MPSC Exam | आधी परीक्षा घ्या म्हणून रस्त्यावर आंदोलन, आता काय नको म्हणून उतरणार? उद्धव ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक

MPSC Exam | आधी परीक्षा घ्या म्हणून रस्त्यावर आंदोलन, आता काय नको म्हणून उतरणार? उद्धव ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक
उद्धव ठाकरे

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी परीक्षार्थी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. MPSC Secondary Service Group B Exam

Yuvraj Jadhav

|

Apr 09, 2021 | 1:08 PM

मुंबई: महाराष्ट्रावर आलेलं कोरोनाचं संकट आता आणखी गडद होत चाललं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब संयुक्त पूर्व परीक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणं 11 एप्रिलला होईल, असं जाहीर केलेय. राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णंसख्येची धास्ती परीक्षा देणाऱ्या उमेदवारांनी घेतली आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा घ्यावी म्हणून गेल्या महिन्यात रस्त्यावर उतरलेले विद्यार्थी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याकडे परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करत आहेत. विद्यार्थ्यांची नेमकी मागणी काय आहे. विद्यार्थी परीक्षा ढकलण्याची मागणी का करत आहेत? महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची नेमकी भूमिका काय? मुख्यमंत्र्यांनी या सर्व प्रकरणाची दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. (Maharashtra MPSC Secondary Service Group B Exam aspirants why demanded to postpone exam dates CM Uddhav Thackeray call  immediate  meeting)

परीक्षा घेण्यासाठी आंदोलन आता पुढे ढकलण्याची मागणी

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी परीक्षार्थी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. एमपीएसी समन्वय समिती, महाराष्ट्र या संघटना आणि प्रातिनिधीक स्वरुपात सोलापूर, अहमदनगर,सातारा, हिंगोली यवतमाळ, मुंबई, पुणे, लातूर, नागपूर, कोल्हापूर यासह राज्यभरातील विविध शहरातील विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मनसेप्रमुख राज ठाकरे यांना पत्र लिहून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.

राज्य सरकारनं कोरोना विषाणू संसर्गाचं कारण देत 14 मार्चला होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला राज्यभरातील विद्यार्थ्यांनी विरोध केला. यामुळे विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करुन राज्य सरकारनं 14 मार्चची परीक्षा 21 मार्चला घेण्याचे आणि त्यासोबतचं 11 एप्रिलला होणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब परीक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणं होईल, असं महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं जाहीर केले. आता राज्यात कोरोना विषाणू संसर्ग वाढल्यानं विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केलीय.

विद्यार्थ्यांची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी का?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला बसलेले काही विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आहेत. काही विद्यार्थ्यांचे पालक देखील पॉझिटिव्ह आहेत त्यामुळं विद्यार्थ्यांसमोर परीक्षेला उपस्थित राहण्याविषयीची अडचण आहे. गेल्या आठवड्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला असल्यानं विद्यार्थ्यांमध्ये घबराटीचं वातावरण आहे. विद्यार्थ्यांनी मध्य प्रदेश आणि बिहार सरकारनं लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलल्याचा संदर्भ दिला आहे.

mpsc student letter

विद्यार्थीनीचं पत्र

राजकीय नेत्यांची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी करण्यासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला आहे. राज ठाकरेंनी कोरोनाची परिस्थिती गंभीर असल्यानं परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी राज ठाकरेंना परीक्षा पुढे ढकलण्यासाठी लक्ष घालण्याची मागणी केली आहे.

MPSC exam: एमपीएससीची परीक्षा पुढे ढकला; राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना फोन

सर्वच परीक्षा पुढे ढकला: गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील राज्यातील कोरोना स्थिती पाहता एप्रिल महिन्यात होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. विद्यार्थ्यांच्यावतीनं परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करतो, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

विनायक मेटे यांची देखील मागणी

शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी देखील कोरोना विषाणू संसर्ग संपेपर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं परीक्षा पुढे ढकलाव्यात, अशी मागणी केली आहे.

परीक्षा पुढे ढकलल्यास काय अडचणी?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 बऱ्याच वेळा पुढे ढकलल्यानं विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झालं होतं. ती परीक्षा झालेली परिस्थिती पाहता कोरोना विषाणू संसर्ग वाढला आहे. कोरोना विषाणूमुळे संसर्गामुळे जीव जाण्यापेक्षा पुढील काळात परीक्षा देता येईल, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.

सरकारची भूमिका काय?

राज्यातील वाढती कोरोनाची स्थिती आणि विद्यार्थ्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी आहे. जितेंद्र आव्हाड यांनी देखील सर्वच परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केलीय. राज्य सरकारनं याची दखल घेतली असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अधिकारी यांच्या बैठकीत परीक्षेबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या:

MPSC परीक्षार्थींसाठी रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे महत्वाची मागणी, वाहतुकीसह वयोमर्यादेचा मुद्दा उपस्थित

पुण्यात 109 केंद्रावर MPSCपरीक्षेची तयारी, 4 हजार कर्मचाऱ्यांची RTPCR टेस्ट

(Maharashtra MPSC Secondary Service Group B Exam aspirants why demanded to postpone exam dates)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें