महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला, कुठे कुठे अतिवृष्टी होणार; हवामान विभागाचा अंदाज काय?
महाराष्ट्रात सध्या जोरदार पावसाने थैमान घातले आहे. मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट आणि रायगड, गोंदियासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत, काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे.

सध्या महाराष्ट्रात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे नदी नाले दुथडी भरुन वाहत आहे. त्यामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यासोबत मुंबईतही काल रात्रीपासून सातत्याने पाऊस कोसळत आहे. मुंबईसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिवसभर मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर, रायगड आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. ज्यामुळे या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे.
महाराष्ट्रात मान्सूनने जोरदार हजेरी लावली आहे. आज मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिवसभर मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर, रायगड आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, ज्यामुळे या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे. आज सकाळपासूनच मुंबईत पावसाला सुरुवात झाली आहे. कांदिवली, बोरिवली, मालाड, अंधेरी, जुईनगर, बेलापूर आणि वाशी परिसरात पाऊस कोसळत आहे. सखल भागात पाणी साचण्याची शक्यता असल्याने मुंबई महापालिकेने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सकाळच्या वेळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची पावसामुळे तारांबळ उडाली असली तरी, सध्या मुंबईतील वाहतूक व्यवस्था आणि लोकल ट्रेन सेवा सुरळीत सुरू आहेत.
तसेच कल्याण ते बदलापूर या परिसरात काल रात्रीपासूनच संततधार पाऊस सुरू आहे. कल्याण डोंबिवली परिसरामध्ये गेल्या दोन दिवसापासून पावसाची रिमझिम सुरू आहे. आज सकाळपासूनच पावसाची संततधार सुरु आहे. तर अधून-मधून पावसाच्या जोरदार सरी बरसत आहे. पावसाचा जोर कायम राहिला तर सकल भागातील रस्त्यावर पाणी साठण्याची शक्यता आहे.
आज समुद्राला मोठी भरती
मुंबई महापालिकेने जाहीर केलेल्या भरती-ओहोटीच्या वेळापत्रकानुसार, २४ ते २७ जुलै या कालावधीत समुद्राला मोठी भरती येणार आहे. आज दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी समुद्रात ४.६६ मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. तर उद्या २६ जुलै रोजी सर्वात मोठी म्हणजे ४.६७ मीटर उंचीच्या लाटा येण्याची शक्यता आहे. या काळात नागरिकांना समुद्रकिनारी जाणे टाळण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. तसेच, प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, आणि गोंदिया जिल्ह्यात पावसाचा अलर्ट
विदर्भात आज संपूर्ण दिवस पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे, तर नागपूर, वर्धा, आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील २४ तासांत विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना प्रशासनाच्या सतर्कतेच्या सूचनांचे पालन करण्यास सांगितले आहे. गोंदिया जिल्ह्याला काल रात्रीपासूनच मुसळधार पावसाने झोडपले आहे. अनेक नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत आहेत. गोरेगाव तालुक्यातील बबई गावच्या नाल्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने दोन गावांचा संपर्क तुटला आहे. वैनगंगा नदीवरील धापेवाडा बॅरेजचे ७ गेट उघडण्यात आले आहेत, तर पुजारीटोला आणि कालीसराड धरणांमधूनही मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे.
रायगडमध्ये रेड अलर्ट
रायगड जिल्ह्यात हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत, ज्यामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. माळशेज घाटात पाऊस आणि धुक्यामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. दरीच्या बाजूला असलेली संरक्षण भिंत आणि समोरुन येणारी वाहने स्पष्ट दिसत नसल्याने प्रवास जीवघेणा ठरत आहे. प्रवाशांकडून घाटातील दरीच्या बाजूला असलेल्या संरक्षक भिंती व कठड्यांवर तसेच रस्त्याच्या मधोमध रिफ्लेक्टर लावण्याची मागणी होत आहे. जेणेकरून वाहनचालकांना रस्त्याचा आणि समोरच्या वाहनाचा अंदाज येऊन अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. महाराष्ट्रातील विविध भागांत सुरू असलेल्या या पावसामुळे नागरिकांनी सतर्क राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
