मनोज जरांगेंना सरकारच… संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप; काय म्हणाले?
मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनाबाबत संजय राऊत यांनी सरकारवर खळबळजनक आरोप केले आहेत. सरकारच जरांगेंना मुंबईत येण्यासाठी उकसवत असून, त्यांच्याशी चर्चा टाळत असल्याचं राऊत म्हणाले. यामुळे गणेशोत्सवादरम्यान मुंबईकरांना त्रास होईल, असं सांगतानाच सरकारचा अहंकार लोकशाहीला घातक असल्याचं राऊत यांनी नमूद केलं.

मनोज जरांगे पाटील हे आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी मुंबईत येत आहेत. सरकारने त्यांच्याशी चर्चेचे दरवाजे बंद केले आहेत. त्यामुळे जरांगे यांच्यासमोर पर्याय नाही. म्हणूच ते मुंबईत येत आहेत. ते मुंबईत आले तर मुंबईकरांना मोठा त्रास होईल. मुंबईकरांना त्रास व्हावा ही जरांगेंची इच्छा नाही. पण सरकारच जरांगेंना मुंबईत येण्यासाठी उकसवत आहे, असा खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा आरोप केला आहे.
जरांगे मुंबईत आले तर मुंबईकरांना मोठा त्रास होईल. एक तर ज्या भागात त्यांचं आंदोलन आहे, त्या भागात मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव असतो. जगभरातील पर्यटक त्याकाळात मुंबईत येतात. लालबागचा राजा, अदानीचा राजा आणि इतर मोठे गणपती याच भागात असतात. या सर्व गणपतींकडे लाखोंचे भक्त येतात. गणेशोत्सव डिस्टर्ब व्हावा, अशी जरांगेंची इच्छा वाटत नाही. माझं त्यांच्या लोकांशी बोलणं असतं. पण सरकार जरांगेंना मजबूर करत आहे. तुम्हाला यावंच लागेल. आम्ही तुमचं ऐकायलाच तयार नाही, असं सरकार म्हणत आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
दरवाजे बंद करून बसणं हे चांगल्या राज्यकर्त्यांचं लक्षण नाही. दरवाजे बंद करण्याची परंपरा मोदी आणि फडणवीसांनी आणली. गेल्या 10 वर्षापासून हेच सुरू आहे. हे चुकीचं आहे. जरांगे 13 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. त्यांच्याशी सरकारने चर्चा करावी. चर्चेतून समाधान निघेल की नाही, माहीत नाही. कोणी सांगू शकत नाही. पण चर्चा केली पाहिजे, असं मत राऊत यांनी व्यक्त केलं.
महाजनांना आव्हान
जरांगेंशी चर्चा झाली पाहिजे. ते नेते आहेत. समाज त्यांच्या पाठी आहे. गिरीश महाजन म्हणतात, शिव्या दिल्याने प्रश्न सुटत नाही. महाजनांचं म्हणणं बरोबर आहे. पण महाजन यांना जरांगेंशी चर्चा करण्याचा अधिकार दिला का? आधी महाजन यांनी याचा खुलासा करावा, असं आव्हानच राऊत यांनी दिलं.
सर्वच अहंकारात
जरांगे समंजस नेते आहेत. पण जबाबदारी सरकारची आहे. त्यांच्याशी चर्चा करून आहे तिथेच बैठक घेतली पाहिजे. सरकारला हे शक्य आहे. पण सर्व अहंकरात आहेत. कोणी मेला तरी काही फरक पडत नाही, असं राज्याचे मुख्यमंत्री म्हणत आहेत. लंडनमधील सरकार म्हणते, मला शिव्या घातल्या मी जरांगेंशी बोलणार नाही, अशी टीका त्यांनी केली.
हे अमित शाहांचं पाप
यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही टीका केली. महाराष्ट्र जातीपातीत विभागण्याला अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसच जबाबदार आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी जातीपातीत विखुरलेल्या समाजाला एकत्र आणलं होतं. त्यांना आधार दिला होता. पण सध्याच्या सरकारने वाट लावली आहे. महाराष्ट्र आज जे भोगत आहे. ते अमित शाह यांचं पाप आहे. यांच्या राजकारणामुळे महाराष्ट्र जातीपाती आणि पोटजातीत फाटला गेला, असा आरोपही त्यांनी केला.