आजचा दिवस महत्त्वाचा… ऑडिओ क्लिपचे पडसाद थेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत; भाजपला टेन्शन?
मनोज जरांगे पाटील यांच्या ऑडिओ क्लिपने महाराष्ट्रात राजकीय खळबळ उडवली आहे. भाजपने एकनाथ शिंदेंना ५०० कोटी दिल्याचा आरोप या क्लिपमधून होत आहे. या गंभीर पडसादांमुळे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत वादळी चर्चा अपेक्षित आहे. शिंदे गट हा विषय लावून धरणार असल्याने भाजपची चिंता वाढणार आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी एक ऑडिओ क्लिप ऐकवून महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहे. जरांगे यांना गप्प करण्यासाठी भाजपने एकनाथ शिंदे यांना 500 कोटी रुपये दिल्याचं या क्लिपमध्ये म्हटलं आहे. तसेच भाजपने राज्यात नरेटिव्ह पसरवण्यासाठी कशा पद्धतीने षडयंत्र रचले होते, याचा पर्दाफाशही या क्लिपमधून करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन केली आहे. मात्र, एसआयटीमार्फत चौकशी कराच पण आधी या प्रकरणी गुन्हा दाखल करा, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार असून ही बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे. शिंदे गट आजच्या बैठकीत हा विषय लावून धरणार असल्याने भाजपचं टेन्शन वाढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज्य मंत्रिमंडळाची आजची बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सादर केलेली कथित ऑडिओ क्लिपचे पडसाद राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटण्याची शक्यता आहे. कॅबिनेट बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या कथित ऑडिओ क्लिपवर चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मागील काही दिवसांमध्ये या ऑडिओ क्लिपमुळे भाजप आणि शिवसेनेचे आमदार आणि नेते आले आमने सामने आले होते. शिवसेनेच्या काही नेत्यांनी थेट भाजप नेत्यांवर निशाणा साधला होता. तर भाजपच्या नेत्यांनी देखील शिवसेनेच्या नेत्यांवर पलटवार केला होता. त्यामुळे आजच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दुष्काळी परिस्थितीचा आढावा
दरम्यान आज, राज्य मंत्रिमंडळाच्या दुष्काळ निवारण उपसमितीची बैठक होणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. राज्यातील 304 दुष्काळी तालुक्यांमधील उपाययोजनांचा या बैठकीत आढावा घेतला जाणार आहे. शेतकरी आणि शेतमजुरांसह विद्यार्थ्यांसाठी घोषित मदतीचा आढावा यावेळी घेतला जाणार आहे. पिण्याचे आणि शेतीचे पाणी, जनावरांचा चारा उपलब्धतेबाबत महत्त्वाचे आदेश जारी होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
किसान सभेशी चर्चा
दरम्यान, आज आणखी एक महत्त्वाची बैठक होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी किसान सभेला चर्चेसाठी निमंत्रण दिलं आहे. आज सायंकाळी 4.00 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक होणार आहे. किसान सभेचे पदाधिकारी थोड्याच वेळात मुंबईच्या दिशेने बैठकीसाठी रवाना होणार आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोलेतून काल मुंबईच्या दिशेने किसान सभेचा वाहन लॉंग मार्च निघालेला आहे. हजारोच्या संख्येने आंदोलक मुंबईच्या दिशेने येत आहे. त्यामुळे सरकारने या मोर्चेकऱ्यांशी चर्चेची तयारी दर्शवली आहे.