मनोज जरांगे पाटलांबाबत विनोद पाटील यांची पहिली प्रतिक्रिया काय? नोंदीपासून ते…

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जरांगे यांनी नोंदींवर लक्ष केंद्रित केले, पण ज्यांच्या नोंदी नाहीत, त्यांचे काय असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला. हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी व मराठवाड्याच्या कुणबी मुद्द्यावरही त्यांनी चिंता व्यक्त केली. कायदेशीर लढाई सुरूच ठेवणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

मनोज जरांगे पाटलांबाबत विनोद पाटील यांची पहिली प्रतिक्रिया काय? नोंदीपासून ते...
Manoj Jarange
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 18, 2026 | 4:05 PM

मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचं उपोषण मागे घेतलं आहे. सरकारच्या विनंतीवरून जरांगे यांनी 20 दिवसांपासून सुरू असलेलं आंदोलन मागे घेतलं असून त्यावर आता प्रतिक्रिया येत आहेत. मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनीही जरांगे यांच्या आंदोलनावर भाष्य केलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी त्यांच्या पद्धतीने प्रयत्न केले आहेत. त्यांनी नोंदी लावून धरल्या. पण ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी आमचा लढा आहे, असं विनोद पाटील यांनी सांगितलं.

विनोद पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हैदराबाद गॅजेट म्हणजे काय? कुठलंही गॅजेट सरसरकट लागू करावे लागते. हैदराबाद गॅजेटनुसार प्रमाणपत्र मिळालेली नाहीत. हैदराबाद गॅजेट लागू झाले तर प्रमाणपत्र मिळणार. पण ते लागू झालेले नाही. नोंदी मिळत राहणार, प्रमाणपत्र मिळत राहाणार, पण ज्यांच्या नोंदी नाहीत, त्यांचे काय? असं सांगतानाच आम्ही मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई लढत राहू. असं विनोद पाटील यांनी म्हटलं आहे.

पण तसं झालं नाही

मराठवाडा किमान सरसकट कुणबीमध्ये जाईल असं वाटत होतं. पण तसं झालं नाही. कोर्टाच्या प्रकरणावर सरकारची अजून एकही बैठक झाली नाही. आज मुंबई हायकोर्टात तारीख आहे. परत एकदा पूर्ण बाजू मांडण्याची संधी मिळणार आहे. एका समाजाला एका राज्यात एकच आरक्षण मिळते. त्यामुळे समाजातील विद्यार्थी गफलतीत आहेत. ज्यांच्या नोंदी मिळाल्या, त्यांचे झाले. पण इतरांचे काय? म्हणूनच मी कायदेशीर लढाई लढण्यासाठी तयार झालो आहे, असं पाटील यांनी स्पष्ट केलं.

पोलीस भरतीत कमी टक्का

पोलीस भरतीमध्ये फार कमी टक्का आहे. याकडे दुर्लक्ष होत आहे. न्यायालयीन लढाईबाबत भूमिका स्पष्ट करावी ही माझी सरकारला विनंती आहे. केंद्रात ईडब्ल्यूएस आणि राज्यात एसईबीसीचं आरक्षण आहे. एसईबीसी आरक्षणात राजकारणाची गरज नाही. आमचा मुलगा साहेब झाला पाहिजे. मराठा समाज अगोदरच राजकारणात आहे. आम्हाला राजकारणाची गरज नाही, असंही त्यांनी म्हटलंय.

भांडण खुर्चीशी, व्यक्तीशी नाही

यावेळी त्यांनी विजय वडेट्टीवारांच्या आरोपांवरही उत्तर दिलं. चळवळीत आरोप होत राहतात. त्याचा ठावठिकाणा नसतो. आरोप खोटा असेल तर मराठा समाज कायदेशीररित्या लढेल. आम्ही जेव्हा जेव्हा समाजाचा विषय घेऊन मुख्यमंत्र्यांकडे गेलो, तेव्हा तेव्हा त्यांनी समाजाचं काम केलं. त्यांनी समाजाचं काम केलं नाही तर आम्ही त्यांच्याविरोधात जाऊ. ते खुर्चीवर आहेत म्हणून आम्ही भांडत आहोत. खुर्चीशी आमचं भांडण आहे, व्यक्तीशी नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us