
मुंबई हे आता मराठ्यांचे आंदोलन केंद्र ठरले आहे. आतापर्यंत अंतरवाली सराटी आणि वाशी या ठिकाणी मराठा आंदोलनाची सूत्र हलली. येथे दमदार आंदोलनं झाली. त्यात अनेक गोष्टी मराठा समाजाने पदरात पाडून घेतल्या. पण मराठा समाजाच्या हाती अजूनही काही ठोस लागलेले नाही. सरकारला वेळोवेळी वेळ देऊन सुद्धा मराठा आरक्षणाविषयीची घोर निराशा हाती लागली आहे. कुणबी प्रमाणपत्र वाटप होत असले तरी त्याची पडताळणी होऊन तो पुरावा पक्का होत नाही, तोपर्यंत या प्रमाणपत्रांना कागदासारखी किंमत आहे. त्यामुळे मराठा समाज इरेला पेटला आहे. आता ओबीसीतून आरक्षणाशिवाय माघार नाही, अशी आझाद भूमिका मराठा समाजाने घेतली आहे. आंदोलन सुरू होताच विरोधी गोटातील नेत्यांची जरांगेंच्या उपोषस्थळी रीघ लागली. भाजपचे आमदार सुरेश धस सोडले तर मोठा नेता आंदोलन भूमीकडे फिरकला सुद्धा नाही. त्यातच आता ज्येष्ठ नेते शरद पवार हे जरांगेंची भेट घेण्याची दाट शक्यता आहे.
राजेश टोपे यांच्या भेटीने चर्चा
सततच्या उपोषणामुळे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अगोदरच ठीक नाही. त्यात त्यांनी 29 ऑगस्टपासून बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले आहेत. काल रात्री त्यांची तब्येत खालावली. शरद पवार गटाचे नेते आणि माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रात्री मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. शनिवारी रात्री या घडामोडी घडल्या. राजेश टोपे आणि मनोज जरांगे यांच्यात चर्चा झाली. शरद पवार यांचा निरोप घेऊन टोपे आले होते अशी चर्चा उपोषण स्थळी रंगली.
त्यानंतर राजेश टोपे यांनी शरद पवार यांच्या भेटीची वेळ मागितली. राजेश टोपे हे शरद पवार यांना आज भेटण्याची शक्यता आहे. उरळी कांचन येथे पवार येणार असल्याचे समजते. त्यानंतर ते मुंबईत येऊन मनोज जरांगे पाटील यांना भेटण्याची शक्यता आहे. ही भेट जर झाली तर सरकारवर आपोआप मोठा दबाव येण्याची शक्यता आहे. कारण सरकारच्या एकाही मंत्र्याने अद्याप मनोज जरांगे यांची भेट घेतली नाही. न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीने त्यांची भेट घेतली आहे. भाजपच्या गोटातून भेटीऐवजी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर हल्लाबोल तीव्र झाला आहे. त्यात जर पवार भेटीला आले तर सरकारविषयी जनमतावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भेटीपूर्वीच सरकारी मंत्री तातडीने जरांगे पाटील यांना भेटू शकतात, असा पण कयास आहे.