालय उभारणीसाठी जमिनीची आवश्यकता होती. त्यासाठी जयसिंगपूर येथील सि. स. नं. 2357अ/1अ/1 क्षेत्र 2108 चौ. मी. ही शासकीय जमीन विनामुल्य देण्यास मान्यता देण्यात आली.

हेही वाचा :

जयंत पाटील यांची प्रकृती स्थिर, रिपोर्टही नॉर्मल; अँजिओग्राफी केली जाणार, आरोग्यमंत्र्यांची माहिती

‘माझी प्रकृती उत्तम, काळजीचं कारण नाही’, जयंत पाटलांचं ट्वीट; अफवांवर विश्वास न ठेवण्याचंही आवाहन

जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक पुढे ढकलली जाणार? राज्य सरकार निवडणूक आयोगाला विनंती करणार

व्हिडीओ पाहा :

Maharashtra Government 3 important cabinet decision 7th Pay Commission

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI