
ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणासाठी मराठा समाजाचा निकाराचा लढा सुरू झाला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणचा आज पाचवा दिवस आहे. त्यांनी दोन दिवसांपासून पाणी ही त्यागले आहे. तर आज त्यांनी वैद्यकीय पथकालाही परतावून लावले. सरकार दरबारी केवळ जोर बैठका सुरू आहेत. तर काही जण हायकोर्टाच्या माध्यमातून आंदोलनाला कायद्याच्या कचाट्यात आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातच आंदोलनातील काही हुल्लडबाजांमुळे मराठा समाजाला बदनाम करण्याचाही प्रयत्न होत असल्याचे आंदोलक सांगत आहेत. सामान्य मुंबईकरांना वेठीस धरून मागण्या कशा पदरात पाडून घेणार असा सवाल ही करण्यात येत आहे. आज हायकोर्टात सकाळच्या आणि दुपारच्या सत्रात सुनावणी होणार आहे. गेल्या दहा वर्षांतील आंदोलनाचा इतिहास पाहता मराठ्यांनी अभूतपूर्वी शिस्तीचे पालन केल्याचे दिसून येते. त्यामुळे आंदोलनातील हे घुसखोर शोधून त्यांचा वेळीच बंदोबस्त करण्याचे आवाहन आंदोलकांसमोर आहे. तर हायकोर्टात हा मुद्दा गेल्याने सुंठी वाचून राज्य सरकारचा खोकला जाणार हे नक्की आहे.
मराठा आंदोलकांची अभूतपूर्व गर्दी
जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे. मंगळवार आणि बुधवारी मराठा आंदोलकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आज गौरी गणपतीचे विसर्जन होणार आहे. राज्यभरातून मराठा आंदोलकांचे लोंढे मुंबईकडे येण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे. आज विसर्जनानंतर मराठा आंदोलकर्ते मोठ्या संख्येने मुंबईकडे रवाना होऊ शकतात.
गावच्या गाव खाली होतील व जरांगे पाटील यांच्या समर्थनासाठी मुंबईत धडकतील. खासकरून महिला वर्ग देखील मोठ्या प्रमाणत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मराठा आंदोलकर्ते मोठ्या संख्येने आपल्या गावातून निघणार आहे. आज सकाळच्या सुमारात देखील जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आंदोलकांनी मोठी गर्दी केली आहे. भेटण्यासाठी रांग लावल्याचा पाहायला मिळत आहे.
पाटील पाटील, घोषणांचा पाऊस
मनोज जरांगे पाटील झोपेतून उठताच आंदोलकांनी आझाद मैदानावर पाटील पाटील अशी घोषणाबाजी केली.आझाद मैदानावरती आंदोलनकर्ते जमायला सुरुवात झाली आहे. ढोल ताशे वाजवत महादेवाची कावड घेऊन आंदोलनकर्ते मैदानावर जमायला सुरुवात झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे.
मुंबईच्या सीएसएमटी स्थानकात मराठा आंदोलकांची मोठी गर्दी झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून मोठ्या संख्येने आंदोलन सीएसएमटी स्थानकात मुक्काम करत आहेतय सकाळी उठून पुन्हा आझाद मैदानात जात आहेत. मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू आहे. सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांच्या अद्याप उपोषणाची दखल घेण्यात आली नाही. आज सरकार मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाकडे शिष्टमंडळ पाठवणार का याकडे सर्व राज्यांचे लक्ष लागून आहे.
मराठा आंदोलक शिस्तीचे पालन करणार?
काल कोर्टातून मनोज जरांगे पाटील यांना शिस्त पाळण्याचे आवाहन करण्यात आले. 24 तासात मुंबईतील रस्ते मोकळे करण्याचाही आदेश देण्यात आले आहे. त्यादृष्टीने आता प्रशासन सकाळपासूनच कामाला लागले आहे. तर जरांगे पाटील यांच्या आवाहनानंतर अनेकांनी रस्त्यावरील वाहनं सुरक्षीत ठिकाणी वाहनतळावर लावण्यास सुरूवात केली आहे. पण आझाद मैदानावर 5 हजार आंदोलकांची अट पाळण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.
सरकारच्या जोर बैठका
आज 10 वाजता मराठा आरक्षण उप समितीची बैठक होत आहे. विखे पाटलांच्या रॉयलस्टोन या बंगल्यावर बैठक होत आहे.मराठा आरक्षण उपसमितीच्या सदस्यांसह शिंदे समितीचे सदस्य उपस्थित राहणार आहे. हैदराबाद आणि सातारा गॅझेटियर लागू करण्यासंदर्भात चर्चा होणार आहे.
वाशी भाजी मार्केटमध्ये आंदोलनकर्त्यांची विश्रांती
पण सध्या काशिमीरा दहिसर टोल नाका पश्चिम द्रुतगती महामार्ग पूर्णपणे मोकळा आहे. नवी मुंबई मधील वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये मराठा आंदोलनकर्त्यांच्या गाड्यांची पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स मधुन गाड्यांना हटवल्यानंतर अनेक गाड्या वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये पार्किंगसाठी लावण्यात आल्या.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना गाड्या काढण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. मनोज मनोज जरांगे यांच्या आव्हानाला साथ देत आंदोलनकर्त्यांनी एपीएमसी मार्केटमध्ये गाड्या पार्क करून गाड्यांमध्येच आंदोलन करते विश्रांती घेत आहेत. वाशी मधील भाजी मार्केटमध्ये अनेक आंदोलनकर्ते मिळेल त्या जागेवरती विश्रांती घेत आहेत. वाशी येथील भाजी मार्केट मधल्या बटाटा चाळीमध्ये आंदोलनकर्ते बटाटे टाकलेल्या पोत्यांवरती विश्रांती घेतली. भाजी मार्केटमध्ये आंदोलनकर्त्यांची सोय नाही माञ प्रतिकूल परिस्थितीमध्ये आंदोलनकर्ते विश्रांती घेत आहेत. मुक्ताईनगर मुंबईत मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या आरक्षणाच्या आंदोलनास येथील समाजबांधवांनी संपूर्ण पाठींबा व्यक्त केला आहे. या लढ्यात तालुक्यातील मराठा बांधव सक्रीय सहभागी होणार असल्याचा संकल्प आज व्यक्त करण्यात आला.