Maharashtra Rain Alert : चक्रीवादाळाच्या तांडवानंतर महाराष्ट्रात अलर्ट, येत्या दोन दिवसात राज्यात धो धो पाऊस

अर्णव चक्रीवादळामुळे आंध्रप्रदेश आणि ओडिशाला फटका बसल्यानंतर महाराष्ट्राला अलर्ट देण्यात आला आहे. पुढील दोन दिवस राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस अपेक्षित असून, यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

Maharashtra Rain Alert : चक्रीवादाळाच्या तांडवानंतर महाराष्ट्रात अलर्ट, येत्या दोन दिवसात राज्यात धो धो पाऊस
Maharashtra Rain Alert
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 29, 2026 | 3:26 PM

अर्णव चक्रीवादळाने आंध्रप्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर धुमाकूळ घातला. या वादळाचा सर्वाधिक फटका दक्षिण आणि उत्तर भारताला बसला आहे. या भागातील काही राज्यांना पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. या वादळानंतर आता महाराष्ट्रात अलर्ट देण्यात आला आहे. आज आणि उद्या महाराष्ट्रात मेघगर्जनेसह धो धो पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे राज्यातील वातावरणात बदल होणार आहे. मुंबईसह काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार असल्याचं हवामान खात्याने स्पष्ट केलं आहे.

भारतीय हवामान विभागाने हा अंदाज वर्तवला आहे. आज 29 ऑक्टोबर आणि उद्या 30 ऑक्टोबर रोजी मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नाशिक आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडणार असून सोसाट्याच्या वाऱ्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Loading...

हवामानात बदल होणार

भारतीय हवामान विभागाच्या (IMD) मुंबई केंद्राने दिलेल्या अंदाजानुसार, 29 आणि 30 ऑक्टोबर रोजी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम आणि मेघगर्जनेसह पाऊस पडणार आहे. यावेळी विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. आज आणि उद्या कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये हवामानात बदल दिसून येऊ शकतो, असंही हवामान विभागाने म्हटलं आहे.

अमरावतीत रिपरिप

दरम्यान, अमरावती शहरासह ग्रामीण भागामध्ये काल रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. बंगालच्या उपसागरामध्ये अर्णव वादळ तयार झाल्यामुळे अमरावतीत पावसाने हजेरी लावली. पुढील दोन ते तीन दिवस अमरावतीत अशाच पद्धतीने पाऊस राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा पिकाला फायदा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

चार दिवस पाऊस

दरम्यान, अर्णव चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशाला अलर्ट देण्यात आला आहे. उत्तर प्रदेशात 28 ते 31 पर्यंत म्हणजे चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. या चार दिवसात मेघगर्जनेसह राज्यात पाऊस होणार आहे. यावेळी वाऱ्याचा वेग प्रचंड असणार आहे. त्यामुळे प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सरकारकडून अॅडव्हायजरीही जारी करण्यात आली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us